
मनोर/बोईसर : सूर्या नदीच्या पुरासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करत पुरामुळे झालेल्या नुकसान भरपाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. सूर्या नदीच्या पुरासाठी प्रशासकीय यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप करत पूर नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्याचे कुणबी सेनेने सांगितले. पूरपरिस्थितीसाठी जबाबदार अभियंत्यांवर कारवाईची मागणी कुणबी सेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात केली आहे.
मुसळधार पावसामुळे २६ ते २८ जुलैदरम्यान सूर्या नदीला पूर आला होता. मासवणच्या बंधाऱ्याचे दरवाजे न उघडल्याने नदीच्या प्रवाहाने उच्चांकी पातळी गाठली, तसेच धामणी धरणातून नियोजनबद्ध पद्धतीने पाण्याचा विसर्ग न करता प्रमाणाबाहेर पाणी सोडल्याने सूर्या नदीला पूर आल्याचा आरोप केला. पुरामुळे उर्से, पेठ, नानिवली, रावते, बोरशेती, किराट, रावते, नागझरी, निहे, लोवरे, काटाळे, मासवण, गुंदले, पांजरे, गिरनोली, सागावे, कोकणेर आणि चहाडे गावांतील भात लागवडीचे नुकसान झाले.
भात पीक पुराच्या पाण्यात तीन दिवस बुडालेल्या अवस्थेत असल्याने लागवड कुजली असून काही ठिकाणी भात पीक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. पाण्याच्या प्रवाहामुळे शेतजमीन खचल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. १९९८ मध्ये आलेल्या महापुरानंतरचा सर्वात मोठा पूर असल्याचे कुणबी सेनेने म्हटले आहे.
बंधारा गेला वाहून
मासवणच्या हद्दीतील कोल्हापूर टाइप बंधाऱ्याच्या फळ्या मे महिन्यात अखेरीस काढणे आवश्यक होते. फळ्या न काढल्यामुळे पुराची दाहकता वाढली, तसेच काही वर्षांपूर्वी मासवण बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला असलेल्या खामलोली गावच्या हद्दीतील बंधाऱ्याच्या फळ्या योग्य वेळी न काढल्याने हा संपूर्ण बंधाराच वाहून गेला.
धरणाचे दरवाजे उघडण्यास विलंब
सूर्या नदीवरील धामणी धरण ६० ते ७० टक्के भरल्यानंतर धरणाचे दरवाजे टप्प्याटप्प्याने उघडणे अपेक्षित होते. मात्र धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरच दरवाजे उघडण्यात आले. पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने सूर्या नदीची पाण्याची पातळी वाढून नदीला पूर आल्याचा आरोप कुणबी सेनेकडून करण्यात आला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.