Central Government Sugar Stock : पुढच्या दोन महिन्यात सणासुदीचे दिवस असल्याने सरकार महागाई नियंत्रणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखत आहे. दरम्यान गहू, कांदा, टोमॅटोनंतर आता सरकार साखरेची दरवाढ रोखण्याच्या दृष्टीने पावले उचलत आहे. केंद्राकडून मोठे साखर व्यापारी, किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते, यांना दर आठवड्याला साखरेचा साठा जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचबरोबर गहू, तूर आणि मसूर साठा जाहीर करावा लागणार आहे.
साखरेचा बाजारातील साठेबाजीचा सामना करण्यासाठी आणि बेकायदा सट्टा रोखण्यासाठी सकारात्मक उपाय म्हणून सरकारने हे पाऊल उचलले आहे. सरकारच्या (https:/ /esugar.nic.in) पोर्टलवर व्यापारी/घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, मोठे साखळी विक्रेते यांच्यासाठी साखरेचा साठा अनिवार्यपणे उघड करण्याचे आदेश जारी केले आहेत. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने याबाबत अधिकृत निवेदन काढले आहे.
केंद्राकडून साखरेचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी ऑगस्टमध्ये २३ लाख ५० हजार टन साखरेचा कोटा खुल्या बाजारात विक्रीसाठी खुला केला होता. याशिवाय दोन लाख टन साखरेचा अतिरिक्त कोटा विकण्यासही परवानगी दिली होती. सरकारने साखर विक्रीस काढूनही साखरेचे भाव चढेच राहिले होते. यामुळे सरकारने आता साठा जाहीर करण्यास सांगितले आहे.
पुढचे दोन महिने सणासुदीचे आहेत तसेच आगामी काळात निवडणुका असल्याने देशभरातील लोकांना महागाईच्या झळा बसून नये याची काळजी सरकार घेत आहे. त्यामुळे बाजारातील साखरेचे दर स्थिर ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. तरीही दर वाढत असल्याने साठेबाजी त्याला कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
साखरेचा साठा दर महिन्याला जाहीर करण्याचे आदेश सरकारने यापूर्वीच दिले होते. आता मात्र हा साठा आठवड्याला जाहीर करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यानुसार दर सोमवारी केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाच्या पोर्टलवर ही आकडेवारी अपलोड करावयाची आहे. यातून बाजारात मागणी पुरवठ्याचे संतुलन साधून दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
आपल्याकडील साठा जाहीर करताना कुणाला किती साखर विकली, त्यातील उचल किती झाली याची आकडेवारी व्यापाऱ्यांची नावे, जीएसटी नंबर, मोबाइल नंबरसह द्यावयाची आहे. यामुळे व्यापायांसह साखर कारखान्यांनाही ती जाचक वाटत आहे. अनेक कारखान्यांनी त्याला प्रतिसाद दिला नसल्याचे समजते. यामुळे केंद्र सरकारने आठवड्याला साठा अपलोड करा असा इशारा दिला आहे.
केंद्राकडून काल (ता.२१) ऑक्टोबर महिन्याच्या कोट्यातील १३ लाख टन साखरेची पहिल्या टप्प्यात खुल्या बाजारात विक्री करण्यास साखर कारखान्यांना परवानगी दिली आहे. याची अंमलबजावणी तातडीने सुरु करण्यात आली आहे. ऑक्टोबरचा कोटा योग्यवेळी जाहीर करण्यात येईल.
कारखानानिहाय त्याची परवानगी दिली जाईल. तोपर्यंत आधीच्या कोट्याच्या आधारे १३ लाख टन साखरेची विक्री सुरू करावी, असे केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. सणासुदीच्या हंगामात साखरेची दरवाढ रोखण्यासाठी हा अग्रीम कोटा जाहीर करण्यात आला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.