Solapur News : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (ता.८) तब्बल १६१ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. आमदार संजय शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार श्यामल बागल यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांसह भाजप, शेतकरी संघटना यांनीही स्वतंत्रपणे अर्ज भरले आहेत. पण आता कोण कोणाबरोबर जाणार आणि नेमके चित्र काय राहणार, हे उमेदवारी मागे घेण्याच्यादिवशी स्पष्ट होणार आहे.
बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अगदी पहिल्या दिवसापासून इच्छुकांची गर्दी वाढल्याचे चित्र राहिले, आज शेवटच्या दिवसापर्यंत ते कायम होते. सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघातून सर्वाधिक ५७ अर्ज दाखल झाले आहेत.
त्यानंतर सहकारी संस्था आणि महिला मतदारसंघात १५, इतर मागासवर्ग मतदारसंघात १०, भटक्या जाती-जमाती मतदारसंघात ९, ग्रामपंचायत मतदारसंघात ४५, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात १०, आर्थिक दुर्बल घटकामधून ११ आणि व्यापारी मतदारसंघातून २, तर हमाल तोलार मतदारसंघातून १ असे अर्ज दाखल झाले आहेत. आता सोमवारी (ता.११) दाखल उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे.
व्यापारी, हमाल-तोलारमधील निवडणूक बिनविरोध
व्यापारी मतदारसंघातून जगताप गटाकडून दोन जागांसाठी अनुक्रमे मनोज पितळे आणि परेशकुमार दोशी या दोघांचेच अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाली आहे.
तर हमाल-तोलार मतदारसंघातील एका जागांसाठी वालचंद रोडगे यांचेच दोन अर्ज आहेत. त्यामुळे ही जागाही बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.
प्रमुख उमेदवारांमध्ये यांचा समावेश
उमेदवारी दाखल केलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये माजी सभापती, माजी आमदार जयवंतराव जगताप, शंभुराजे जगताप, माजी जिल्हा सदस्या सविता राजेभोसले यांचे चिरंजीव पृथ्वीराज भोसले, माजी उपसभापती चिंतामणी जगताप, माजी संचालक चंद्रकांत सरडे, अॅड. अजित विघ्ने, सुनील सावंत, किरण कवडे, केरू गव्हाणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत जगताप, सुजित बागल, तात्यासाहेब जाधव, छगन शिंदे, संदीप मारकड, दीपक चव्हाण, सुहास घोलप, विलास कोकणे, डॅा. अशोक शेळके यांचा समावेश आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.