Dairy Business : चाळीस वर्षांची दुग्धप्रक्रियेची यशस्वी परंपरा

Dairy Milk Business : कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील उदगाव (ता. शिरोळ) येथील मादनाईक कुटुंबाने दुग्धप्रक्रिया व्यवसायात चाळीस वर्षांची यशस्वी परंपरा जपली आहे. कुटुंबातील युवा पिढीचे प्रवीण सध्या व्यवसायाची धुरा समर्थपणे सांभाळतात.
Dairy Business
Dairy BusinessAgrwon

Dairy Farming : कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील उदगाव (ता. शिरोळ) येथे कुबेर मादनाईक यांचे एकत्रित कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांना तीन मुले. पैकी डॉ. राजेश डॉक्‍टर आहेत. राकेश यांचे दूध संकलन केंद्र आहे. ते घरची सहा एकर शेतीही पाहतात. तर प्रवीण यांनी ‘मेकॅनिकल’ पदविका घेतल्यानंतर वडिलांचा दुग्धप्रक्रिया व्यवसाय पाहण्यास सुरुवात केली.

कुटुंबाचे जयसिंगपूर येथे न्यू रत्नदीप दुग्धालय नावाने दुकान आहे. तिथेच दुधावर प्रक्रिया करून विविध पदार्थांची निर्मिती व विक्री होते. सन १९८४ पासून कुटुंबाला या व्यवसायाची परंपरा असून ती आजगायत यशस्वीपणे टिकवण्यात कुटुंबाला यश आले आहे.

Dairy Business
Dairy Farming : सचोटी, प्रामाणिकता अन् एकीतून यशस्वी दुग्ध व्यवसाय

तयार होणारी उत्पादने

वर्षभरातील सण- समारंभ लग्नसोहळे आदी सर्व विशेष दिन लक्षात घेऊन गरज व मागणीनुसार आठ ते नऊ पदार्थांची निर्मिती हे कुटुंब करते. यात बासुंदी, श्रीखंड, आम्रखंड, फ्रूटखंड, पनीर, तूप, सीताफळ, आंबा व गुलकंद रबडी, दही, ताक आदींचा समावेश असतो. घरच्या दूध संकलनाद्वारे दररोज १५० ते २०० लिटर दूध उपलब्ध होते.

रोजची मागणी पाहून त्यावर प्रक्रिया सुरू होते. त्यासाठी खवा निर्मिती यंत्र, क्रीम सेपरेटर तसेच आवश्‍यक सर्व यंत्रसामग्री घेतली आहे. दह्यासाठी विरजण चांगले लागावे यासाठी यंत्राचा वापर केला जातो. विरजण लावल्‍यानंतर बाहेरील तापमानाचा अंदाज घेऊन यंत्राद्वारे तापमान नियंत्रित केले जाते. यामुळे चांगल्‍या दर्जाचे दही तयार होते. पदार्थांचा स्वाद नैसर्गिक ठेवण्यावर भर असतो.

मादनाईक यांच्याकडील बासुंदी विशेष प्रसिद्ध आहे. मलईचा वापर तसेच मंद आचेवर ती तयार केली जात असल्याने त्याला स्वाद वेगळा आहे. किरकोळ ग्राहकांबरोबर लग्न व अन्‍य कार्यक्रमांसाठीही त्यास कायम मागणी असते. जयसिंगपूर शहरामधील अनेक हॉटेल्समधूनही ‘राइस प्‍लेट’ सोबत ‘स्वीट’ म्हणून ही बासुंदी दिली जाते. शहरातील ग्राहक आपल्या नातेवाइकांना देखील ही बासुंदी आवर्जून देतात. अशा रीतीने पश्‍चिम महाराष्ट्रातून कोकणापर्यंत ही बासुंदी घरोघरी पोहोचते.

