
Akola News : गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले. यानंतर शेतकरी आता कपाशी व इतर पिकांना युरियाची खतमात्रा देण्यासाठी धावपळ करीत आहे. दुसरीकडे बाजारपेठेत या खताची टंचाईसदृश्य परिस्थिती तयार करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात १३०० टन युरिया दाखल झाला असून हा युरिया आता कृषी सहायकांच्या उपस्थितीत विक्री करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला आहे.
यंदा शेतकरी खरीप हंगामात सुरुवातीपासूनच संकटात सापडलेला आहे. महिनाभर पाऊस नसल्याने पिके कोमेजली होती. त्यानंतर पावसाचे पुनरागमन झाल्याने एक प्रकारे पिकांना जीवदान मिळाले. पावसाळी वातावरणामुळे सध्या कपाशी व इतर पिकांना युरियाची आवश्यकता आहे. कृषी केंद्रावर युरिया उपलब्ध नसल्याचा प्रकार जिल्ह्यात अनेक ठिकाणी समोर आला. युरियासाठी शेतकरी कृषी केंद्रावर पायपीट करीत आहे.
अशातच काही ठिकाणी एका खतासोबत दुसरे खत घेण्याची जबरदस्तीसुद्धा होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी सुरू झाल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी कृभकोचा १३०० टन युरिया जिल्ह्याला मिळाल्यानंतर त्याचे वितरण करण्यात आले. युरियाबाबत होत असलेली ओरड, लिंकिंगचे प्रकार पाहता कृषी विभागाने आता प्रत्येक ठिकाणी कृषी सहायकाच्या उपस्थितीत युरियाची विक्री सुरू केली.
मात्र, ही परिस्थिती वारंवार तयार होत असल्याने नियोजनावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जाऊ लागले आहे. मागणीच्या तुलनेत खतसाठा उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची ओढाताण सुरू आहे. त्यातच काही विक्रेते एकतर लिकिंगने घ्या किंवा अधिक दराने विकत आहेत.
कंपन्यांकडूनच खताची लिकिंग होत असल्याने आम्ही काय करावे, असा प्रश्नही विक्रेते खासगीत बोलताना करीत आहेत. या परिस्थितीत कृषी विभागाची सध्या कसोटी सुरू आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने कपाशी पिकाला प्रामुख्याने युरियाची मात्रा देण्याची योग्य वेळ सध्या आलेली आहे, असे शेतकरी सांगत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.