
नारायणगाव, ता.जुन्नर ः पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड, भोर, हवेली, मावळ, मुळशी या तालुक्यांसाठी इफ्को कंपनीचे (IFFCCO) ३ हजार ८०४ टन १०:२६:२६ व डीएपी रासायनिक खत (Chemical Fertilizer) उपलब्ध झाले आहे.
यापैकी जुन्नर तालुक्यासाठी सर्वाधिक १ हजार २५२ टन १०:२६:२६ व १६२ टन डीएपी रासायनिक खत उपलब्ध झाले आहे. मंगळवारपासून (ता.१०) ही खते तालुक्यातील विक्रेत्यांकडे उपलब्ध होतील, अशी माहिती जुन्नर तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ यांनी दिली.
रासायनिक खतांच्या टंचाई बाबतचे वृत्त ‘दै. सकाळ’मध्ये (ता.८) प्रसिद्ध झाले होते. वृत्त प्रसिद्ध झाल्याने विक्रेते व कंपन्याकडून होणाऱ्या अडवणुकीला आळा बसणार असून कृषी विभागाला जाग आली आहे, असे मत कांदा उत्पादक मधुकर मातेले यांनी व्यक्त केले आहे.
याबाबत तालुका कृषी अधिकारी शिरसाट म्हणाले, ‘‘रब्बी हंगामामुळे कांदा, गहू, ऊस व भाजीपाला उत्पादक यांच्याकडून रासायनिक खतांची मागणी वाढली आहे. नत्र, स्फुरद, पालाश (एनपीके) हे घटक असलेल्या खतांची मागणी वाढल्याने काही प्रमाणात टंचाई निर्माण झाली होती.
इतर तालुक्यांच्या तुलनेत जुन्नर तालुक्यात भाजीपाला लागवडी खालील क्षेत्र जास्त असल्याने रासायनिक खतांची मागणी वाढल्याने टंचाई निर्माण झाली होती. साठेबाजी व लिंकिंग करणाऱ्या विक्रेते यांच्यावर ठोस कारवाई करण्याची भूमिका कृषी विभागाची आहे.
रासायनिक खतांची साठेबाजी करणाऱ्या जुन्नर येथील विक्रेत्यावर कृषी विभागाने नुकतीच कारवाई केली आहे. इफ्को कंपनीचे १०:२६:२६ व डीएपी हे रासायनिक खत आजपासून (ता.१०) उपलब्ध होणार आहे.
तालुकानिहाय १०:२६:२६ व डीएपी खतसाठा (कंसात टनामध्ये)
जुन्नर : १ हजार २५२, १६२, आंबेगाव : ८४५, १२०, शिरूर : ६००, ८५, खेड : २१०, २५ ,भोर: ७०, ५५, हवेली : ११०, १०, मावळ : १२५, ३५ ,मुळशी : ८०,२०.
=
ब्रॅण्डेड कंपनीच्या रासायनिक खतांची शेतकऱ्यांकडून जास्त मागणी असते. ही खते खरेदी करताना काही विक्रेते लिंकिंग करतात. खतासोबत इतर सम्प्लिमेंटरी खते, कीटकनाशके खरेदी करण्याचा आग्रह विक्रेते करत असल्याचा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. असा आग्रह करणे बेकायदा तसेच अन्यायकारक आहे. लिंकिंग केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. या बाबतच्या लेखी तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे कराव्यात.
- सतीश शिरसाट, तालुका, कृषी अधिकारी
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.