Crop Management : पिके वाचविण्यासाठी व्यवस्थापनात बदल हवा

Kharif Season 2023 : आधीच उशिराच्या पावसावर झालेल्या पेरण्या आणि ऑगस्टमध्ये पडलेला मोठा खंड यामुळे खरीप पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
Crop Managment
Crop ManagmentAgrowon

Pune News : आधीच उशिराच्या पावसावर झालेल्या पेरण्या आणि ऑगस्टमध्ये पडलेला मोठा खंड यामुळे खरीप पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. या पिकांसह भाजीपाला, फळभाज्या आणि फळबागांच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांकडून सध्या प्रयत्नांची शर्त सुरू आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाचा ताण पडला आहे. आठ सप्टेंबरपासून पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुढील आठ दहा दिवस पिकांवर पावसाचा ताण राहण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर पीक, फळबागा व्यवस्थापनामध्ये काही उपाययोजना करणे आवश्‍यक असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले आहे.

राज्यात खरिपातील सरासरी १४२ लाख हेक्टरच्या तुलनेत १३७ लाख हेक्टर (९६) यंदा पेरणी झाली आहे. मात्र, असमतोल पाऊस आणि मोठा खंड यामुळे खरीप हंगाम विस्कळित झाला आहे. पिकांवर पाण्याच्या ताणासह रोग-किडींचे आक्रमण वाढले आहे. काही प्रमुख पिकांचे पुढील प्रमाणे व्यवस्थापन करावे आणि कीड-रोगांबाबत सावध असावे, असे तज्ज्ञांनी सुचविले आहे.

भात :

यंदा बऱ्याच ठिकाणी उशिरा लागवडी झाल्या आहेत. सध्या पीक फुटव्याच्या अवस्थेत आहे. हळव्या जाती पोटरीच्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. सध्या पावसाची उघडीप पीक वाढीसाठी उपयुक्त ठरणारी आहे. मात्र, उघडीप फार जास्त काळ राहिली तर वाढीवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो.

सोयाबीन :

सध्या पीक फुले लागणे आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. पावसाचा ताण आखणी वाढल्यास शेंगा भरण्याच्या अवस्थेवर परिणाम होऊ शकतो. काही ठिकाणी फूलगळ होऊ शकते. ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी तुषार सिंचनाने संरक्षित पाणी द्यावे. साठ दिवसांच्या पुढील पिकामध्ये पोटॅशिअम नायट्रेटची (१०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) फवारणी करावी. यामुळे पीक ताण सहन करू शकेल.

Crop Managment
Crop Management : सद्यःस्थितीत कापूस, सोयाबीन पिकाची घ्यावयाची काळजी

कापूस :

सध्या काही भागात पीक पाते लागण्याच्या तसेच पात्याच्या पुढील अवस्थेत आहे. पावसाच्या ताणामुळे पातेगळ होऊ शकते. याठिकाणी पिकाला संरक्षित पाणी द्यावे. जेथे जमीन भेगाळलेली आहे तेथे कोळपणी करून भेगा बुजवाव्यात, तण नियंत्रण करावे. प्रतिकूल वातावरणामुळे काही भागात पांढरी माशी, तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. नियंत्रणासाठी फवारणी करावी.

तूर :

तूर पीक पाण्याचा ताण बऱ्यापैकी सहन करू शकते. परंतु पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी संरक्षित सिंचन करावे. पाऊस पडल्यानंतर वाफसा आल्यावर पिकात कोळपणी करावी. पाण्याचा सोय नसलेल्या ठिकाणी २ टक्के युरियाची फवारणी करून घ्यावी.

मका :

जमिनीतील ओलावा पाहून संरक्षित सिंचन करावे. जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास पिकास संध्याकाळी नत्राची मात्रा द्यावी. वाफसा येताच कोळपणी करून घ्यावी. प्रतिकूल वातावरणामध्ये अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

टोमॅटो :

यंदा पावसामुळे लागवडी उशिरा आणि वेगवेगळ्या काळात झाल्यामुळे पीक वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत आहे. सध्याच्या काळात ताण बसू नये, यासाठी ठिबक सिंचनातून संरक्षित पाणी देणे आवश्यक आहे. पिकामध्ये नत्राचा वापर कमी करावा. सध्याच्या स्थितीमध्ये वाढ संजीवके कमी प्रमाणात वापरावीत.

