
ॲग्रोवन वृत्तसेवा
Akola News : अकोला ः शासकीय सोयाबीन खरेदी प्रक्रियेत सुमारे १२९७ क्विंटल सोयाबीन परस्पर गायब झाल्याचे प्रकरण जिल्ह्यात उघडकीस आले आहे. शेतकरी उत्पादक कंपनीच्या खरेदी केंद्रावर या खरेदीच्या खोट्या नोंदी झाल्याने या बाबत पोलिसांनी गुन्हाही नोंदवत चौकशी सुरू केली.
हे प्रकरण पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा आता तपासणार आहे. मात्र या प्रकरणाची जानेवारीतच कुणकुण लागलेली असताना प्रशासनाने तब्बल दोन महिने कशाची प्रतीक्षा केली, या बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनीही विधिमंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा उचलत यंत्रणांच्या कारभाराचे वाभाडे काढले.
सोयाबीन खरेदी प्रक्रियेत अनियमितता होत असल्याचा आरोप यापूर्वीच शेतकऱ्यांनी केला होता. मात्र सरकारी यंत्रणांकडून दुर्लक्ष केल्या गेले. बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथील केंद्रावर खरेदी केलेले सोयाबीन गोदामात जमा केले नसल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला. या प्रकरणी खरेदीदार असलेल्या अंदुरा ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीच्या संचालकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले. पणन विभागामार्फत सोयाबीन खरेदीसाठी या शेतकरी कंपनीला परवानगी देण्यात आली होती.
हंगामात कंपनीने येथे शेतकऱ्यांकडून १९ हजार ७२३ क्विंटल सोयाबीन खरेदी केल्यानंतर वेअर हाउसमध्ये मात्र १८ हजार ४२६ क्विंटल माल जमा केला. १२९७ क्विंटल सोयाबीनच्या खोट्या नोंदी केल्या गेल्या. यामुळे सुमारे ७० शेतकऱ्यांची ६३ लाख ४४ हजार ९२४ रुपयांची फसवणूक झालेली आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना माहिती दिली होती. मात्र, त्यांनी या विषयाला गांभिर्याने घेतले नसल्याचे दिसून आले. २३ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत हा घोळ झालेला असताना तब्बल दोन महिन्यांनी म्हणजेच २३ मार्चला अधिकाऱ्यांनी पोलिस तक्रार केली. संगनमताने हा प्रकार झाला तर नाही ना, अशी शंकाही शेतकरी घेत आहेत.
शेतकऱ्यांच्या चुकाऱ्याचे काय
या प्रकरणात १२९७ क्विंटल सोयाबीन शासनाकडे जमा झालेले नाही. त्यामुळे या मालाचे चुकारे आता कसे होतील हा प्रश्न शेतकऱ्यांना चिंतातुर करीत आहे. पोलिस तपासाला आता सुरुवात झाली. हे प्रकरण किती महिने रेंगाळेल, हे निश्चित नाही. त्यामुळे सोयाबीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना चुकाऱ्यांची चिंता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.