River Conservation : वाळू उपसा वाढल्यामुळे नदीच्या आयुष्यात घट

River Water Conservation : मानव व त्याची कृषी संस्कृती वाहत्या नदी किनारी सुखाने नांदत असते, तेथे तिच्यावर शक्यतो बंधन नसावे आणि तिची छेडछाडही नसावी. सहा दशकांपूर्वीच्या एका मराठी सिनेमामधील ‘संथ वाहते कृष्णामाई’ हे गीत नदी पावित्र्याबद्दल खूप काही सांगून जाते.
River Conservation
River Conservation Agrowon

डॉ. नागेश टेकाळे

Water Management :
मानव व त्याची कृषी संस्कृती वाहत्या नदी किनारी सुखाने नांदत असते, तेथे तिच्यावर शक्यतो बंधन नसावे आणि तिची छेडछाडही नसावी. सहा दशकांपूर्वीच्या एका मराठी सिनेमामधील ‘संथ वाहते कृष्णामाई’ हे गीत नदी पावित्र्याबद्दल खूप काही सांगून जाते. तेच आपल्या बाबतीत ‘संथ वाहू दे नदीबाई’ असे सर्व नद्यांसाठीचे दैनंदिन प्रार्थनागीत म्हणून कायम मनात राहिले पाहिजे.

कोणत्याही नदीचे पात्र विस्तीर्ण होते, ते मुख्यतः तिच्या वाळूमुळे तयार झालेल्या समृद्ध किनाऱ्यामुळे. नदीपात्रात किती खोलीपर्यंत वाळू आहे, त्यावर त्या नदीचे बारमाही वाहणे अवलंबून असते. वाळूची खोली जेवढी जास्त तेवढे पावसाचे भूगर्भात साठलेले पाणी हळूहळू वर येते आणि नदी वाहू लागते.

नदी पात्रामधील वाळू जेवढी कमी, तेवढा नदीचा वाहण्याचा काळ कमी होत काही महिन्यांवर येतो. वाळू नसल्यामुळेच बहुतांश नद्या जानेवारी फेब्रुवारीमध्येच कोरड्या पडतात. त्या पुन्हा दुर्दैवाचा भाग म्हणजे उघडी पडलेली वाळू अधिकच उपसली जाते. परिणामी नदीचे आयुष्य कमी कमी होत ती कधी इतिहासजमा होते, याचा पत्ताही लागत नाही.

नदी आणि पाणी व्यवस्थापन
१९६०-७० पर्यंत देशाचा अर्धा ग्रामीण भाग नदीचेच पाणी पिण्यासाठी वापरत असे. त्या वेळची नदीकाठची शेती मी जवळून पाहिलेली आहे. नदीचे पाणी उपसून शेतीसाठी अगदी क्वचितच वापरले जाई. बहुतांश ही बागायत शेती भाजीपाला पिकविण्यापर्यंतच मर्यादित होती. नदीकाठच्या शेतीमध्ये जमिनीत कायम ओलावा असे.

कुणाच्या शेतात विहीर असेल तर तिला वर्षभर पाणी असे. आमच्या लहानपणी स्वच्छ वाहणारी नदी असे. तिच्या पाण्यात डुंबणे, झऱ्यामधील थंड स्वच्छ पाणी पिणे, सायंकाळी नदी किनाऱ्यावरील वाळूत गप्पांचे फड रंगवले जात. पावसाळ्यात दोन्ही काठांना कवेत घेत ओसंडून वाहणारी नदी. तिला जेमतेम एक दोन पूर येत. ते पाहायलाही गावातील लोकांची गर्दी होई.

असे असले तरी ही नदी पूर्वी कधी गावचे शिवार ओलांडत नसे. नदीचे पाणी शेतीशी फारसे जोडलेले नसले तरी उन्हाळ्यात तिच्या किनाऱ्यावरील वाळूत कलिंगडाचे पीक भरपूर घेतले जाई. खरेतर ते सारे वैभवच होते मुळी किनाऱ्यावरील वाळूमुळेच!

River Conservation
Water Conservation : ये हात मुझे दे दो ठाकूर...

आजकाल नद्या थांबल्या आहे, त्यांची डबकी बनली आहेत किंवा त्या नकाशावरून गायबच झाल्या आहेत, त्यामागील कारणांचा विचार केला असता पाच प्रमुख कारणे दिसून येतात. आपल्या दैनंदिन जीवनातील पाणी व्यवस्थापनामध्ये आज नदी कुठेही नाही. म्हणजेच आपल्या समाजाच्या दृष्टीने नद्यांचे महत्त्वच कमी होत संपून गेले. आज नद्यांना केवळ धार्मिक विधीपुरतेच महत्त्व उरले आहे. ज्याची गरज नाही, ती बाब नेहमी अडचण बनते.

