
Food Processing Success Story : मराठवाड्यातील अनेक महिला आज शेतीसह प्रक्रिया उद्योगात उतरल्या आहेत. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील कृषी विज्ञान केंद्राची त्यांना मदत मिळाली आहे. तेथून प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी आत्मविश्वासपूर्वक उद्योगात वाटचाल केली आहे. त्यातील काही प्रातिनिधिक उदाहरणे पाहूया.
नूडल्सचे विविध प्रकार
छत्रपती संभाजीनगर शहरातील सिद्धी गृह उद्योगाच्या छाया जगदीश साब्दे यांनी शेवया व मिरची कांडप यंत्राच्या साह्याने गृह उद्योग सुरू केला. प्रशिक्षणातून त्यांच्यात आत्मविश्वास जागृत झाला. विविध उत्पादनांच्या निर्मितीचा विचार करताना पालक बीट, आंबा, सीताफळ आदींवर आधारित शेवयांचे प्रकार पुढे आले. पालक, टोमॅटो नूडल्ससह मिलेट्सरूपी न्यूडल्सही त्यांनी बाजारात आणले.
शहरातच नव्हे तर राज्य व राज्याबाहेरही सिद्धी गृह उद्योगाची उत्पादने वितरित होत आहेत. लागणारा कच्चा माल त्या शेतकऱ्यांकडून घेतात. आज पंधरा प्रकारचे नूडल्स, आरोग्यवर्धक मिलेट्स लाडू, शेव अशी विस्तृत श्रेणी त्यांनी सादर केली आहे. वार्षिक उलाढाल पाच ते सात लाखापर्यंत असून ‘ऑनलाइन ट्रेडिंग’च्या माध्यमातूनही उत्पादनांना बाजारपेठ दिली आहे.
छाया साब्दे ८९९९०५६६९३
आरोग्यवर्धक रस
नांदेड जिल्ह्यातील अनिता गोविंद मोरे यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील साईराज नगरात सई फूड प्रॉडक्ट्स नावाने उद्योग थाटला. आवळ्यापासून कॅण्डी, क्रश, मुरांबा, सुपारी, पावडर, लोणचे यांच्यासह लिंबू- मिरची लोणचे अशी उत्पादने तयार करण्यास त्यांनी सुरुवात केली. शहरातील धूत हॉस्पिटल चौकात अनिता यांचे पती गोविंद विविध उत्पादनांची विक्री करतात.
यात कारल्याचा ताजा रस, गुळवेल, दुधी भोपळा, बीट, आवळा, कडुनिंब यांचे रस आदींचा समावेश आहे. सुमारे १४ वर्षांपासून या व्यवसायात सातत्य असून, या भागात सकाळी व्यायामाला येणारे नागरिक त्यांच्या उत्पादनांचे ग्राहक आहेत. या रसांच्या उद्योगातून वर्षाला किमान सव्वा लाखाची उलाढाल होते. अलीकडेच शहरातील खडी रोड येथेही रसांची विक्री सुरू केली आहे.
अनिता मोरे ९५२७२ ३१३१८
कोहळ्याचे सरबत
छत्रपती संभाजीनगर येथील आरती आबासाहेब मोराळे यांनी कोहळ्यापासून आरोग्यवर्धक सरबत तयार केले आहे. आयुर्वेदात त्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह किंवा रंग न वापरता विविध स्वादांमध्ये तयार केलेले हे उत्पादन ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे.
वर्षभरात सुमारे ४० क्विंटलपर्यंत कोहळा त्यांना प्रक्रियेसाठी लागतो. पंढरपूर भागातील शेतकऱ्यांकडून त्याची खरेदी होते. पुणे येथील प्रसिद्ध भीमथडी यात्रा तसेच अन्य प्रदर्शनांमध्येही या सरबताला मोठी मागणी असते. केवळ विक्री नव्हे तर ग्राहकांना आरोग्याविषयी जागरूक करण्याचीही जबाबदारीही आरती आवर्जून पार पाडत असतात.
आरती मोराळे ९४२१६७४३१८
आरोग्यवर्धक अंबाडीचे सरबत
सेंद्रिय शेती, मूल्यवर्धित आरोग्यवर्धक पदार्थ आणि थेट विक्री या त्रिसूत्रीचा अवलंब करून आरती कुलदीपक देशपांडे यांनी आपली उद्योजकता सिद्ध केली आहे. बहुगुणी लाल अंबाडीपासून त्यांनी तयार केलेल्या सरबत लोकप्रिय झाले आहे.
अंबाडीत विविध आरोग्यदायी पदार्थ विपुल प्रमाणात असतात अंबाडीपासूनच ‘येपीओ’ नावाने रेडी-टू-ड्रिंक स्वरूपातील उत्पादनही त्यांनी बाजारात आणले आहे.
पैठण तालुक्यातील बिडकीनपासून आठ किलोमीटरवरील जैनपूर शिवारात त्यांची शेती आहे. आपल्या शेतात त्या अंबाडी घेतात. वंडरलँड्स ही शेतकरी उत्पादक कंपनीही त्यांनी स्थापन केली आहे.
आरती देशपांडे ९४२३७८८३३०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.