फळबागांचे नियोजन

डाळिंब :

सध्या मृग बहराची बाग ‘सेटिंग’च्या अवस्थेमध्ये आहे. या बागांना

संरक्षित पाणी द्यावे, आच्छादन करावे, बाष्परोधकाची फवारणी करावी. पाण्याच्या ताणामुळे वाढीच्या अवस्थेतील बागांमधील फळांचा आकार लहान झाला आहे. काही ठिकाणी फळगळ, फूलगळ दिसत आहे. या ठिकाणी फळांची विरळणी करणे आवश्यक आहे. याठिकाणी ठिबक सिंचनाने संरक्षित पाणी द्यावे.

मोसंबी :

मोसंबी लागवड असलेल्या विभागात पुरेसा पाऊस झालेला नाही. झाडाच्या मुळांजवळील तापमानात वाढ झाल्यामुळे फळगळ दिसून येत आहे. फळगळ नियंत्रणासाठी बागेस संरक्षित सिंचन देणे आवश्यक आहे. आंबिया बहरातील फळांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

Crop Managment
Crop Management : पावसाच्या खंड काळात पिकांचे व्यवस्थापन

संत्रा :

ज्या भागात मागील महिन्यात जोराचा पाऊस झाला तेथे बागेत पाणी साचल्याने फळगळ झाली होती. अशा बागेत वाफसा लवकर येण्यासाठी दोन ओळीत चर काढून घ्यावा. काही भागात ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फळगळ दिसत आहे.

काही भागात अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने बागेला ताण बसला आहे. त्यामुळे देखील फळगळ दिसत आहे. अशा बागांमध्ये एक टक्का पोटॅशिअम नायट्रेटची फवारणी घ्यावी. यामुळे झाडावरील ताण कमी होईल, पोषण होईल. ठिबक सिंचनाद्वारे संरक्षित पाणी द्यावे.

लिंबू :

सध्या अंबिया बहराची फळे वाढीच्या टप्यात आहेत. ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. जेथे पावसाचा ताण आहे तेथे संरक्षित पाणी देणे आवश्यक आहे.

केळी :

मागील काही दिवसांपासून वातावरण उष्ण, दमट आहे. त्यामुळे केळीवर ‘पोंगा कूज’चा प्रार्दुभाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोंगा आणि जमिनीलगतचा बुंधा कुजतो. प्रादुर्भाव दिसताच नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. बागेला वेळापत्रकानुसार रासायनिक खतांच्या मात्रा द्याव्यात. कांदेबाग केळीच्या घडांची कापणी योग्य परिपक्वतेवर करावी. अधिक पक्व घडांवर फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. बागेत पडलेली केळी गोळा करून स्वच्छता राखावी.

सीताफळ :

लवकर बहर धरलेल्या बागेतील फळांचा हंगाम संपला आहे. परंतु पाणी कमी पडल्याने फळांचा आकार कमी राहिलेला आहे. ज्या बागा सेटिंगच्या अवस्थेत आहेत तेथे पाण्याचा ताण पडल्याने फळांच्या वाढीवर परिणाम होणार आहे. या बागांमध्ये संरक्षित पाणी देण्याची गरज आहे. काही भागांमध्ये मिलीबग किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. या ठिकाणी तातडीने नियंत्रणाची उपाययोजना करावी.

अंजीर :

पुरेसा पाऊस नसल्याने खट्टा बहराचे नियोजन लांबले आहे. त्यामुळे फळ उत्पादन देखील उशिरा सुरू होईल.

...अशी घ्या काळजी

- संरक्षित पाण्याची गरज

- प्रतिकूल वातावरणामुळे किडरोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता

-भेगाळलेल्या जमिनीत कोळपणी आवश्‍यक

- फळबागांमध्ये संरक्षित पाणी, आच्छादनाची आवश्‍यकता, सुक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी गरजेची

- पिकांमध्ये जलसंधारणासाठी मृतसरी काढावी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com