
Pune News : कमी पावसामुळे कुकडी प्रकल्पात सध्या कमी पाणी साठा आहे. मात्र पिण्यासाठी पाणी सोडणे आवश्यक आहे. सध्याचे सुरू असलेले कुकडी डावा कालव्याचे आवर्तन दोन दिवसांनी वाढवून १० सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवावे, असा निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कुकडी प्रकल्प व घोड संयुक्त प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
शासकीय विश्रामगृह येथे शनिवारी (ता.२) झालेल्या या बैठकीस महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार राम शिंदे, बबनराव पाचपुते, अतुल बेनके, अशोक पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘पावसाच्या मोठ्या खंडामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी पाण्याचे योग्य नियोजन करावे. सर्व घटकांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळेल याकडे लक्ष द्यावे. विसापूर जलाशयात अतिशय कमी पाणीसाठा असून पिण्यासाठी नियोजनाच्या दृष्टीने कुकडी कालव्याचे पाणी २ दिवस अधिक सुरू ठेऊन विसापूरमध्ये पाणी सोडावे.
घोड प्रकल्पात सध्या केवळ २३ टक्के पाणीसाठा आहे. तथापि, पिण्यासाठी घोड धरणात आवश्यक पाणी आरक्षण ठेवून धरणातून कालव्यांद्वारे सिंचनासाठी पाणी सोडावे. तसेच खडकवासला प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असल्याने पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. पावसाची परिस्थिती पाहून ऑक्टोबरमध्ये पुन्हा आढावा घेऊन नियोजन करण्यात येईल.’’
‘शेतीला योग्य दाबाने पाणी द्या’
‘‘कालव्याच्या टेलच्या भागातील शेतीला योग्य दाबाने पाणी मिळावे, या साठी प्रयत्न करा. त्यासाठी कालवाक्षेत्रातील पाणी उपशावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यकता भासल्यास ठराविक वेळेतच वीजपुरवठा करा. अवैध पाणीवापरावर नियंत्रण आणण्यासाठी बाह्य स्रोताद्वारे तात्पुरते मनुष्यबळ घ्यावे,’’ अशा सूचना विखे-पाटील यांनी केल्या.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.