तुपाचे वेगळेपण

मादनाईक यांच्याकडील गायीच्या व म्हशीच्या तुपाचाही खास ग्राहक वर्ग आहे. अगदी मुंबईपर्यंत हे तूप पोहोचले आहे. आठवड्याला तीनशे लिटर दुधापासून घरगुती पद्धतीने तूप तयार केले जाते. ‘मिल्क सेपरेटर’द्वारे साय वेगळी करून ती साठवली जाते. साय कढवून त्याचे तूप केले जाते. खाण्या व्यतिरिक्त मंदिरात दिवा लावण्यासाठीही या तुपाला मागणी असते. प्रक्रिया पदार्थांबरोबर संकलित दूधही पॅकिंगद्वारे थेट विकले जाते.

Dairy Business
Dairy Farming : सचोटी, प्रामाणिकता अन् एकीतून यशस्वी दुग्ध व्यवसाय

विक्री व्यवस्थेचे नियोजन

मादनाईक कुटुंब अनेक वर्षांपासून या व्यवसायात असल्याने वर्षभरातील कोणत्या हंगामात कोणत्या पदार्थांना कशी व किती मागणी असते याची पूर्ण अटकळ आलेली आहे. उन्‍हाळ्यामध्ये दूध, दही, ताक याची विक्री मोठ्या प्रमाणात होते. यामुळे या दिवसांत हे पदार्थ अधिक प्रमाणात तयार केले जातात.

पावसाळ्यातील दोन महिने थोडी मंदी असते. त्यानुसार पदार्थाची निर्मिती होते. श्रावणापासून ते दिवाळीपर्यंत गोड पदार्थांना अधिक मागणी असते. हे पदार्थ उपवासाला चालत असल्‍याने या काळातही नियमित मागणी असते.

वर्षभराचा एकूण अंदाज घेता दररोज २५ किलोपासून ते २०० किलोपर्यंत बासुंदीची विक्री होते. तर दररोज १५ ते १६ किलो खवा, २० किलो पनीर तर चक्का, आम्रखंड, फ्रूटखंड, श्रीखंड आदी पदार्थ २० किलो याप्रमाणे तयार केले जातात. जादा पदार्थ तयार करायचे असतील तर आदल्‍या दिवशी ‘ऑर्डर’ द्यावी लागते. दररोज सुमारे २० ते २५ हजारांपर्यंत उलाढाल होते. वीस टक्क्‍यांपर्यत नफा राहतो. जवळपास सर्व विक्री जागेवरच होते.

परंपरा जपली

दुग्धालयाच्या व्यवस्थापनात प्रवीण यांना वडील कुबेर तसेच संगणक क्षेत्रात बीई झालेल्या पत्नी स्नेहा यांची मोठी मदत होते. दोन कर्मचाऱ्यांना रोजगार मिळाला आहे. कुबेर यांचा व्‍यवसायातील अनुभव मोठा असल्याने त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकून त्यात तरबेज होणे प्रवीण यांना शक्य झाले. पत्नी स्नेहा. त्याही या कामात त्यांना मदत करतात. एकेकाळी केवळ एक दोन पदार्थांच्या निर्मितीतून

सुरू झालेला व्यवसाय आज चांगला नावारूपास आला आहे. कितीही मोठी ऑर्डर आली तरी

गुणवत्तेत कधीच तडतोड केली नाही. ग्राहकांसोबत विश्‍वासार्हता जपली. त्यामुळेच परिसरात

अनेक मोठे ब्रॅण्ड असून देखील व्यवसायात यशस्वी टिकून राहणे शक्य झाल्याचे

प्रवीण यांनी सांगितले. शिवाय ‘मार्केट’चा अभ्यास करून काळानुसार ग्राहकांचा कल ओळखून

उत्‍पादने वाढविली. नजीकच्या काळात आणखी पदार्थ तयार करण्याचे नियोजन आहे.

प्रवीण मादनाईक, ९९२१०६१००८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com