
Rural Enterpreneurship: परभणी जिल्ह्यातील लोणी बुद्रुक (ता.पाथरी) येथील शेतकरी कुटुंबातील महिलांनी एकत्र येऊन उमेद अभियानांतर्गत महिला स्वयंसाह्यता गट स्थापन केला. शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग तसेच अन्य पूरक उद्योग सुरू केले आहेत. या गटाने तयार केलेल्या मसाल्यांच्या ‘अन्नपूर्णा’ ब्रॅण्डने बाजारात ओळख तयार केली आहे. घरगुती उद्योगाद्वारे महिला स्वावलंबी झाल्या आहेत.
पाथरी ते सोनपेठ रस्त्यावर दहा किलोमीटवर बाभळगाव फाट्यापासून पश्चिमेस दोन किलोमीटरवर लोणी बुद्रुक हे सुमारे तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात लोकाभिमुख उपक्रम राबविले जातात. ग्राम विकासात गावाने जिल्ह्यात ओळख निर्माण केली आहे. महिला सक्षमीकरणासाठी लोणी गावात विविध यंत्रणांतर्गत वीसहून अधिक महिला बचत गट कार्यरत आहेत. उमेद अभियानांतर्गत सहयोगींनी बचत गटांचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर २०१८ मध्ये शेतकरी कुटुंबातील महिलांच्या पुढाकारातून धनश्री महिला स्वयंसाह्यता गटाची स्थापना करण्यात आली.
या बचत गटाच्या अध्यक्ष आशा नारायण फुके आणि सचिव मीना ज्ञानेश्वर फुके कार्यरत आहेत. गटाच्या सदस्यांमध्ये इरफाना रेहान शेख, यास्मिन मोबीन शेख, ज्योती आश्विन फुके, गोकर्णा नरेश फुके, कौशल्या राजेभाऊ गिराम, शारदा साधू गिराम,अजीमुल्ल हकिम शेख, आस्मा रियान शेख यांचा समावेश आहे. बचत गटाचे पाथरी येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत खाते उघडण्यात आले.दर आठवड्याला प्रति सदस्य २५ रुपयांनुसार महिन्याला १०० रुपये बचत केली जाऊ लागली.
दर आठवड्याला बचत गटाच्या बैठका होऊ लागल्या.त्यावेळी गरजू सदस्यांच्या मागणीनुसार गटांतर्गत कर्ज वितरण तसेच वसुली सुरू झाली. यातून ३० हजार रुपये फिरते भांडवल मिळाले. काही सदस्यांना उद्योग सुरू करण्यासाठी रक्कम वाटप करण्यात आली. आजवर १ लाख ८० हजार रुपये फिरते भांडवल जमा झाले आहे. फिरत्या भांडवलात वृद्धी होत आहे. बचत गटाने आजवर कर्ज घेतलेले नाही. फिरत्या भांडवलातूनच गरजू सदस्यांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसाह्य करण्यात आले.
गृह उद्योग - व्यवसायातून आत्मनिर्भरता
बचत गटांकडून मिळालेल्या आर्थिक भांडवलावर विविध गृह उद्योग तसेच शेतीपूरक उद्योग सुरू झाले आहेत. चार वर्षांपूर्वी मीना फुके यांनी गाय, म्हैस खरेदी करून दुग्ध व्यवसाय सुरू केला. आजीमुल्ल यांनी शेळीपालन सुरू केले.ज्योती फुके यांनी शिवणकाम, गोकर्णा फुके यांनी घरगुती पिठाची गिरणी सुरू केली. आस्मा यांच्या कांडप यंत्रावर गावातील महिला मिरची पावडर, धने पावडर, हळद पावडर, मसाले तयार करून नेतात. त्यातून दिवसाकाठी ३०० ते ४०० रुपये उत्पन्न सुरू झाले आहे. गोकर्णा फुके यांच्या पीठ गिरणीवर ज्वारी, बाजरी, गहू धान्याचे पीठ तयार करून दिले जाते.
प्रशिक्षणातून सक्षमता
बचत गटांतील महिलांसाठी भारतीय स्टेट बँकेच्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे (आर-सेटी) लोणी गावात सात दिवसांचे प्रशिक्षण घेण्यात आले. परभणी येथे तीन दिवसांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये विविध गृह उद्योग, शेतीपूरक उद्योग उभारणी, उत्पादनांची निर्मिती, पॅकिंग, लेबलिंग, विक्री कौशल्ये याबाबत प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती देण्यात आली. त्यातून महिलांचा आत्मविश्वास वाढला. याचा घरगुती व्यवसाय सुरू करण्यासाठी उपयोग झाला.
