Agriculture Work : कसा चाललाय शेतीचा धंदा?

एका पांढरपेशा निम्नस्तरीय शासकीय कर्मचारी मित्राला विचारलं, ‘काय म्हणतो कामधंदा?’ तो म्हणाला, ‘सातवा वेतन आयोग लागू होईस्तोवर असलं काही विचारूच नकोस. काही मजा नाही. बाहेरची महागाई आणि आमचा पगार यात काही मेळच नाही. घराचं भाडं. पोरांच्या शाळांच्या फिया, क्लासच्या फिया; किराणाबिराना आणि आपले किरकोळ खर्च. काही विचारू नकोस.
Agricultural work in Partur in final stage
Agricultural work in Partur in final stageAgrowon
Published on
Updated on

- बालाजी सुतार

शेतीच्या धंद्यावर (Farmer) बोलणं चालू होतं. ‘कसा चाललाय धंदा?’ असं विचारलं तर एक शेतकरी म्हणाला, “बस चलरा है! सौ का साठ बनानेका और बापजादों का नाम चलानेका..” म्हणजे शंभराचे साठ करायचे आणि वाडवडलांनी चालवत आणलेल्या कुणबीकीला पुढे चालवत राहायचं.

शेती करायची म्हणजे हे असंच चालणार हे समीकरण शेतक-यांच्या मनातही पक्केपणी रुजलेलं आहे. अर्थात असा आतबट्ट्याचा धंदा कुणी स्वेच्छेने करतो असं होत नसणार. तरीही तो करतच राहावं लागतं याचं मुख्य कारण ‘नाईलाज’ हेच असतं.

“मान्सून धमाका ऑफर! रु. 2000/- पेक्षा अधिक खरेदीवर 60% डिस्काउंट! Hurry!” अशी जाहिरात दुकानावर लावलेल्या एका तयार कपड्यांच्या दुकानदार मित्राला सहज विचारलं, ‘ही इतकी सूट देणं कसं काय परवडतं तुला? किंवा कपडे तयार करणा-या कंपनीला?’, तो हसून म्हणाला, ‘काहीतरीच काय विचारतोयस? तुला माहित नाही हे काय असतं ते?’ मी म्हणालो, ‘खरंच माहित नाही. सांग तू..’ तो म्हणाला, ‘जाऊ दे यार. काहीतरी दुसरा विषय काढ.’ त्यावर मीही हसून घेतलं.

मला हे माहित नाही, असं नाही. कपड्यांच्या किंमती आधीच सत्तर टक्क्यांनी वाढवून त्यावर साठ टक्के सूट देणं सहज शक्य असतं. किंवा डिफेक्टीव्ह म्हणजे काही वैगुण्य असलेला आणि म्हणून दीर्घकाळ पडून असलेला माल मिळेल त्या किंमतीत फुंकून टाकायचा असतो तेव्हा त्यावर अशी घसघशीत सूट देता येते.

कसंही असलं तरी त्यात नुकसान नसतं. सौ का साठ बनानेका हे गणित चाणाक्ष व्यापारी कधीच मान्य करणार नाही. पण एकुणात काळ त्यांच्यासाठीही फारसा चांगला नाहीच. ‘नोटाबंदीपासून वातावरण जास्त बिघडलं’ असं दुकानदार दोस्त म्हणाला. शिवाय ‘आपल्या बारक्या गावात कसला आलाय राव धंदा!’ असंही.

एका पांढरपेशा निम्नस्तरीय शासकीय कर्मचारी मित्राला विचारलं, ‘काय म्हणतो कामधंदा?’ तो म्हणाला, ‘सातवा वेतन आयोग लागू होईस्तोवर असलं काही विचारूच नकोस. काही मजा नाही. बाहेरची महागाई आणि आमचा पगार यात काही मेळच नाही. घराचं भाडं. पोरांच्या शाळांच्या फिया, क्लासच्या फिया; किराणाबिराना आणि आपले किरकोळ खर्च.

काही विचारू नकोस. सध्या कर्जमाफीसकट सगळ्यात जास्त चैन आहे शेतक-यांची. साली जांभळं आणली काल किलोभर; तर केवढ्याला मिळावीत? शंभर रुपये किलो! आणि किलोत आली किती जांभळं? तर शंभरसुद्धा नाही.

एकदीड रुपयाला एक जांभूळ पडलं राव!” ‘जांभळाची शेती’ हा काही वर्षभर चालणारा आणि सगळेच शेतकरी करतात असा धंदा नाही; किंबहुना आपण ‘शेती’ असं म्हणतो तेव्हा त्यात ‘जांभळाची शेती’ हा प्रकार अजिबातच नसतो, हे मला त्याला सांगावंसं वाटलं होतं. पण मी हसलो नुसताच आणि पुढे सटकलो.

जुलैचा पहिला आठवडा उलटून गेला आहे आणि आमच्याकडे अजून नीटनेटका पाऊस नाहीय. यावर्षी पावसाची चांगली लक्षणे आहेत, असं मी याच सदरात मागच्या वेळी लिहिलं होतं. आपले अंदाज खरेच ठरू द्यायला निसर्ग आपल्याला बांधील नसतो, हे आपण आशेपोटी विसरतो. रोज आभाळ भरून येतंय घनघोर पण पाऊस येत नाहीय.

अधूनमधून इकडेतिकडे आणि पलीकडे मुंबईत, कोकणात धुंवाधार चालू असल्याच्या बातम्या पाहताना जीव हळहळतो. तिकडे पाऊस म्हणजे निव्वळ समुद्राची भर. म्हणजे पावसाने तिकडे पडूच नये असं म्हणणं नाही, पण इकडेही आला तर काय बिघडेल?

