Online Pesticide Sale : ऑनलाइन कीटकनाशक विक्रीला केंद्राची परवानगी

देशात ८६ हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या कीटकनाशकांची आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून ऑनलाइन विक्री करता येणार आहे.
 Pesticides
Pesticides Agrowon
Published on
Updated on

नागपूर : देशात ८६ हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या कीटकनाशकांची (Online Pesticide Sale) आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून ऑनलाइन विक्री करता येणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने कीटकनाशकांच्या (Pesticide) ऑनलाइन विक्रीस नुकतीच नियम-अटींच्या पालनासह अधिकृत परवानगी दिली असल्याने शेतकऱ्यांना दारापर्यंत कीटकनाशके उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ धोरणाला (Digital India Policy) हा निर्णय पूरक आणि महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

 Pesticides
Fake Pesticides : बनावट कीटकनाशके प्रकरणी दोन जणांवर गुन्हा

देशभरातील काही ई-कॉमर्स आणि कीटकनाशके उत्पादन घेणाऱ्या कंपन्या कृषी निविष्ठांची ऑनलाइन विक्री सध्या कार्यरत आहेत. यात सर्व प्रकारच्या कीड-रोगनाशकांपासून खते आदींचा समावेश आहे. मात्र, काही जोखीम आदी कारणांमुळे या व्यवस्थेबाबत उद्योगांमध्ये संभ्रम होता. केंद्र सरकारने याबाबत नुकताच (२४ नोव्हेंबर) स्वतंत्र निर्णय घेतल्यामुळे या व्यवसायात स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होईल, असे या उद्योगातील सूत्रांनी सांगितले.

 Pesticides
Pesticide MRL : पेच ‘एमआरएल’चा !

केंद्रीय कृषी मंत्रालयाने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मबाबतच्या तांत्रिक बाबींची पडताळणी करून कीटकनाशक पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हे करताना ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मधारकाला परवानाधारकाकडूनच याकरिताची उत्पादने खरेदी करावी लागणार आहे. त्यासंबंधीची पडताळणी त्या राज्यातील संबंधित यंत्रणेकडून केली जाईल. कीटकनाशक विक्री आणि वितरणा संबंधीच्या सर्व नियमांचे पालन पुरवठा दराला करावा लागणार आहे.

मध्यंतरी कृषी निविष्ठांच्या ऑनलाइन विक्रीला विक्रेत्यांची राष्ट्रीय संघटना असलेल्या ‘ॲग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन’ने जोरदार विरोध केला होता. मात्र, याविषयी ई-कॉमर्स आणि उत्पादक कंपन्यांसह, शेतकरी संघटनांनी यांनी नाराजी व्यक्त केली होती.

 Pesticides
Pesticide Licence : तीन विक्रेत्यांचे परवाने निलंबित

‘ऑनलाइन निविष्ठा खरेदी हा शेतकऱ्यांचा हक्क’ असून शेतकऱ्यांनाही आपल्या गरजेच्या वस्तू खरेदी करताना स्पर्धात्मक लाभ मिळावा, असे मत शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी व्यक्त केले होते. केंद्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे स्थानिक निविष्ठा विक्रेत्यांनाही नवी संधी उपलब्ध होणार आहे. त्यांनीही बाजारपेठेच्या बदलत्या स्वरूपात आपल्या व्यवसाय वृद्धीची संधी शोधणे आवश्‍यक असल्याचे, या उद्योगातील सूत्रांनी सांगितले.

निर्णयातील नियम/अटी

१) ऑनलाइन विक्रीकरिता संबंधित ई-कॉमर्स कंपनीस कीटकनाशक विक्री परवाना बंधनकारक असेल

२) ऑनलाइन विक्रीसाठीच्या परवान्याचे नियमानुसार मुदतीत नूतनीकरण आवश्‍यक

३) ऑनलाइन विक्री करताना ग्राहक संरक्षण (ई-कॉमर्स) कायद्या(२०२०)चे पालन करावे लागेल.

जगभरात नोंदणीकृत ७२० कीटकनाशके आहेत. त्यापैकी भारतात २९२ असली, तरी अनधिकृत कीटकनाशकांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे. परिणामी हा निर्णय जैवविविधतेला घातक ठरू शकतो.

- नरसिम्हा रेड्डी, पेस्टिसाइड ॲक्शन नेटवर्क फॉर इंडिया.

केंद्र सरकारने ई-कॉमर्स प्लॕटफॉर्मच्या माध्यमातून कीटकनाशके पुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. शेतकऱ्यांना या माध्यमातून त्यांना हवे तेच कीटकनाशक मिळू शकेल. मध्यस्थांची साखळी कमी झाल्यामुळे पंधरा ते वीस टक्के कमी दरात कीटकनाशक मिळेल परिणामी हा शेतकरी हिताचा निर्णय आहे. बदलत्या व्यावसायिकतेनुसार सर्वांनी बदल स्वीकारला पाहिजे.

- कल्याण गोस्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पेस्टीसाईड असोसिएशन ऑफ इंडिया, दिल्ली.

जागतिक स्तरावर डिजिटल माध्यमांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्या अंतर्गत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म करून खरेदी देखील वाढली आहे. त्याच धोरण अंतर्गत आता कीटकनाशक विक्री देखील अशाच प्लॅटफॉर्मवरून केली जाणार आहे. ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. ऑनलाइन नोंदणीनंतर स्थानिक स्तरावरूनच अशा कीटकनाशकांचा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे स्थानिक विक्रेत्यांना देखील यात काम करण्याची मोठी संधी आहे. त्यांच्या रोजगारावर कोणताच परिणाम होणार नाही. असे बदल स्वीकारलेच पाहिजे.

- रितेश अल्लाडवार, मुख्य वित्त अधिकारी, ऍग्रो स्टार

सदर शासन निर्णय स्वागतार्ह आहे. कीटकनाशक नियम १९७१ मध्ये अंतर्भाव केलेल्या नवीन सुधारणा नुसार आता कीटकनाशकाची विक्री ऑनलाइन पद्धतीने होऊ शकते. शेतकऱ्याच्या दृष्टीने बघितल्यास हवे ते कीटकनाशक शेतकऱ्यांना घरपोच उपलब्ध होणार आहे. यामुळे साठेबाजी करणाऱ्यांवर नियंत्रण येणार आहे. शेतकऱ्यांना मागणीनुसार कीटकनाशकाचा पुरवठा होईल.

- डॉ. उपेंद्र कुळकर्णी,

सहयोगी प्राध्यापक, कीटकशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

अॅग्रो केम फेडरेशन ऑफ इंडिया या निर्णयाचे कौतुक करते. यामुळे शेतकऱ्याला सूचित किंमतीचा निर्णय घेण्याची संधी मिळते आणि त्यामुळे खरेदीदरासाठीचा अनुभव चांगला असू शकतो. सोशल मीडियाची उत्तम जाण असलेल्या आणि सामुदायिक शेती करणाऱ्या उदयोन्मुख शेतकऱ्यांचा हा नवीन ट्रेंड, ‘इकॉनॉमी ऑफ स्केल’ सोबत खरेदी करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

- परीक्षित मुंधरा, अध्यक्ष, अॅग्रो केम फेडरेशन ऑफ इंडिया

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com