काळा-गोडा मसाला निर्मिती
धनश्री महिला गटाच्या अध्यक्षा आशा फुके, ज्योती फुके, गोकर्णा फुके यांनी मसाले उद्योग सुरू करण्याचे ठरविले. प्रायोगिक तत्त्वावर छोट्या प्रमाणात काळा तसेच गोडा मसाला तयार केला. गावातील शेजारी तसेच नातेवाइकांना वितरित केला. दर्जेदार मसाल्याची चव सर्वांच्या पसंतीस उतरली. मागणी वाढल्याने मोठ्या प्रमाणावर मसाले निर्मिती करण्याचा निर्णय या तिघींनी घेतला. या प्रक्रिया उद्योगासाठी सासू, सासरे, पती यांचे मार्गदर्शन आणि पाठबळ मिळाले. मसाल्यासाठी आवश्यक लाल मिरची घरच्या शेतातून उपलब्ध होते.
धने, फूल, खोबरे, खसखस, तेल, लवंग, मिरे, मीठ, तमालपत्र आदींची बाजारातून खरेदी केली जाते. मसाला तयार करण्यासाठी आवश्यक घटक पारंपरिक पद्धतीने चुलीवर भाजून घेतले जातात. गटातील सदस्या आस्मा शेख यांच्या कांडप यंत्रावर मसाला तयार केला जातो. चुलीवर भाजल्यामुळे मसाल्याला विशिष्ट चव येते. त्यामुळे या उत्पादनास ग्राहकांची चांगली मागणी असते. ग्राहकांच्या मागणीनुसार महिन्याला साधारणतः १० ते २० किलो मसाले तयार केले जातात. प्रदर्शनांचा कालावधी लक्षात घेऊन मसाला उत्पादन वाढविले जाते. मसाला उत्पादनाच्या बरोबरीने घरगुती पद्धतीने तयार केलेला यसोर मसाला, तीळ लाडू, बाजरीपासून तयार केलेल्या खारवड्या, पापड्या आदी उत्पादने बचत गटातील महिला तयार करतात.
शेती नियोजनात सहभाग
धनश्री स्वयंसाह्यता गटातील बहुतांश सदस्याच्या मुख्य व्यवसाय शेती आहे.सोयाबीन, कापूस, ज्वारी, गहू, हरभरा आदी पिके,भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. खरीप तसेच रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणी ते काढणी पर्यंतच्या कामात कुटुंबातील इतर सदस्यांसोबत या महिलांचा सहभाग असतो. शेती कामे करून उरलेल्या वेळेत गृह उद्योगाचे व्यवस्थापन केले जाते.
विक्रीचे नियोजन
पॉलिथिन पिशवीमध्ये ५० ग्रॅम ते १ किलो वजनामध्ये मसाल्याचे पॅकिंग केली जाते. त्यावर अन्नपूर्णा नावाचे लेबल लावले जाते. प्रति किलो ६०० रुपये हा मसाला विक्रीचा दर आहे. दर्जेदार मसाल्यांची गाव परिसर तसेच विविध गावांमध्ये विक्री होते. विविध ठिकाणच्या महिला बचत गटांच्या प्रदर्शनात स्टॉल लावला जातो. उमेद अभियानांतर्गत यंदा परभणी येथे झालेल्या मिनी सरस प्रदर्शन तसेच मुंबई येथे आयोजित महालक्ष्मी सरस प्रदर्शनात धनश्री महिला बचत गटाचा स्टॉल लावण्यात आला होता.
परभणी येथील प्रदर्शनात २० किलो मसाला विक्री झाली. मुंबई येथे बारा दिवसाच्या कालावधीत ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.मसाल्याची चव चाखलेल्या ग्राहकांनी या कालावधीत दोन वेळा मसाला खरेदी केली. या काळात १ लाख १० हजार रुपये किमतीच्या मसाल्याची विक्री झाली.त्यातून खर्च जाता ४० हजार रुपये नफा मिळाला. मसाले तसेच इतर उत्पादनांची मागणी वाढत आहे.त्यामुळे आत्मविश्वास वाढला आहे.
उमेद अभियानाचे तालुका तसेच जिल्हा स्तरावरचे अधिकारी, सहयोगीनी सरस्वती मायंदळे यांच्याकडून बचत गटाला माहिती मिळते. येत्या काळात गटातील सदस्याच्या गाई, म्हशीच्या दुधापासून तूप तयार करून विक्री करणार आहोत. शेतीमालावर आधारित इतर घरगुती उत्पादनाची निर्मिती करून उत्पन्नाचे स्रोत भक्कम करण्याचा गटाचा मानस आहे. गटाच्या माध्यमातून महिलांची शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झाली आहे, असे आशा फुके, ज्योती फुके, गोकर्णा फुके यांनी सांगितले.
- ज्योती फुके ८७६६८१६६५६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.