Kharif Agriculture Work : पाऊस ओसरल्याने शेतीकामांना पुन्हा वेग

Kharif Season : मागील तीन ते चार दिवसांपासून या भागात पाऊस ओसरला आहे. यामुळे शेतीतील खोळंबलेली कामे जोमाने सुरू झाली आहेत.
Agriculture Work
Agriculture WorkAgrowon

Akola News : मागील तीन ते चार दिवसांपासून या भागात पाऊस ओसरला आहे. यामुळे शेतीतील खोळंबलेली कामे जोमाने सुरू झाली आहेत. प्रामुख्याने सोयाबीन पिकात तणनाशक, कीडनाशकाची फवारणी, इतर पिकांना रासायनिक खतमात्रा देण्यासाठी लगबग सुरू आहे. सध्या युरिया या खताची टंचाई भासत असल्याने शेतकऱ्यांची दुसरीकडे पळापळही होत आहे. प्रशासनाकडून खत उपलब्धतेचे दावे होत असतानाही सहजपणे युरिया मिळणे दुर्लभ झाल्याची वस्तुस्थिती आहे.

जुलै महिन्यात शेवटच्या टप्प्यात काही तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. दोनवेळा आलेल्या पावसाने शेती व पिकांचे नुकसान तर झालेच शिवाय ओलाव्यामुळे शेतीतील कामेही खोळंबली होती. आता पाऊस कमी झाल्याने शेतीतील कामांना वेग आला आहे. कुठे पिकात डवरणी केली जात आहे.

कुठे निंदणीची लगबग पाहायला मिळते. तर कुठे फवारणीचे काम जोमाने होत आहे. सोबतच पिकाला रासायनिक खताची दुसरी मात्रा देण्यालाही वेग आलेला आहे. शेतीच्या कामांसाठी मजुरांची मागणी वाढली आहे. बैलजोड्यांची दोन-दोन दिवसांची काही भागात वेटिंग आहे.

Agriculture Work
Agriculture Work : कसा चाललाय शेतीचा धंदा?

युरियाची चणचण

पिकांना दुसऱ्या खतमात्रेमध्ये बहुतांश शेतकरी युरिया देतात. मात्र, युरियाची सर्वत्र कमतरता बघायला मिळत आहे. जिल्ह्यात अकोट, तेल्हारा तालुक्यांत युरिया नसल्याची सर्वाधिक ओरड होत आहे. दुसरीकडे याच तालुक्यांना आतापर्यंत ५०० टन युरिया उपलब्ध करून दिल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून होत आहे. शिवाय आणखी ३५० टन युरिया याच भागासाठी दिल्या जात आहे.

Agriculture Work
Agriculture Work : शेतीतील कष्ट सुरूच असतात

असे असतानाही काही ठिकाणी युरियाचा दरसुद्धा थोडाफार जास्त घेतला जात आहे. शिवाय ओळख असलेल्यांनाच हे खत सहज भेटत आहे. गेल्या आठवड्यात अकोटमध्ये युरियासाठी दुकानांसमोर मोठ्या रांगा लागल्याचे चित्र होते.

आता थोडी परिस्थिती सुधारली तरी सामान्य शेतकऱ्यांना युरिया भेटणे कठीण बनलेले आहे. बुलडाणा जिल्ह्यातही युरियाची कमतरता आहे. लवकर रॅक लागत नाही. लागलीच तर युरियासोबत इतर खतांची लिकिंग केली जात असल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जाते आहे. वाशीममध्येही युरियाबाबत काही ठिकाणी ओरड आहे.

वाशीम जिल्ह्यात या खरीप हंगामात ७५ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे. सोयाबीन हे कडधान्य वर्गातील पीक असल्यामुळे झाडाच्या मुळावर गाठी असतात. हवेत उपलब्ध असलेले ७८ टक्के नत्र मुळावरील गाठीद्वारे शोषून घेत सोयाबीन पिकास उपलब्ध करून देतात. त्यामुळे युरिया या खताची दुसरी मात्रा देण्याची आवश्यकता नाही. पिकास युरिया खत दिल्यास कर्ब/ नत्राचे प्रमाण विषम होऊन पिकाची कायिक वाढ मोठ्या प्रमाणात होऊन फूलधारणा व फळधारणा कमी होते. त्यामुळे उत्पादनात घट येते. परिणामत: युरियावरील अनाठायी खर्च वाढून पिक उत्पादनात सुद्धा घट येते.
- आरीफ शहा, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, वाशीम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com