Poultry Farming : वावी पंचक्रोशी झालेय अंडी उत्पादनाचे ‘क्लस्टर’

Egg Production : नाशिक जिल्ह्यात अवर्षणप्रवण सिन्नर तालुक्यातील वावी व परिसरातील सुमारे ११ गावांमध्ये लेअर पक्षी संगोपन, अंडी उत्पादन व विक्री व्यवसायाचे मोठे क्लस्टर विकसित झाले आहे.
Poultry
PoultryAgrowon
Published on
Updated on

Poultry Industry : नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यात असलेल्या वावी गाव परिसरात २५ वर्षांपूर्वी उसासह काही प्रमाणात बागायती शेती होती. कमी झालेल्या पर्जन्यमानामुळे दुष्काळी स्थिती उद्भवू लागली. आर्थिक कोंडी होऊ लागल्याने शेतकरी शेतीला पूरक म्हणून दुग्धव्यवसायाकडे वळले. सन २००० नंतर वावी, पांगरी या गावात काही मोजक्या शेतकऱ्यांनी पोल्ट्री व्यवसायाचा पर्याय निवडून ब्रॉयलर कुक्कुटपालन सुरू केले.

अन्य शेतकऱ्यांनीही मग त्यातील अर्थकारण आश्‍वासक वाटल्याने हा व्यवसाय स्वीकारला. सन २००६ मध्ये बर्ड फ्ल्यू रोगाच्या प्रादुर्भावामुळे कुक्कुटपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. काही शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर झाला. काही कसेबसे सावरले. तरीही समस्येतून मार्ग शोधत व्यवसायात त्यांनी सातत्य ठेवले. बाजारपेठेत अंड्यांना वाढत असलेली मागणी ओळखून शेतकरी २०१२ नंतर लेअर कुक्कुट पक्षी संगोपनाकडे वळले.

विस्तारला पोल्ट्री व्यवसाय

सुरवातीच्या काळात शास्त्रीय ज्ञान नसल्याने पोल्ट्री उत्पादकांना अनेक चढ उतारांचा सामना करावा लागला. मात्र या क्षेत्रातील खासगी कंपनी व शासकीय विभागातील तज्ज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी व प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन यातून आत्मविश्वास वाढत गेला.

त्यातून चित्र पालटले. आजमितीला वावी, पांगरी, दुसंगवाडी, कहांडळवाडी, घोटेवाडी, मिठसागरे, मलढोण आदी गावांमध्ये लेअर कुक्कुटपालन व्यवसाय चांगलाच विस्तारला आहे. अन्य ठिकाणी कमी पगारावर नोकरी करण्यापेक्षा स्वतःच्या पोल्ट्री व्यवसायात पूर्णवेळ झोकून देऊन त्यातून रोजगार निर्मिती करणाऱ्या युवकांची संख्या वाढली.

Poultry
Poultry Farming : शेतीला मिळाली पोल्ट्री, पशुपालनाची जोड

कुक्कुटपालक नवनाथ यादव सांगतात की वावी परिसरात पूर्वी घरोघरी गावरान कोंबडीपालन व्हायचे. नंतरच्या काळात शेतकऱ्यांच्या खळ्यातील खुराडी कमी झाले. मात्र व्यावसायिक पद्धतीने लेअर पक्षी संगोपन केले जात आहे. यात शेतकऱ्यांसह महिला व नवे सुशिक्षित युवकही उतरले आहेत.

शास्त्रीय ज्ञान व भांडवलाची सांगड घालून आपल्या क्षमतेनुसार शेतकऱ्यांनी पक्षी संगोपन गृहे विकसित केली आहेत. पूर्वी करार पद्धतीने व्यवसाय होत असे. आता व्यक्तिगत पातळीवर भांडवली गुंतवणूक करून उत्पादन व विक्रीचे मॉडेल विकसित झाल्याचे पाहायला मिळते. ॲग्रोवन दैनिकातील ज्ञान- माहितीचा खूप फायदा झाला.

क्लस्टर विकसित झाल्याचा फायदा

वावी व परिसरातील गावांत पोल्ट्री क्लस्टर तयार झाल्याने वैद्यकीय सेवा, पोल्ट्री साहित्य, अंडी संकलन व पुरवठा, पिल्ले पुरवठा, खाद्य, त्यासाठीची यंत्रे, यंत्रणा आदी सर्वांशी संबंधित व्यवसाय व सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्या. काही शेतकरी व्यापार क्षेत्रातही पुढे आले आहेत. बाजारातील जाहीर होणाऱ्या दरानुसार थेट खात्यावर पैसे मिळतात. पूर्वी बर्ड फ्लू संकटामुळे परिसरात व्यवसायावर परिणाम झाला होता. त्यावेळी ब्रॉयलर पक्षी शेड अनेकांकडे होते. त्यातच बदल करून शेतकऱ्यांनी लेअर पक्षी संगोपन सुरू केले. त्यामुळे ‘वेल्डिंग व फॅब्रिकेशन’ व्यवसाय विस्तारला.

आजमितीला एक हजारांपर्यंत मजुरांना वर्षभर हक्काचा रोजगार या क्लस्टरमुळे तयार झाला आहे. त्यामध्ये स्थानिक भूमिहीन व अल्पभूधारक यांसह मध्य प्रदेशातील मनुष्यबळ राबते. वाहतूक व पुरवठा व्यवसायात अनेक तरुण आहेत. काही प्रगतिशील कुक्कुटपालक एक दिवसाच्या पिलांची खरेदी करून १०५ दिवसांपर्यंत संगोपन करतात.