अर्थात असले प्रश्न निसर्गाला विचारण्याचीही सोय नसते. निसर्ग म्हणजे झेडपीचा सदस्य नसतो त्याला जाब विचारायला. मुळात झेडपीच्या सदस्यालाही जाब विचारणं सोपं नसतं. हे आपल्याला माहितच असतं.

आपण कचकड्याची माणसं. आपण बाजारावर अवलंबून असतो, किंवा सरकारवर म्हणजे वेतन आयोगावर आणि सगळ्यात जास्त निसर्गावर. जुन्या काळातल्या गोष्टींमध्ये राक्षसाचे प्राण पोपटात असत, तसे आपले प्राणही या असल्याच य:कश्चित गोष्टींमध्ये असतात.

जांभळाचे भाव शंभर रुपये किलो झाले की फटदिशी आपला जीव जाऊ पाहतो आणि कपड्याच्या भावात साठ टक्के डिस्काउंट म्हटल्यावर आपल्या जीवात अनिवार धुगधुगी येते. आपण आणि आपला भोवताल म्हणजे निव्वळ ‘असून अडचण, नसून खोळंबा’ प्रकारात मोडत चाललो आहोत दिवसेंदिवस.

गावातल्या पारावर पोरं बसलेली असतात. पार खरं म्हणजे उरले नाहीत आता. पण जिथे पार नाहीत तिथल्या स्टँडवर अनेक हॉटेले आणि टप-या असतात. तिथे बसायची किंवा उभं राहायची ‘सोय’ असते. तिथं उभं राहून याच्यात्याच्याकडून चहा-पुडी काढत राहिलं की दुपार होते.

दुपारी रानामाळात एखादी चक्कर मारीस्तोवर सांज कलते. सांच्याला जेवणं करून जरा इकडेतिकडे कुणाच्या ओट्यावर चार दोस्तदारांसोबत गप्पांची बैठक जमवली की निद्रादेवीच्या कुशीत जायची वेळ होते. अजून एक दिवस सरून जातो.

पोरांना शेतीत रस उरलेला नाही. आपला पोरगा या शेतीच्या खाते-यात जाऊ नये, असंच जवळजवळ सगळ्या शेतक-यांनाही वाटत असतं. पण मोडीत निघालेल्या साखर कारखानदारीशिवाय आपल्याकडे दुसरे मोठे उद्योगधंदे नाहीत. सरकारी नोक-या म्हणजे गुलबकावलीचं फुलच. पहाटे गावाबाहेरच्या सडकेवर व्यायाम करायला, पळायला काही पोरे जातात, त्यांना पोलिसात किंवा सैन्यात जायचं असतं.

Agricultural work in Partur in final stage
Rural Social Structure : गावात राहून आलेला भकासपणा संपत नाही तेव्हा...

सगळ्यांनाच ती दारे उघडतात असं नाही. पण काहीजण पोहचतात तिकडे. काहीजण तलाठी-ग्रामसेवकाच्या परीक्षांसाठी जीव पाखडतात. ज्यांची थोडीबहुत आर्थिक कुवत असते अशी काही पोरे पुण्याला जाऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला पाहतात.

यांनी अविनाश धर्माधिकारींच्या आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणजे विश्वास नांगरे पाटलांच्या प्रेरक भाषणांच्या क्लिप्स पाहिलेल्या असतात. त्याने स्फुरण येऊन हे भिडू पुण्यात पावते होतात. स्पर्धा परीक्षांचे क्लास हा पुण्यातला एक अवाढव्य व्यवसाय होऊन बसलेला आहे.

मराठवाड्यातली मुलं हे त्यांचं मोठं गि-हाईक असतं. ही मुले तिकडे तीन-चार जणांत मिळून एखादी खोली करतात. मेस लावतात आणि एखादा क्लास गाठून अभ्यास करत राहतात. खरोखरच करतात की नाही; आणि करत असतील तर दहातले नेमके कितीजण गंभीरपणे करत असतील माहित नाही; पण ‘काय करतोस?’ या प्रश्नावर ‘राज्यसेवेची तयारी करतोय पुण्याला..’

असं उत्तर देणा-या मुलांची संख्या ग्रामीण भागात अजिबात कमी नाहीये. खेड्यापाड्यातली अक्षरश हजारो; कदाचित लाखभरसुद्धा असतील, मुलं एकट्या पुण्यात स्पर्धा परीक्षांशी खेटत असतात.

आता हे लिहिताना सहज म्हणून शोधून पाहिलं तर मागच्या वर्षीच्या यूपीएससीच्या परीक्षेबाबतची काही सांख्यिक माहिती हाती लागली. एकूण चार लाख एक्कावन्न हजार मुलांनी संघ लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा दिली, त्यापैकी फक्त सोळा हजार नऊशे तेहतीस मुले मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरली.

पैकी सोळा हजार दोनशे शहाऐंशी जणांनी दिलेल्या त्या मुख्य परीक्षेतून तीन हजार तीनशे आठ मुले मुलाखतीपर्यंत पोहचली आणि त्यातली फक्त तेराशे चौसष्ट मुले अंतिमरित्या निवडली गेली. याचा अर्थ असा होतो की पूर्व परीक्षेला बसलेल्यांपैकी साधारण पाव टक्काच मुले त्या जबरदस्त शर्यतीत यशस्वी होतात.

यशाचे हेच गुणोत्तर जराशा कमीअधिक प्रमाणात कदाचित राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणा-या मुलांतही असू शकेल.

जिद्दीने पलीकडचा तीर गाठणा-याचं कौतुकच करायला हवं; पण बाकीच्यांचं काय?

त्यांनी पुन्हा तिथेच यायचं. – सौ का साठ बनानेका, बापजादोंका नाम चलानेका.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com