
औरंगाबाद : अतिवृष्टीने (Heavy Rain) झालेल्या नुकसानीच्या भरपाई (Crop Damage Compensation ) पोटी मराठवाड्याच्या वाट्याला १००८ कोटी रुपये आल्याचे शासन निर्णयातून स्पष्ट झाले. दोन दिवसांत निधी वितरणाला सुरुवात होईल असे कृषिमंत्र्यांनीही सांगितले. परंतु अजूनही शासनाचा मदतनिधी पोहोचला नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा आहे.
यंदा जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी राज्यातील बाधितांना मदत देण्याकरिता ३५०१ कोटी ७१ लाख २१ हजार रुपये इतका निधी सर्व विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास शासनाने गुरुवारी (ता. ८) मंजुरी दिली होती.
त्यानुसार शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार शेतीपिके व शेतजमिनीच्या नुकसानीकरिता अनुक्रमे ३४४५ कोटी २५ लाख ५५ हजार व ५६ कोटी ४५ लाख ६६ हजार असा निधी मदत म्हणून शेतकऱ्यांना वितरित केला जाणे अपेक्षित आहे. मराठवाड्यात जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील १० लाख ५९ हजार ६१२ शेतकऱ्यांच्या ७ लाख ३८ हजार ७५० हेक्टरवरील शेतीपिकाचे अतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते. या निर्णयासंदर्भात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयात पत्रकार परिषद घेऊन त्याच दिवशी सविस्तर माहिती दिली होती.
नुकसानग्रस्तांच्या खात्यावर शुक्रवारपासूनच मदत कशी पोहोचणे सुरू होईल ते पाहण्याचे प्रशासनाला निर्देशित केल्याचेही श्री. सत्तार म्हणाले होते. परंतु अजूनही मदतनिधी शासनस्तरावरून विभागस्तरावर न पोहोचल्याने वितरणाला सुरुवात झाली नसल्याची स्थिती आहे.
मराठवाड्याला हवेत ५९९ कोटी
सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीसाठी आणखी ५९९ कोटी ७ लाख ९० हजार रुपये मदतनिधींची मराठवाड्याला आवश्यकता आहे. सततच्या पावसाने नांदेड वगळता ७ जिल्ह्यांतील ६ लाख ९१ हजार ९२४ शेतकऱ्यांच्या ४ लाख ३९ हजार ६२० हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. याशिवाय गोगलगायींमुळे नुकसान झालेल्या बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांतील १ लाख १८ हजार ९९६ शेतकऱ्यांच्या ७२४९१ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान भरपाईसाठी लागणाऱ्या ९८ कोटी ५८ लाख रुपयांच्या निधीचाही प्रश्न अजून बाकी आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.