Fertilizer Uses : संतुलित खत वापरच खरी समृध्दी देईल- नरेश देशमुख

खत उत्पादन वर्षभर चालते; पण विक्रीचे दिवस कमी असतात. अशा वेळी गोदामात पडून असलेल्या खतात कंपन्यांचे भरमसाठ भांडवल अडकून पडते.
Fertilizer Uses
Fertilizer UsesAgrowon

Fertilizer subsidy : खत उद्योगातील घडामोडींबाबत ‘स्मार्टकेम’चे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट नरेश देशमुख (स्ट्रॅटेजी अॅन्ड मार्केटिंग) यांच्याशी मनोज कापडे (Manoj Kapade) यांनी केलेली बातचित.

१) खत अनुदान कंपन्यांऐवजी थेट शेतकऱ्यांना दिल्यास काय होईल? (Fertilizer Company)

तसा धोरणात्मक निर्णय भविष्यात सरकार घेवू शकते. सध्या शेतकऱ्यांना खतासाठी 30-35 टक्के अनुदान मिळते. पण ते कंपन्यांकडे जाते. म्हणजेच समजा 100 रुपये खर्च खत उत्पादनावर होत असल्यास त्यातील 30 रुपये सरकारकडून दिले जातात.

देशभर असे 70 हजार कोटीचे अनुदान सरकार वाटते. गॅस सिलिंडर सारखेच भविष्यात डीबीटी द्वारे थेट शेतकऱ्याच्या खात्यात खत अनुदान जमा होवू शकते. अर्थात, सध्या कंपन्यांना अनुदान मिळत असले तरी त्यात समस्याही अनेक आहेत.

खत उत्पादन वर्षभर चालते; पण विक्रीचे दिवस कमी असतात. अशा वेळी गोदामात पडून असलेल्या खतात कंपन्यांचे भरमसाठ भांडवल अडकून पडते. पॉस मशीनवर शेतकऱ्याला खत विकल्याशिवाय कंपनीला अनुदान मिळत नाही.

वाहतूक, गोदाम व्यवस्थापन, कायदेशीर अडचणी, कच्च्या मालाचे भाव अशा अनेक समस्यांना खत कंपन्यांना सतत सामोरे जावे लागते.

२) आयात खतांच्या काय समस्या आहेत?

भारतीय जमिनीत स्फुरद,पालाशची मोठी कमतरता आहे. त्यामुळे आपण जगात सर्वात जास्त खत आयात करतो. आयात खताचे भाव सर्व डॉलर्सच्या मुल्यावर आधारित असतात. कच्चा माल महागला की लगेच इतर उद्योगांप्रमाणे खत उद्योगात पक्क्या मालाची किंमत वाढवता येत नाही.

गेल्या काही महिन्यांपूर्वी खताच्या आयात कच्या मालाचे भाव भडकले. अर्थात, पुढे डीएपीची गोणी अकराशेवरून चौदाशे रुपये झाली. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला.

Fertilizer Uses
Fertilizer : पुण्यासाठी रासायनिक खते उपलब्ध

३) उत्पादकता वाढीत खत उद्योगाचा वाटा किती?

खत उद्योगातील सर्वच कंपन्या आपआपल्या पातळीवर उत्पादकता वाढीसाठी उत्तम काम करीत आहेत. उत्पादकता वाढल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसै जाणार नाही हे सर्वांनाच कळते.

त्यामुळे आपआपले ब्रॅंडस् बाजारात-बांधावर नेण्यासाठी भरपूर प्रात्यक्षिके, मेळावे, बैठका, चर्चासत्रे कंपन्यांकडून होतात. हे खरे तर कृषी विस्ताराचे मोठे काम आहे. कंपनीच्या नावापेक्षाही काही दर्जेदार कंपन्या शेतकऱ्यांमध्ये ब्रॅंडने प्रसिध्द झाल्या आहेत.

एकवेळ ‘दीपक फर्टिलायझर्स’ नावाच्या कंपनीला शेतकरी ओळखतही नसतील; पण ‘महाधन’ ब्रॅंडला लाखो घरात आस्तित्व आहे. आज आम्ही ‘स्मार्टकेम’ कंपनी बनवून दोन वर्षे झाली.

पण अजूनही शेतकऱ्यांना ‘महाधन’ (Mahadhan) नाव हवे असते. ही सर्व किमया खत कंपनीने केलेल्या कृषीविस्तार कामाचीच आहे.

४) संतुलित खत वापरासाठी काय करायला हवे?

ही समस्या देशभर आहे. मात्र, त्यावर उपाय प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रचार-प्रसारात सामावून घेणे हाच आहे. खत वापराविषयी एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात कृषी विभाग, विद्यापीठे किंवा शास्त्रज्ञांना अनेक मर्यादा आहेत.

त्यामुळे आधी एका प्रयोगशील शेतकऱ्याला खत व्यवस्थापनाचे धडे द्या. पुढे त्याच्या माध्यमातून सर्व गावशिवारापर्यंत संतुलित खत व्यवस्थापनाचा प्रसार करणे, हे सूत्र राबविण्याची आवश्यकता आहे. संतुलित खत वापर हाच शेतकऱ्यांच्या समृध्दीचा मार्ग आहे.

नुसते सेंद्रिय व नुसते रासायनिक म्हणून चालणार नाही. सेंद्रिय खतांना मर्यादा आहे. शेवटी पिकाची मुळे हे सेंद्रिय अन्न आणि ते रासायनिक अन्न असा फरक करीत नाही. मुळांना फक्त अन्न हवे असते.