अंडी देण्यायोग्य क्षमता विकसित झाल्यानंतर मागणीनुसार त्यांची विक्री केली जाते. अनेकांनी व्यवसायातील तांत्रिक प्रशिक्षण पूर्ण केले आहे. काही युवकांनी तमिळनाडू राज्यातील अलग्गप्पा विद्यापीठाची ‘बी.एस्सी.-पोल्ट्री सायन्स’ ही पदवी कोइमतूर येथून मिळविली आहे. ते आपला व्यवसाय सांभाळून इतरांसाठी सल्ला मार्गदर्शन या भूमिकेत काम करतात. मका खरेदी विक्री व्यवसायही वाढला असून सुमारे २५ व्यापारी कार्यरत आहेत.

Poultry
Poultry Farming : शेतीपूरक पोल्ट्री व्यवसायातील मेटकर यांचा आदर्श अनुकरणीय

अर्थकारणाला गती मिळाली

लेयर कुक्कुटपालनातून गाव परिसरातील अर्थकारणाला गती मिळाली आहे. त्यातून शेतकऱ्यांची ची आर्थिक व सामाजिक पत वाढली आहे. झोपडीतून अनेक कुक्कुटपालक बंगल्यात राहण्यास आले. मुलांचे उच्च शिक्षण त्यांना करणे शक्य झाले. काहींनी शेतीचा विकास साधला आहे. नव्या पिढीलाही या व्यवसायासाठी प्रेरणा मिळाली आहे. व्यवसायात आधुनिकता आली आहे.

वावी परिसरातील लेअर पोल्ट्री व्यवसाय

  • वावी व परिसरातील अंदाजे ११ गावांमध्ये मिळून १५० हून अधिक शेतकरी करतात लेअर पोल्ट्री व्यवसाय.

  • भांडवलानुसर पूर्ण, अर्ध स्वयंचलित तसेच मनुष्यचलित पद्धतीने कामकाज. किमान तीन हजार ते २५ हजार पक्षी संगोपन क्षमतेचे शेड्‌स. जाळीच्या पिंजऱ्यामध्ये तीनस्तरीय तर काही ठिकाणी सुधारित पद्धतीने पाच स्तरीय पद्धतीचा वापर.

  • मरतुक कमी करण्यासाठी पक्षिगृहांची स्वच्छता, निर्जंतुकीकरण यासह जैव सुरक्षेकडे विशेष लक्ष.

  • रोग प्रादुर्भावाची निरीक्षणे नोंदवून प्रतिबंधात्मक उपचारांवर भर. पशुवैद्यकांची मदत.

  • दैनंदिन खाद्यपुरवठा, औषधे, आरोग्य, वजन, मरतुक याबाबत दैनंदिन नोंदी.

  • उत्पादन खर्च कमी करण्यासह खाद्यात स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रत्येकाचे स्वतःचे खाद्य निर्मिती युनिट, त्यादृष्टीने मका, सोया पेंड खरेदी.

  • परिसरात दररोज साडेचार लाख ते ५ लाख अंडी उत्पादन, तर ८ ते ९ कोटींपर्यंत मासिक उलाढाल.

  • शेतकऱ्यांकडून थेट विक्री व ‘मार्केटिंग’

  • अंडी उत्पादनात सातत्य व गुणवत्ता असल्याने येवला, मालेगाव, नाशिक, मुंबई पुणे यासह गुजरातमधील सुरत, वापी अहमदाबाद या शहरांमधून मागणी.

  • नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात कुक्कुटखताला मागणी. त्यातून दोन पैसे अधिक मिळतात

पाण्याची कमतरता असलेल्या स्थितीत कुक्कुटपालन व्यवसाय फायदेशीर ठरत आहे. नोकरीच्या तुलनेत तीन हजार पक्षांच्या संगोपनातून प्रति महिना ३० हजार रुपये परतावा मिळतो आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून आम्ही पक्षांचे संगोपन करतो आहे.
अंकुश वाघ, कहांडळवाडी, ९६८९१२२६३६
कुक्कुटपालनात पुरुषांच्या बरोबरीने आम्ही काम करतो. व्यवस्थापन करताना अनुभवातून खूप काही शिकलो आहोत. आर्थिक क्षमता प्राप्त करून देणाऱ्या या व्यवसायाला शासकीय पातळीवर पाठबळ मिळणे आवश्यक आहे. शासनाने कमी दराने मका उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
शशिकला राजेंद्र पगार, पांगरी ७०२०८१३४३७
पूर्ण अभ्यास करून काही वर्षांपासून या व्यवसायात कार्यरत आहे. मजुरांची बचत करण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित केली आहे. व्यवसायातील अर्थकारण समजून काम करणे गरजेचे आहे. गुणवत्तापूर्ण अंडी उत्पादन असून पुणे शहरात विक्री साखळी तयार केली आहे.
जालिंदर गडाख, घोटेवाडी ९८५०६०३८८०
मागणी व पुरवठा अभ्यासून, उत्पादन खर्च कमी करून अंडी उत्पादन वाढवणे हे महत्त्वाचे असते. यात आम्हाला अनुभवातून यश आले आहे. व्यवसायातून आर्थिक प्रगती झाली आहे.
रावसाहेब ढमाले ९०९६६ १५४९१ दुसंगवाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com