
Agriculture Success Story : गणेशवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील कर्नाटक सीमेजवळचे गाव. ते प्रामुख्याने दुग्ध प्रक्रिया उद्योग व द्राक्ष शेतीसाठी प्रसिद्ध. कोल्हापूर जिल्ह्यातील द्राक्षाचे सर्वाधिक क्षेत्र या गावात आहे. येथील प्रवीण प्रकाश बोरगावे व प्रमोद राजेंद्र बोरगावे हे दोघे सख्खे चुलतबंधू. प्रवीण यांनी बी. एस्सी (कृषी) केले आहे, तर प्रमोद यांनी दोन वर्षाची कृषी पदविका घेतली आहे.
प्रवीण यांनी निविष्ठा उद्योगात, तर प्रमोद यांनी साखर कारखान्यात आठ वर्षे नोकरी केली. प्रवीण हे आजही एका कृषी निविष्ठाविषयक खाजगी कंपनीत मार्केटिंगचे काम करत आहेत. त्या माध्यमातून त्यांना विविध शेतकऱ्यांपर्यंत पोचता येते व शेतिक्षेत्रातील विविध नवे ट्रेण्ड्स समजत राहतात.
त्यानंतर दोघांनीही स्वतःची शेती सुधारण्याचेच ध्येय ठेवले. २०१९ पूर्वी त्यांच्याकडे वडिलोपार्जित चार एकर शेती होती. ती पारंपरिक पद्धतीने केली जाई. या दोघा बंधूनी धाडस करत पॉलिहाऊस करण्याचा निर्णय घेतला. त्यातही फुलांऐवजी ढोबळी मिरची लागवडीचा निर्णय जाणीवपूर्वक घेतला. त्याला जोड दिली तरी परदेशी भाज्यांची.
अशी झाली सुरवात...
जानेवारी २०२० मध्ये दहा गुंठे पॉलिहाऊस उभारणीला सुरुवात केली. त्याच वर्षी मार्च अखेर आणखी एक दहा गुंठे पॉलिहाऊस शासकीय अनुदानातून उभारले. मिरचीचे उत्पादन सुरू होते न होते तोच एप्रिल मे मध्ये कोरोना व त्यामुळे लॉकडाउन जाहीर झाले. जून अखेरीस उत्पादन सुरू झाले. पण कोरोनातून बाजार अद्याप सावरलेला नसल्याने उत्पादीत मालाला बाजार शोधता शोधता नाकेनाऊ आले.
मात्र कच न खाता त्यांनी गोवा, बेंगळूरू, मुंबई, हैदराबाद बाजारपेठांमध्ये संपर्क साधला. त्यातून विविध विदेशी भाज्यांमध्ये संधी असल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी अन्य शेतामध्ये रेड चिली, लेमन ग्रास, ब्रोकोली सह विविध विदेशी भाज्यांच्या उत्पादनाला सुरुवात केली. मागणीनुसार केवळ २० गुंठ्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज स्वतःच्या १० एकरांसह भाडेतत्त्वावरील ३८ एकरांवर पोचला आहे.
दोघेही बंधू कृषी शिक्षणातील असल्याने नवीन पिके असतानाही त्यातील खाचाखोचा लवकर लक्षात आल्या. त्यामुळे अनेक बाबतीत प्रतिबंधात्मक उपायातून खर्चात बचत साधली आणि दर्जेदार उत्पादन मिळवणे शक्य झाले.
मागे वळून पाहिलेच नाही...
एप्रिल २०२० मध्ये ११ रुपये प्रति रोप दराने ६,००० रोपांची लागवड केली होती. त्यातून जून अखेरीस काढणी सुरू झाली. पहिल्या महिन्यात ६ टन, दुसऱ्या महिन्यात ५ टन, आणि फेब्रुवारी २०२१ पर्यंत एकूण ३० टन उत्पादन मिळाले. त्यावेळी कोरोनामुळे अनेक शेतकऱ्यांनी लागवड न करण्याचाच निर्णय घेतल्या बाजारात आवक कमी राहून उत्पादीत मालाला दर चांगला मिळाला.
त्या वर्षी सरासरी ११० रुपये प्रति किलो दर मिळाल्याने अर्धा एकरातून ३३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्या वर्षी खर्च १० लाख रु. झाला. यानंतर बोरगावे बंधूनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांनी जवळच परंतु कर्नाटकात असलेल्या शेडबाळ येथे ३ एकर शेती विकत घेतली. तिथे २०२३ मध्ये एक एकर पॉलिहाऊस उभे केले. त्यांनंतर दरवर्षी थोडेथोडे वाढवत आज तीन एकर क्षेत्रावर पॉलिहाऊस उभे आहे.