त्यामुळे चांगल्या शेतकऱ्यांच्या मदतीने संतुलित खत वापराची भरपूर प्रात्यक्षिके घ्यायला हवीत. त्याच शेतकऱ्यांनी मग गावातल्या इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला हवे. माध्यमांचा प्रभावी वापर करून शेतकऱ्यांपर्यंत जाण्याचा देखील एक पर्याय मोठा आहे.

उदाहरण द्यायचे झाल्यास अॅग्रोवनकडून गेल्या 12-14 वर्षात या क्षेत्रात झालेले काम थक्क करणारे, मोलाचे आणि कौतुकाचे आहे.

५) शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खत वापरात काय अडचणी आहेत?

बहुसंख्य शेतकऱ्यांना त्याच्या जमिनीच्या प्रकृतीनुसार व पिकांच्या गरजेनुसार कोणते खत किती टाकावे हेच माहित नसते. खत वापरातील ही सर्वात मोठी अडचण आहे. युरिया, डीएपी, एसएसपी ओबडधोडब टाकून शेतकरी बांधव जादा उत्पादनाच्या आशेवर असतात.

त्यात त्यांची काही चूक नाही. त्यांना सल्ला देणाऱ्या विविध घटकांचा हा दोष आहे. त्याची सुरूवात दुकानांपासूनच होते. जमीन नेमकी कोणती आहे, टोमॅटोचे क्षेत्र किती आहे, याची कसलीही माहिती न घेता सल्ला दिला जातो.

खत चार पोते लागेल की आठ पोते लागेल, सुक्ष्म अन्नद्रव्ये किती लागतील याचा कसलाही आगापिछा माहित नसताना शेतकऱ्यांना खत टाकण्याचा सल्ला दिला जातो. इतर जण करतात म्हणून तोही तेच करतो.

दुसरे म्हणजे रानात जावून खतांची भेळ करून पिकांना दिली जाते. त्यामुळे एकसमान खते पिकाला मिळत नाहीत. आपआपला अनुभव, समज किंवा सल्ला अशा माध्यमातून खताचा बेसुमार मारा होत असतो. त्यामुळे शेतकरी व जमीन दोघांचीही हानी होते.

जमीन आणि पिकाच्या निश्चित गरजेनुसारच खताचे डोस कसे द्यावे हे शेतकऱ्याला सांगितलेच जात नाही. प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक पिकासाठी ‘ फर्टिलायझर डोस कॅल्क्युलेटर’ उपलब्ध करून द्यावा लागेल.

६) सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापराबाबत काय स्थिती आहे?

जेवणात जसे चिमुटभर मिठाला महत्व असते. तसेच महत्व सुक्ष्म अन्नद्रव्यांना आहे. खत हे मातीचे जेवणच असते. मात्र आम्ही मातीला केवळ भात-भाजी-चपाती म्हणजे नत्र-स्फुरद-पालाश देत आहोत. थोडक्यात हे जेवण अळणी आहे.

जमिनीच्या खतरुपी जेवणात चिमुटभर मिठ म्हणजे ते मंगल,जस्त, तांबे लागते किंवा बोरॉन,मॉलिब्डेनम व गंधक द्यावे लागते हे आपण विसरलो आहोत. 90 टक्के शेतकरी हे सुक्ष्म अन्न घटक विसरून जातात.

पुन्हा जे दहा टक्के आहेत त्यांनाही नेमके किती अन्नद्रव्य वापरावे हे लक्षात येत नाही. अजून एक अडचण अशी सर्व खते, सर्व गावांमध्ये एकाच ठिकाणी मिळत नाहीत.

त्यामुळे मिळतील ती वापरण्याकडे किंवा विकतील ती खपविण्याकडे कल असतो. असा हा सर्व गुंता तयार झालेला आहे. ही स्थिती मला खूप आव्हानात्मक वाटते.

Fertilizer Uses
Fertilizer Stock : सातारा जिल्ह्यात रासायनिक खतांचा मुबलक साठा

७) मग अशा स्थितीत खत उत्पादक कंपनी काय जबाबदारी असते?

शेतकऱ्यांना जे हवे ते वेळेत आणि दर्जेदारपणे शेतकऱ्यांना मिळवून देण्याचे ध्येय कंपनीचे असले पाहिजे. आम्ही सतत युनिक प्रॉडक्टस् म्हणजे नाविन्यपूर्ण उत्पादने शेतकऱ्यांच्या बांधावर घेवून गेलो. महाधनची ही परंपरा हेच तर आमचे बलस्थान आहे.

हवे ते दिले म्हणून तर ‘महाधन 23:23:0’ या खताने कंपनीलाही नावारूपाला आणले. आमच्या ‘बेनसल्फ’ने शेतकऱ्यांना खूप आधार दिला. विद्राव्य खतात तर आम्ही ‘पायोनिअर’ आहोत. वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्समध्ये आधी चार-पाच कंपन्या होत्या.

मात्र, आमच्या खतांनी ठिबक आधारित खत व्यवस्थापनात मोलाचे काम केल्याचे तुम्हाला शेतकरीच सांगतील.

महाराष्ट्रात तीन वर्षापूर्वी स्वतंत्रपणे खत कारखाना उभारून किंवा स्मार्टेक तंत्राचे नवे अभिनव खत आणून शेतकऱ्यांना हवे ते देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. शेतकऱ्यांच्या समृध्दीच्या आधारे कंपनीने आपला विकास करायला हवा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com