Poultry Farming : शेतीला मिळाली पोल्ट्री, पशुपालनाची जोड

Animal Husbandry : बेलपिंपळगाव (ता.नेवासा, जि.नगर) येथील गायकवाड कुटुंबाने शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिली आहे. काटेकोर व्यवस्थापनातून पोल्ट्री तसेच पशुपालनातून आर्थिक प्रगती केली आहे. शेणखत, कोंबडी खताच्या वापरातून जमीन सुपीकतेवर भर देत पीक उत्पादनवाढीला गती दिली आहे.
Poultry Farming
Poultry FarmingAgrowon
Published on
Updated on

सूर्यकांत नेटके

Livestock Management : नेवासा तालुक्यातील (जि.नगर) बेलपिंपळगाव परिसराला भंडारदरा धरणाचे पाणी मिळते. यामुळे शेतीसोबत पूरकव्यवसाय करण्यावरही शेतकऱ्यांचा भर आहे. बेलपिंपळगाव येथील गुलाबराव, सज्जन, त्रिंबक व राधाकिसन नानासाहेब गायकवाड असे चार भावांचे कुटुंब असून वडिलोपार्जित २२ एकर शेती आहे. आता सर्वांचे कुटुंब विभक्त आहे. सज्जन गायकवाड हे जलसंधारण विभागात अधिक्षक पदावरुन तर त्रिंबक गायकवाड हे जिल्हा परिषदेतून कक्ष अधिकारी पदावरुन सेवानिवृत्त झाले आहे. त्रिंबक यांच्या पत्नी कौशल्याताई गायकवाड या नुकत्याच मुख्याध्यापिका पदावरून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांचा मुलगा प्रशांत आणि सून स्वप्नाली पुण्यात संगणक अभियंता आहेत. सज्जन हे नेवासा फाट्यावरील ॲटोमोबाईल्सचे दुकान पाहतात. उच्चशिक्षित कुटुंब असले तरी शेतीवरील प्रेम आणि ओढ गायकवाड कुटुंबाने कायम जोपासली आहे. गुलाबराव यांना शेती व्यवस्थापनात मुलगा शैलेंद्र,अमृत आणि नातू अभिषेक मदत करतात. त्यांनी दहा वर्षांपूर्वी शेतीला जोड म्हणून पशुपालन सुरु केले. सेवानिवृत्तीनंतर त्रिंबक गायकवाड यांनी आठ वर्षांपूर्वी पोल्ट्री सुरु केली. गुलाबराव आणि त्रिंबक एकत्रित वीस एकर शेती आणि पोल्ट्री, पशुपालन व्यवसाय पाहतात. पोल्ट्री आणि पशुपालनातून गायकवाड कुटुंबाने चांगली आर्थिक प्रगती केली आहे.

पशुपालनाला चालना

गायकवाड कुटुंबाकडे पूर्वीपासून जनावरे होती. मात्र दहा वर्षांपूर्वी त्यांनी पशूपालनाचा विस्तार केला आहे. सध्या त्यांच्याकडे १४ संकरित गाई आणि सहा कालवडी आहेत. दर दिवसाला ८० लिटर दुधाचे संकलन होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी गाईंसाठी मुक्तसंचार गोठा तयार केला.

पशुपालन करताना आरोग्य व्यवस्थापन, लसीकरण, वासरांच्या योग्य वाढीवर भर असतो. कालवडींचे स्वतंत्र व्यवस्थापन केले आहे. दुधाला जास्तीत जास्त फॅट आणि एसएनएफ मिळण्यासाठी पशूखाद्य आणि योग्य आहार नियोजनावर भर असतो. यामुळे दुधाचे चांगले उत्पादन मिळते. सध्या प्रति लिटर ३१ रुपये दर मिळत आहे. यामध्ये चढउतार होतात.

गायकवाड कुटुंबाने साधारण पाच वर्ष शेळीपालन केले. सुरवातीला ४० शेळ्या खरेदी केल्या. त्यात वाढ करत १५० शेळ्या झाल्या. मात्र बाजारात विक्रीची समाधानकारक व्यवस्था नसल्याने आणि व्यापाऱ्यांकडून अपेक्षित दराच्या अडचणीमुळे शेळीपालन बंद करून पोल्ट्रीला प्राधान्य दिले.