परिणामी, नदीपात्र आक्रसून नद्यांचे वाहणे बंद झाले. १९७० च्या दशकापासून रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा मुबलक वापर होत गेला. त्यांचे अवशेष नदीपात्रात मिसळून वाहते पाणी प्रदूषित झाले. या प्रदूषित पाण्यामध्ये जलपर्णीसारख्या वनस्पतींचे थैमान निर्माण झाले. नद्याचे प्रवाहच थांबले.

खरेतर नदी किनाऱ्यालगतची ऊस शेतीसुद्धा नदीच्या नाशास काही अंशी कारणीभूत ठरत आहे. नदीची वाळू, रेती बांधकामास उत्कृष्ट मानली गेल्यामुळे त्यावरच इमारतींचे इमले उभे राहू लागले. बहुतांश ठिकाणी नदी पात्र हे सजीव राहण्याऐवजी स्मशानभूमी बनल्या. नदीपात्रावर झालेले मानवी आक्रमण आणि परिसरात वाढलेल्या रासायनिक उद्योगांचे प्रदूषण यामुळेही नद्या अस्तंगत झाल्या.

River Conservation
River Conservation : नद्यांच्या स्वच्छतेसाठी युवकांची भूमिका महत्त्वाची

प्राचीन काळी गंगा, यमुना, नर्मदा, कावेरी, सिंधू, कृष्णा, कोयना यांच्या तीरांवर मानवी संस्कृती विकसित झाली, बहरली. आज हीच संस्कृती आपल्या देशामधील नद्यांच्या नाशाला कारणीभूत ठरली आहे. गंगा शुद्धीकरणावर हजारो कोटींचा खर्च करावा लागतो, हे कशाचे निदर्शक आहे? इजिप्तमध्ये नाईल काठी विकसित झालेली संस्कृती जवळून पाहण्याची मला संधी मिळाली. इजिप्तच्या लांब धाग्याच्या कापूस हा नाईलच्या ओलाव्यावर पिकतो.

मात्र त्याच्या उत्पादनासाठी कुठेही नदी पात्रातून पाण्याचा उपसा होत नाही. पाकिस्तानमधील सिंधू नदीमधील वाळूचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन झाले. परिणामी, मागील वर्षी कोसळलेल्या मॉन्सूनच्या पावसाला वाळू अभावी ही नदी सामावूनच घेऊ शकली नाही. कोप पावलेल्या या नदीमुळे पाकिस्तानचे कृषी क्षेत्र कोलमडून गेले. मोठ्या नद्यामधील वाळू आवश्यक तेवढी जरूर उचलावी, मात्र त्यावर मर्यादा निश्‍चित हवी. कारण हा नैसर्गिक स्रोत असून, त्यास ओरबाडणे योग्य नव्हे!

मध्य प्रदेशमध्ये होशिंगाबाद जिल्ह्यात नर्मदा आणि तवा या दोन नद्या आहेत. त्यांचे दोन्हीही किनारे वाळू, रेतीने समृद्ध आहेत. नर्मदेपेक्षा तवा नदीची रेती जास्त उपयोगी आहे, म्हणूनच तिचा सर्वांत जास्त उपसा होतो. हजारो वर्षांनंतर प्रथमच मागील दोन- तीन वर्षांपासून तवा ही नदी उन्हाळ्यात कोरडी पडत आहे.

होशिंगाबाद जिल्ह्यात सर्वांत जास्त गव्हाचे उत्पादन होते. यामागील कारणाचा शोध घेताना तवा नदीकाठच्या दूरवर पसरलेल्या गहू क्षेत्रावरील जमिनीत रेतीचे अंश मला आढळले. निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये मुळांची वाढ छान पसरली होती. जेवढे खत दिले तेवढे पिकाने उचलले म्हणून उत्पादनात वाढ झाली. मात्र रेतीचा असाच उपसा सुरू राहिला, तर गव्हाच्या उत्पादनावर याचा परिणाम निश्‍चितच होणार आहे.

टेक्सासचे नदी संवर्धन, संरक्षण ः
नदी, तिचा उगम, वाहता शांत प्रवाह, तिच्या पात्रामधील तसेच किनाऱ्यावरील वाळूचे व्यवस्थापन तसेच नदीची जैवविविधता सांभाळण्याचे महत्त्व नेमके काय, हे सर्व मला टेक्सास विद्यापीठामध्ये समजले. तेथील ‘नदी संवर्धन आणि संरक्षण’ या विभागाने त्याबाबत केलेले कामही पाहावयास मिळाले. अमेरिकेमधील प्रत्येक नदीची सविस्तर माहिती या केंद्रामध्ये आपणास पाहावयास मिळते. प्रत्येक नदीचा त्या विभागावर होणारा आर्थिक परिणाम, तिच्यामधील जैवविविधता, प्रदूषणाचे स्रोत व त्यावरील नियंत्रण, नदी कुठे थांबलेली तर नाही ना? याची सविस्तर माहिती मिळते.

