Dairy Business : कुटुंबाच्या एकीतून घातली दुग्ध व्यवसायाला गवसणी

Article by Rajkumar Chaugule : मिणचे (ता. हातकणंगले) येथील सम्मेद व दर्शन शिखरे या युवा शेतकरी भावंडानी कुटुंबाच्या साथीने दुग्ध व्‍यवसाय फुलविला आहे. दोन म्हशींपासून सुरू केलेला व्यवसाय आज चाळीस जनावरांपर्यंत पोहोचला आहे.
Shikhare Family Dairy Business
Shikhare Family Dairy BusinessAgrowon
Published on
Updated on

Dairy Business Management : कोल्हापूर जिल्ह्यातील मिणचे (ता. हातकणंगले) येथील सम्मेद सतीश शिखरे व दर्शन सतीश शिखरे या बंधूंची पाच एकर शेती. यात चार एकरांत ऊस, तर एका एकरांमध्ये चारा पिकांची लागवड आहे. सम्मेद यांचे बीएसस्सी बॉटनी, तर दर्शन यांचे कृषी पदविकेपर्यंत शिक्षण झाले आहे. सम्‍मेद यांच्या पत्नी सौ. काजल या एमटेक,

तर दर्शन यांच्या पत्नी सौ. अंजली या बीएसस्सी (प्राणिशास्त्र) झालेल्‍या आहेत. दोन्ही दांपत्य उच्चशिक्षित असूनही त्यांनी दुग्ध व्‍यवसायाला प्राधान्‍य दिले आहे. शेतीपूरक क्षेत्रात एकत्रितपणे काही तरी करायचे याच भावनेतून दुग्ध व्यवसाय सुरू करून तो यशस्वीही केला आहे. कुटुंबाच्या एकत्रित परिश्रमातून मिळालेले यश हीच शिखरे कुटुबीयांची खरी ओळख बनली आहे.

व्यवसायाचा प्रारंभ :

तीन वर्षांपूर्वी दोन म्हशींपासून व्यवसायाचा श्रीगणेशा केला. २०२२ मध्ये कर्ज काढून हरियानामधून दहा म्हशी विकत आणल्या. त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून सहा महिन्यांत पुन्हा पाच म्हशी खरेदी केल्या.

नुकत्याच आणखी वीस म्हशी घेतल्‍या आहेत. सध्‍या गोठ्यामध्ये ७ एचएफ गाई, तर २७ मुऱ्हा म्हशी आणि ६ वासरे आहेत. सुरुवातीच्‍या काळात भौतिक सुविधांपेक्षा जनावरांच्‍या आरोग्याकडे प्राधान्याने लक्षकेंद्रित केले. यामुळे भांडवलात वाढ होत गेली.

Shikhare Family Dairy Business
Dairy Business : दांपत्याने एकहाती पेललेला यशस्वी दुग्ध व्यवसाय

मुक्त व बंदिस्त गोठा :

जनावरांच्या संख्येत हळूहळू वाढ केल्यानंतर सहा गुंठ्यात बंदिस्त व मुक्त संचार असे दोन गोठे उभारले. त्यात दोन गुंठ्यांचे शेड आहे. दिवसभर जनावरे मुक्त गोठ्यात असतात. तर धारा काढण्याच्या वेळी बंदिस्त गोठ्यात आणून बांधली जातात. याशिवाय अडीच हजार स्क्वेअर फुटांमध्ये कोरड्या चाऱ्यासाठी स्वतंत्र गोदाम बांधले आहे.

भाकड काळ कमी होण्यासाठी प्रयत्‍न :

एक म्हैस १ तारखेला व्यायली तर पुढच्‍या एक तारखेला म्हशीचे रेतन केले जाते. पहिला माज २१, दुसरा माज ४२ व्‍या दिवशी, तर तिसरा माज ४८ किंवा ५१ व्या दिवशी येतो. साधारणतः ४२ व्‍या दिवसांपर्यंत रेतन केले जाते. म्हैस व्यायल्‍यानंतर आठव्‍या आणि २१ व्‍या दिवशी गर्भाशयात औषध सोडून गर्भाशय स्वच्छ करून घेतले जाते.

यामुळे दूध उत्पादनात वाढ मिळण्यासह म्हशीचे आरोग्यही चांगले राहते. गाभण म्हशींचे दूध आठव्या महिन्‍यात बंद केले जाते. व्यायल्‍यानंतर म्हैस लवकर भरविल्‍यास भाकड काळ कमी होत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. भाकड जनावरे गृहीत धरून एका म्हशीने आठ लिटर तर गायींनी दररोज सरासरी १६ लिटर दूध दिले पाहिजे असे नियोजन केले जाते.