Poultry Farming
Poultry Farming: कोंबड्यांच्या आहाराचे योग्य व्यवस्थापन

पोल्‍ट्री व्यवसायाला गती

त्रिंबक गायकवाड यांनी सेवानिवृत्तीनंतर राज्याच्या काही भागात जाऊन कुक्कुटपालनाची माहिती घेतली. २०१६ मध्ये शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री सुरु केली.यासाठी अडीच हजार क्षमतेच्या दोन शेड उभारल्या.

त्रिंबक यांना बंधू गुलाबराव यांच्यासह मुलगा अमृत, शैलेंद्र व नातू अभिषेक यांची मदत मिळते. दोन महिन्यातून एकदा कोंबड्याची विक्री केली जाते. खासगी कंपनीशी प्रती किलो ९ रुपये १० पैसे असा करार केलेला आहे.

साधारण अडीच किलो वजनाची कोंबडी होण्यासाठी ४५ दिवस लागतात. मात्र गायकवाड कोंबड्यांचे नियोजन योग्य पद्धतीने करत असल्यामुळे ३९ ते ४० दिवसात अडीच किलो वजन मिळते. त्यामुळे खाद्य आणि इतर बाबींची बचत होत असल्याने कंपनीकडून अधिकचा मोबदला मिळतो.

शेडमधील तापमान नियंत्रित, हवा खेळती राहण्यावर भर असतो. उन्हाळ्यात शेडवरील सिमेंट पत्रावर तुषार संच बसवले जातात. तसेच शेडमध्ये फॉगर्स, कुलर, फॅनचा वापर केला जातो. शिफारशीनुसार लसीकरण केले जाते. शेड परिसराची काटेकोर स्वच्छता राखली जाते.

Poultry Farming
Animal Husbandry Sector : पशुसंवर्धन क्षेत्रात व्यवसायाच्या अनेक संधी

शेती केली समृद्ध

गायकवाड कुटुंबाने पशुपालन आणि कुक्कुटपालनाच्या जोरावर शेती समृद्ध केली आहे. पशुपालनातून वर्षभरात सुमारे चाळीस टन शेणखत आणि पोल्ट्रीतून सुमारे चौदा टन कोंबडी खत मिळते.

वीस एकर लागवड क्षेत्रामध्ये ऊस, मका, सोयाबीन, मूग, बाजरी लागवड असते. शेणखत आणि कोंबडी खताचा वापर या पिकांना केला जातो. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर ४० टक्यांवर आला आहे.

शेणखत, कोंबडी खताच्या वापराने जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढला असून नेहमीच्या तुलनेत साधारणपणे पंधरा टक्के उत्पादनात वाढ झाली आहे. साधारणपणे बाजरीचे एकरी १६ क्विंटल, सोयाबीनचे १२ क्विंटल उत्पादन निघते.

उसासाठी कोंबडी खताचा वापर केला जातो. उसाचे एकरी ७५ टनांपर्यंत उत्पादन मिळते.

चाऱ्यासाठी नेपिअर गवताची लागवड केली आहे. या गवताला शेणखत, कोंबडी खताचा वापर केला जातो. त्यामुळे दर्जेदार उत्पादन मिळते. चारा टंचाई लक्षात घेऊन दरवर्षी पन्नास टन मुरघास निर्मिती होते. त्यासाठी वर्षभर चार एकरावर मका लागवड असते.

गायकवाड यांनी सघन पद्धतीने अडीच एकरात केसर आंबा कलमांची लागवड केली आहे.

शाळेच्या विकासात योगदान

त्रिंबक गायकवाड यांच्या पत्नी कौशल्याताई बेल पिंपळगावातील हनुमान विद्यालयात दोन वर्ष मुख्याध्यापक होत्या. त्रिंबक आणि कौशल्या गायकवाड यांनी स्वतः पाच लाख खर्च करून शाळेचे सुशोभीकरण, डिजिटल वर्ग, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिले. या शाळेला नेवासा तालुक्यात ‘मुख्यमंत्री स्वच्छ-सुंदर शाळा’ या उपक्रमाचे तीन लाखांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

त्रिंबक गायकवाड ९८२२०७७२५३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com