उत्तर आणि दक्षिण अमेरिकेमधील खळाळत वाहणाऱ्या अनेक लहान मोठ्या नद्या पाहिल्या, की अशा नदी संशोधन केंद्राचे महत्त्व अधोरेखित होते. मग मनात अनेक वेळा विचार येतो, की भारतात आपण लहानमोठ्या नद्यांना वाहते करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करतो खरे, पण काही दिवसातच पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’. पैसा खर्च करण्याविषयी काही नाही, मात्र तो योग्य ठिकाणी गेला पाहिजे. नद्यांच्या समन्वित कामांसाठी भौगोलिक विभागानुसार टेक्सास सारखेच अद्ययावत आणि स्वायत्त नदी संशोधन केंद्र का असू नये?

नदीच्या परिसंस्थेत हस्तक्षेप नकोच!
नदी नांगरणे हा सुद्धा असाच एक संशोधनाचा विषय ठरावा. नदी पात्रात भरपूर वाळू असेल तरच नदी वाहती राहते. या वाळूचा खरवडून पूर्ण उपसा करून खालचा भूपृष्ठ स्तर शेत जमिनीसारखा नांगरणे हे निसर्ग नियमांच्या विरुद्ध आहे. वाळूच्या खालच्या या भूस्तरात नदीमधील जैवविविधता सुप्तावस्थेत स्थिरावलेली असते.

नदीला नांगरून या भूस्तरास नष्ट करून आपण खालचा खडक उद्ध्वस्त करत असतो. असे नदीचे खोलीकरण मुसळधार पावसामुळे पूरसदृश वाहू लागते. पण हे भासमान असते. कारण भूगर्भात पाण्याचा एक थेंबही न मुरता हे सर्व पाणी वाहून जाते. याला नदी व्यवस्थापन म्हणावे का? निसर्गाच्या कुठल्याही घटकास तोडफोड, खोलीकरण, रुंदीकरण अजिबात मान्य नसते. उगमापासून सुदृढ असलेल्या नदीच्या काठावरील वृक्षसंपदा आणि तिच्या पात्रामधील वाळूचा सन्मान केला की नदी वाहू लागते.

पूर्वी नद्यांचा आपला संबंध पिण्याच्या पाण्याबरोबर स्नान करण्यासाठी, कपडे धुणे, पोहणे आणि धार्मिक कार्यापुरताच मर्यादित होता आता यातील फक्त धार्मिक कार्यच शिल्लक राहिले आहे. नदीवर अवलंबून असलेले आमचे पाणी व्यवस्थापनाचे गणित बिघडल्यामुळेच आज या अमृतवाहिनीचे आम्ही विषवाहिनीत रूपांतर केले आहे.

पाणी व्यवस्थापनाचे गणित मांडताना आम्हास नेहमीच नदी ही एक स्वतंत्र परिसंस्था आहे याचा विसर पडतो. नदीला तीन चार ठिकाणी अडवून, त्यावर लहान मोठी धरणे बांधली तर त्यास जल व्यवस्थापन कसे म्हणता येईल? जेव्हा वाहत्या नदीला अचानक असे कैद करून संपूर्णपणे अडवण्याचे काम करतो, तेव्हा तिच्या खालचा शेकडो मैलाचा भूभाग पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तहानलेला राहतो.

मानव सोडून अन्य सजीवांचा विचार आपण पाणी सोडताना अजिबात करत नाही. सपाट प्रदेशात जेथे मानव व त्याची कृषी संस्कृती वाहत्या नदी किनारी सुखाने नांदत असते, तेथे तिच्यावर शक्यतो बंधन नसावे आणि तिची छेडछाडही नसावी. सहा दशकापूर्वीच्या एका मराठी सिनेमामधील ‘संथ वाहते कृष्णामाई’ हे गीत नदी पावित्र्याबद्दल खूप काही सांगून जाते. तेच आपल्या बाबतीत ‘संथ वाहू दे नदीबाई’ असे सर्व नद्यांसाठी म्हणून लक्षात ठेवले पाहिजे. प्रथम ‘नदी अमृते वाहाविया’ या पद्य ओळीचा सन्मान करतच पाणी व्यवस्थापनाचे धडे गिरवले पाहिजेत.


Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com