असे सूत्र असेल तरच दुग्ध व्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडत असल्याचा त्‍यांचा अनुभव आहे. गोठ्यात म्हशीचे २५० लिटर, तर गायीचे ७० लिटर दूध प्रतिदिन संकलित होते. दूध विक्रीतून दर महिन्याला सुमारे ४ लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. शेणापासून गांडूळ खत तयार केले जाते. खर्च वजा जाता एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.

संपूर्ण कुटुंब राबते गोठ्यात :

गोठ्यातील कामांसाठी एकही मजूर ठेवलेला नाही. गोठ्यातील सर्व कामांची जबाबदारी शिखरे कुटुंबातील प्रत्येक सदस्याने वाटून घेतली आहे. वडील सतीश शिखरे, आई सौ. शीला यांच्यासह सर्व जण गोठ्यात राबतात.

सौ. काजल या घरकाम सांभाळत नोकरी करतात. दररोज सकाळी चार वाजता कामांस सुरुवात होते. सुरुवातीला जनावरांना पशुखाद्य दिले जाते. मुक्‍त गोठ्यातील गव्हाणीत चारा टाकला जातो. त्यानंतर बंदिस्त गोठ्यात धारा काढल्या जातात. धारा काढण्यासाठी मिल्‍किंग मशीनचा वापर केला जातो. ही सर्व कामे सकाळी नऊ वाजेपर्यंत पूर्ण केली जातात.

Shikhare Family Dairy Business
Dairy Business : कुटुंबाच्या साथीने केला यशस्वी दुग्धव्यवसाय

महिला सदस्यांचा होतो सन्मान :

शिखरे कुटुंबीयांच्या गोठ्याचे मुख्य वैशिष्‍ट्य म्हणजे घर सांभाळून दुग्ध व्यवसायात काम करणाऱ्या कुटुंबातील प्रत्येका महिला सदस्‍यांना दरमहा दहा हजार रुपये देऊन त्यांचा सन्मान केला जातो. गोठ्यातून मिळालेल्या उत्पन्नातून ही रक्कम बाजूला ठेवली जाते. ती रक्कम खर्च करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य त्या महिलेस असते.

घरच्या गोठ्यात राबून मिळणारा वेगळा मोबदला हा निश्‍चितच कुटुंबातील महिलांचा सन्मान वाढविणारा ठरला आहे. महिलांना दिलेल्या वैयक्तिक रकमेशिवाय कौटुंबिक खर्चासाठी पंधरा हजार रुपयांची स्वतंत्र तरतूद केली जाते. शिल्लक राहिलेला नफा जनावरे वाढविण्याबरोबर अन्य खर्चासाठी वापरला जातो.

घरातील प्रत्‍येक सदस्‍यांच्या श्रमाचे मूल्‍य समप्रमाणात होत असल्याने आर्थिक बाबींवरून कुठेही अडचणी निर्माण होत नाहीत. शिखरे कुटुंबाने समानता दाखवत घरातील महिला व पुरुष सदस्यांना समानतेच्या एका धाग्‍यात गुंतले आहे. ही आदर्शवत बाब दुग्ध व्‍यवसायातील यशाबरोबरच कुटुंबातील वातावरण निखळ राखण्यासाठीही महत्त्वाची ठरली आहे.

दर्शन हे गोठा व्‍यवसायाबरोबर हरियानातून गाई, म्हशी आणून त्‍यांची विक्री करतात. परिसरातील शेतकरी गोठ्यात येऊन जनावरांची खरेदी करतात. गोठ्याबरोबरच उत्पन्न वाढीचा एक वेगळा मार्ग त्यांनी निवडला आहे. येत्या काळात शिखरे कुटुंबाचा दुग्ध व्यवसाय या विषयावर ऑनलाइन प्रशिक्षण देण्याचा मानस आहे.

...असे आहे खाद्य नियोजन

हिरवा चारा म्हणून हत्तीघास, मका यांचा वापर.

कोरडा चारा म्हणून कडबा आणि गहू भुस्सा.

प्रति जनावर प्रतिदिन कोरडा चारा ४ ते ६ किलो, तर हिरवा चारा २५ ते २८ किलो.

मुक्त गोठ्यात चारा देण्यासाठी प्लॅस्‍टिक गव्हाणीचा वापर.

सरकी पेंड, हरभरा चुनी, गुळ इ.चा वापर. प्रति जनावर ६ ते ७ किलो पशुखाद्य दिले जाते.

व्यायलेल्या म्हशीला १०० ग्रॅम गूळ दररोज दिला जातो.

सम्मेद शिखरे ७७७६९९४५६४ दर्शन शिखरे ९३७०४१९१९७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com