
Solapur News : ‘‘जिल्हा वार्षिक पतपुरवठा धोरण २०२३-२४’ अंतर्गत जिल्ह्यासाठी एकूण १५ हजार ५५० कोटी रुपयांचा पतपुरवठा आराखडा जाहीर करण्यात येत आहे. या अंतर्गत प्राधान्य क्षेत्राला १० हजार ५५० कोटी रुपये पतपुरवठा करण्यात येईल.
शेती क्षेत्रासाठी सात हजार २५० कोटी रुपये पतपुरवठा करण्याचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व बँकांनी शेतीसह दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे पतपुरवठा केला पाहिजे,’’ असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले.
जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या त्रैमासिक बैठकीत शंभरकर बोलत होते. या वेळी ‘आरबीआय’चे ‘डीएलओ’ राहुल कुमार, बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक चंद्रशेखर मंत्री, ‘नाबार्ड’चे जिल्हा समन्वयक नितीन शेळके, जिल्हा बँक व्यवस्थापक प्रशांत नाशिककर, आरसीटीचे संचालक दीपक वाडेवाले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते, आत्माचे संचालक मदन मुकणे आदी उपस्थित होते.
शंभरकर म्हणाले, ‘‘सर्व बँकांनी पीक छोट्यातील छोट्या शेतकऱ्यांना तत्काळ पीककर्जाचा पुरवठा करावा. बँकांनी शैक्षणिक कर्जपुरवठा वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जिल्ह्यातील सर्व महामंडळांच्या जिल्हा समन्वयकांनी शासनाकडून त्यांना आलेल्या उद्दिष्टाप्रमाणे संबंधित लाभार्थ्याकडून परिपूर्ण अर्ज भरून घेऊन कर्ज मागणीचे प्रस्ताव बँकाकडे पाठवावेत.
बँकांनी ते प्रस्ताव त्वरित मंजूर करावेत. तसेच जे प्रस्ताव मंजूर करण्यासारखे नाहीत ते महामंडळांना कळवावे. महामंडळांनी त्रुटी दूर करून ते पुन्हा बँकाकडे सादर करावेत.’’
दृष्टिक्षेपात कर्जवितरण...
या वर्षीच्या वार्षिक पतधोरण आराखड्यानुसार १५ हजार ५५० कोटींचा आराखडा
खरिपासाठी २ हजार ३७९ कोटी रुपये, तर रब्बीसाठी एक हजार ८७१ कोटी रुपये पीक कर्जवितरणाचे उद्दिष्ट
शेती मुदत कर्जासाठी तीन हजार कोटींची तरतूद
मागील वर्षी पीककर्ज १०३ टक्के, कृषी १३३ टक्के, गृहकर्ज ८० टक्के व शैक्षणिक कर्ज २७ टक्के वितरण
जिल्ह्यातील बँकांकडून बचत गटांना २८० कोटी रुपयांचे कर्जवितरण
प्राधान्य क्षेत्राला १३९ टक्के कर्जवितरण
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.