
पुणे ः राज्यातील कृषी सहायकांना पर्यवेक्षकपदी पदोन्नती (Promotion) देण्यासाठी कृषी खात्याने (Agriculture Department) अद्यापही परीक्षा न घेतल्यामुळे वाद तयार झाला आहे. वेळेत परीक्षा न घेतल्यामुळे ‘मॅट’मध्ये (MAT) अवमान याचिका दाखल करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
कृषी पर्यवेक्षक पद यापुढे १०० टक्के पदोन्नतीने भरण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाने २१ जानेवारी २०१८ रोजी एका अधिसूचनेद्वारे जाहीर केला आहे. मात्र पदोन्नती देताना ७० टक्के पदे सेवाज्येष्ठतेनुसार आणि ३० टक्के पदे सध्याच्या कृषी सहायकांमधून विभागीय परीक्षा घेऊन भरली जाणार होती. मात्र कोविडमुळे परीक्षा घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे उर्वरित ३० टक्के पदेदेखील सेवाज्येष्ठतेनुसार तदर्थ पदोन्नतीने भरण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र हा निर्णय आधीच्या अधिसूचनेचा उल्लंघन करणारा असल्याचे सहायकांचे म्हणणे आहे.
पळवाट शोधण्याचा प्रयत्न
परीक्षा होत नसल्यामुळे राज्यातील नाराज कृषी सहायकांच्या वतीने रामराव यादव, सय्यद नदीम, बळिराम आवटे यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) याचिका दाखल केली. याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे अॅड. वैभव पवार व अॅड. संदीप मुंढे यांच्या म्हणण्यानुसार, चार महिन्यांत परीक्षा घेण्याचे आदेश ‘मॅट’ने दिलेले होते. परंतु, मुदत उलटूनही परीक्षा झालेली नाही. उलट परीक्षा घेण्यासाठी मुदतवाढ मिळवून पळवाट शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. तदर्थ पदोन्नती दिलेल्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा घाट घातला जात आहे.
सहसंचालकांनी कळवली वस्तुस्थिती
लातूरच्या कृषी सहसंचालकांनी या प्रकरणी कृषी आयुक्तालयाला पत्र पाठवून वस्तुस्थिती कळवली आहे. कृषी आयुक्तालयाच्या आस्थापना विभागाला सहसंचालकांनी माहिती देताना, ‘मॅट’च्या आदेशानुसार परीक्षा घेण्याचे नियोजन करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, कर्मचाऱ्यांकडून अवमान याचिका दाखल केली जाईल, असे म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने मात्र या चालढकल प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. अवमान याचिका दाखल करीत हा लढा चालू ठेवला जाईल, असे संघटनेचे म्हणणे आहे.
- कृषी सहायकांना पर्यवेक्षकपदी पदोन्नती देण्यासाठीची परीक्षा अद्यापही नाहीच
- पदोन्नतीची ७० टक्के पदे सेवाज्येष्ठतेनुसार आणि ३० टक्के पदे कृषी सहायकांमधून परिक्षेद्वारे भरण्याचा निर्णय
- मात्र, कोविडमुळे परीक्षा टाळल्या
- आता उर्वरित ३० टक्के पदेदेखील सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचा निर्णय; त्यास कृषी सहायकांचा विरोध
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.