
River Conservation पुणे : जिल्ह्यातील नद्यांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रशासन तसेच नागरी संस्थेच्या समन्वयातून प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी केले.
‘चला जाणूया नदीला’ अभियानासाठी स्थापन जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीचे निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप, जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर प्रशासनाचे जिल्हा सहआयुक्त व्यंकटेश दुर्वास, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर, विजय पाटील, प्रशांत कडुस्कर, महेश कानिटकर, जल बिरादरीचे महाराष्ट्र समन्वयक नरेंद्र चूग, विनोद बोधकर, शैलजा देशपांडे, विजय परांजपे, विनोद बोधकर, राजेंद्र गदादे यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. खराडे म्हणाले की, ‘‘नद्यांचे प्रदूषण कमी करणे, पाण्याचा वापर काळजीपूर्वक करणे, नद्यांचे नैसर्गिक स्रोत प्रवाही करणे आदींसाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.
त्यासाठी नदीला जाणून घेण्यासाठी नदी संवाद यात्रा काढण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य दिले जाईल.
या अभियानासाठी नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हा नियोजन समितीतून निधीच्या तरतुदीबाबतच्या प्रस्तावावर सकारात्मक कार्यवाही केली जाईल.’’
जलबिरादरीचे नरेंद्र चूग म्हणाले की, ‘‘जलसंपदा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, कृषी विभाग आदी विभागांचे या अभियानाच्या यशस्वितेसाठी महत्त्वाची भूमिका आहे.
पुणे जिल्ह्यातील राम नदी, मुळा, मुठा, पवना, घोड नदी, मीना, भीमा, वेळगंगा, इंद्रायणी अशा नऊ नद्यांचा या अभियानात समावेश करण्यात आला असून कऱ्हा व नीरा नदीच्या समावेशासाठी प्रयत्नशील आहे. या अभियानांतर्गत पवना नदी संवाद यात्रा पूर्ण झाली.’’
पर्यावरण क्षेत्रातील व्यक्ती, संस्था यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करता येतील. पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी पुणे शहरातील या क्षेत्रातील विविध संशोधन संस्था, महाविद्यालयांचे सहकार्य घेता येईल.
मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प अधिक चांगल्या प्रकारचे व्हावेत यासाठी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाकडून तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून घेणे, प्लास्टिक कचरा पाण्याच्या प्रवाहात जाण्यापासून रोखणे आदींबाबत या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.