Nagpur News : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या (माफसू) कुलगुरुपदासाठी राजकीयस्तरावर जोरदार लॉबिंग होत असल्याची चर्चा आहे. यामध्ये गुजरातमधील कामधेनू पशू, मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेश केलावाला यांचे नाव आघाडीवर असले तरी त्यांचा कार्यकाळ यापूर्वी वादग्रस्त राहिल्याची चर्चा आहे.
मुलांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी खोट्या माहिती आधारे नॉन क्रिमीलेअर तयार करणे व त्याकरिता बनावट दस्तऐवजांचा वापर केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. डॉ. केलावाला यांनी या प्रकरणात चौकशीअंती क्लीन चिट मिळाल्याचा दावा केला आहे.
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर यांचा कार्यकाळ जानेवारी २०२३ मध्ये संपुष्टात आला. त्यानंतर आता नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपाल कार्यालयाकडून प्रक्रिया राबविली जात आहे.
या आधारे डॉ. नरेश केलावाला, तिरुपती येथील प्रा. चंद्रशेखर राव, प्रा. एन.व्ही. राव, डॉ. नितीन पाटील (जोधपूर), डॉ. अशोक कुमार (उपमहासंचालक, भारतीय कृषी संशोधन परिषद) या पाच जणांना मुलाखतीकरिता अंतिम करण्यात आले आहे.
डॉ. केलावाला यांच्याविषयी चर्चा होत आहे. कामधेनू पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुलगुरू म्हणून त्यांचे उत्पन्न अधिक असताना त्यांनी ते लपवीत मुलगा दिव्येश व रोहन यांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी खोटी माहिती देत नॉन क्रिमीलेअर मिळविल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
त्यानंतर विश्लेषण समितीसमोर प्रमाणपत्र बनविणाऱ्या तीन अधिकाऱ्यांची साक्ष घेण्यात आली. उत्पन्न मर्यादेत बसत नसतानाही नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र बनवल्याचा ठपका समितीने ठेवला होता.
त्याच आधारे मुलांना प्रवेश मिळवून देण्यात ते यशस्वी झाले. त्यांचा समावेश कुलगुरूसाठीच्या पहिल्या पाचमध्ये कसा केला, याविषयी तर्क लावले जात आहेत. कुलगुरुपदासाठी ३० उमेदवारांनी अर्ज केले होते.
यातील १५ उमेदवारांना पात्र ठरवीत ५ जणांची निवड करण्यात आली. केलावाला यांच्याबाबत गुजरात येथील राज्यपाल कार्यालयाकडून माहिती मागविण्यात आली आहे. परिणामी, कुलगुरू निवड प्रक्रिया लांबणीवर पडल्याचे सांगण्यात येते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.