साधारण एक एकर पॉलिहाऊस उभारणीसाठी सुमारे ४० लाख रुपये खर्च येतो. हा प्राथमिक खर्च मोठा असला तरी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळत असल्याने मोठा आधार मिळतो. एकरी १२ हजार रोपे लावल्यानंतर ४० ते ४८ टनांपर्यंत उत्पादन मिळते. सरासरी ४० टन आणि बाजारभाव ८० रुपये प्रति किलो धरला तरी एकरी ३२ लाख रुपये उत्पन्न हाती येते. व्यवस्थापनाचा खर्च साधारण ५० टक्क्यांपर्यंत राहतो, असे प्रवीण यांनी सांगितले.
राज्याबाहेरील बाजारपेठांवर लक्ष...
प्रवीण व प्रमोद हे नात्याने चुलतभाऊ असले तरी त्यांच्यामध्ये प्रचंड एकोपा आहे. प्रवीण हे बाजारातील मागणी व विक्रीचे व्यवस्थापन पाहतात, तर प्रमोद हे सर्व शेती व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळतात. हिरव्या ढोबळीला स्थानिक बाजारात मागणी असली तरी रंगीत ढोबळी मिरची व परदेशी भाज्यांना फारशी मागणी नसते.
त्यामुळे प्रवीण यांनी बाह्य राज्यातील बाजारपेठांवरच लक्ष केंद्रित केले. त्यासाठी सुरुवातीला त्यांनी फसवणुकीचा धोका गृहीत धरतच थोडा थोडा माल गोवा, दिल्ली, हैदराबाद येथील व्यापाऱ्यांना पाठवला. काही वेळा फसगत झाली, काही वेळा चांगले अनुभव आले. त्यातून उत्तम व्यवहार असलेल्या व्यापाऱ्यांशी संपर्क ठेवत मागणीनुसार हळूहळू माल वाढवत नेला.
त्यांचा मालही दर्जेदार असल्याने गेल्या तीन चार वर्षात व्यापाऱ्यांशी विश्वासाचे नाते तयार झाले आहे. तरीही दिल्लीसारख्या बेभरवशी बाजारात शेतीमाल पाठवताना आगावू रक्कम घेतली जाते, तर अन्य ठिकाणी शेतीमाल पोचताच रक्कम घेतली जाते. अशा बऱ्यापैकी रोखीत चालणाऱ्या या व्यवहारामुळे वर्षभरातील व्यवस्थापन खर्चाचे गणित बसवणे शक्य झाले आहे.
कुठलेही सणवार वा सुट्ट्या न घेता वर्षभर व्यवस्थापन आणि कोणत्या ना कोणत्या पिकाची काढणी सुरू असते. शेडबाळ येथील पॉलिहाऊससाठी शेततळे व नदीतून सिंचनाची व्यवस्था केली आहे. प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र मजूर असले तरी अडीअडचणीमध्ये मजूर व शेतीमाल वाहतुकीसाठी स्वतंत्र वाहने आहेत. सकाळी लवकर काढणी सुरू होऊन दुपारी तीन वाजेपर्यंत प्रतवारी व पॅकिंग होते. यानंतर रेल्वे, ट्रॅव्हल्स यांच्या माध्यमातून भाज्या पाठवल्या जातात.
या शेतमालाचे होते उत्पादन
लाल व पिवळी ढोबळी मिरची, जलापिनो, लाल कोबी, पोकच्या, राॅकेट, हिरवी व पिवळी झुकिनी, सेलरी, लीक, थाईम, रोजमेरी, पार्सेली, लेमनग्रास, चेरी टोमॅटो, बर्ड चिली, बटरनेट, कॅथेर लाईम यांची पाने व लिंबू, गलंगन, ब्रोकोली, बेसिल इ. परदेशी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. यातील प्रत्येकाची लागवडीपासून काढणीपर्यंतचे व्यवस्थापन वेगळे असले तरी त्यांचे नियोजन आणि व्यवस्थापन बारकाईने केले जाते. परिपक्वतेच्या वेळा नेमक्या जाणून काढणी केली जाते.
प्रवीण बोरगावे, ८६०५५१००८२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.