Success Story : उत्तम व्यवस्थापनातून युवक सांभाळतोय ५२ एकर शेती

Article by Santosh Mundhe : जालना जिल्ह्यातील कंडारी बु. येथील अजिंक्‍य सिनगारे हा युवक उत्तम व्यवस्थापनातून ५२ एकरांतील एकात्मिक शेती यशस्वी सांभाळतो आहे.
Sinagare Family
Sinagare FamilyAgrowon
Published on
Updated on

संतोष मुंढे

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील कंडारी बुद्रुक या गावचे नवनाथ सिनगारे यांची तेथून तीन किलोमीटरवरील सोमठाणा शिवारात ५२ एकर शेती आहे. शेतीची ही जबाबदारी त्यांचा ३१ वर्षे वयाचा कृषी पदवीधर मुलगा अजिंक्य सांभाळतो आहे, वडिलांचे मार्गदर्शन, आई संगीता व व पत्नी कोमल यांची त्यास समर्थ साथ आहे. कुटुंबात सृष्टी हे लहान अपत्य आहे.

...असे आहे शेतीचे व्यवस्थापन

फळबागा व हंगामी अशी पीकपद्धती आहे. मोसंबीचे २५ एकर क्षेत्र असून वीस ते अलीकडे दीड वर्षे अशी पाच टप्प्यांत लागवड केलेली मोसंबीची ४५०० झाडे आहेत. एकरी सरासरी सात टन उत्पादन मिळते.

१५ ते ४० हजार रुपये प्रति टन दर मिळतो. दोन वर्षांपूर्वीच्या साडेनऊ एकरांतील मोसंबी बागेत पपईचे आंतरपीक आहे. अडीच एकरांत चार वर्षे वयाची भगवा डाळिंबाची बाग आहे.

Sinagare Family
Agriculture Success Story : मका, काकडी पिकातून मिळवले आर्थिक स्थैर्य

हंगामी पिके

१५ एकर सोयाबीन, ७ ते १० एकर कपाशी, पाच एकर सुधारित बीडीएन ७११ व गोदावरी वाणाच्या तुरीची लागवड असते. रब्बीत ४ ते ५ एकरांत मालदांडी ज्वारी, हरभरा, गहू अशी पिके असतात.

कपाशीचे एकरी १० ते १४ क्‍विंटल, तुरीचे ८ ते ९ क्‍विंटल, ज्वारीचे १४ ते १५ क्‍विंटल, गव्हाचे १२ पासून १६ ते १७ क्विंटलपर्यंत उत्पादन अजिंक्य घेतात. मागील रब्बीत नऊ एकरांतील बाजरीतून एकरी १४ ते १५ क्विंटल उत्पादन मिळाले. त्यास प्रति क्विंटल २८०० रुपये दर मिळाला.

सिंचन स्रोत केले बळकट

वारंवार उद्‍भवणारा दुष्काळ व कमी पावसाची स्थिती लक्षात घेऊन नवनाथ यांनी सिंचन स्रोत बळकट करण्यावर भर दिला. आज सहा विहिरी आहेत. जवळच्या सोमठाणा धरणावरून दोन वेळा पाइपलाइन केली आहे. कृषी विभागाच्या सामूहिक शेततळे योजनेतून शेततळे घेतले आहे.

सर्व विहिरींचे खोलीकरण व पुनर्भरण केले आहे. पूर्वी सात एकरांत ठिबक सिंचन होते, अजिंक्‍य यांनी शेतीची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ठिबकखालील क्षेत्र २२ एकरांवर नेले आहे. सिंचन व्यवस्था शाश्‍वत केल्याने २०१२ व त्यानंतरच्या दुष्काळात मोसंबी व अन्य बागा वाचविता आल्या. परिसरातील एका शेतकऱ्यानेही ही प्रेरणा घेत आपल्या शेतीत शाश्‍वत पाण्याची सोय केली. सुमारे ११ गावांना सिनगारे यांच्याकडील विहिरींमधून दुष्काळात पाणी देता आले.

Sinagare Family
Banana Processing Industry : केळी प्रक्रिया उद्योगातून स्वयंपूर्णता

शेतकरी कंपनीची स्थापना

अजिंक्‍य यांनी परिसरातील शेतकऱ्यांना एकत्र करून अजिंक्‍य पाटील शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना २०२२ मध्ये केली. त्या माध्यमातून ३७० सभासद जोडले. कंपनीच्या माध्यमातून गहू, हरभरा बीजोत्पादन करण्याचे प्रयत्न आहेत.

कंपनीद्वारे बदनापूर कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनातून एक गाव एक वाण संकल्पना अंतर्गत कपाशी उत्पादन, कापूस गाठीचे उत्पादनाचे प्रयत्न सुरू आहेत.

शेती व्यवस्थापनातील ठळक बाबी

सन १९९० पासून सिनगारे कुटुंब शेतातच वास्तव्यास. त्यामुळे शेतीचे व्यवस्थापन अधिक सुकर झाले आहे.

नवनाथ यांनी बांधावर सागाची ४७ झाडे लावली होती. अजिंक्‍य यांनी हा वारसा चालविताना जांभूळ ३०, नारळ ७० व केशर आंब्याच्या ५० झाडांची लागवड बांधावर केली आहे.

माल साठवणुकीसाठी ३० बाय १५ बाय फूट आकाराची तीन गोदामे.

शेताच्या प्रत्येक भागात जाणे शक्य व्हावे यासाठी बांधालगत रस्त्याचे नियोजन.

जर्मन शेफर्ड, लॅब्राडोर, रॉटव्हायलर, कारवान या प्रसिद्ध व दोन गावरान जातींचे श्‍वानपालन.

मध्य प्रदेशातील चार जोडपी तैनात करून मजूर व्यवस्थापन. दहा मजुरांना कायम रोजगार.

मुख्यमंत्री व कुसुम योजनेतून एकूण तीन सौर पंप. शिवारात वीजबिघाड झाली तरी शेतकऱ्यांच्या मदतीला अजिंक्‍य सदैव तत्पर असतात. मजुरांची समस्या पाहता अधिकाधिक कामे यंत्राच्या साह्याने करण्यावर भर. ट्रॅक्‍टर्स, मशागत, पेरणी यंत्रे, ‘कॉटन श्रेडर, थ्रेशर, ब्लोअर, रोटावेटर, पल्टी नांगर आदींची १५ वर्षांपासून भर.

पशुपालनाची भक्कम साथ

आजोबांच्या काळापासून सुरू असलेले जनावरे संगोपन अजिंक्य यांनी पुढे सुरू ठेवले. आज ३० जनावरे आहेत. यात १३ देशी गायी आहेत. दिवसा शेतातील घरासमोरील लिंबाच्या झाडाखाली जनावरांना चारा-पाणी केले जाते.

रात्री त्यांना गोठ्यात बांधले जाते. दोन शेळ्या आहेत. वर्षाकाठी सुमारे ४० ट्रॉली शेणखत मिळते. ५२ एकर शेतीची गरज लक्षात घेऊन बाहेरून आणले जाते. पाच वर्षांपासून शेतीत रासायनिक व सेंद्रिय खत असा ५०-५० टक्‍के वापर करण्याचे धोरण अजिंक्‍य यांनी अवलंबिले आहे.

१२ वर्षांपासून ‘बायोगॅस युनिट’ कार्यरत केले आहे. त्यातून घरचा स्वयंपाकासाठीचा व अन्य इंधन खर्च यात मोठी बचत साधली आहे.

अजिंक्‍य सिनगारे - ७७७७०७७१७४, ९११५११११२१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com