सूर्यकांत नेटके
Poultry Farming Success Story : नगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातील पानसवाडीचे मूळ राहिवासी असलेले कारभारी सखाराम शिंदे यांची तेथूनच जवळच बेल्हेकरवाडी येथे सात एकर शेती आहे. शासकीय तंत्रनिकेतन विभागातून अधिव्याख्याता पदावरून ते ३५ वर्षांच्या सेवेनंतर ते पाच वर्षांपूर्वी निवृत्त झाले. त्यांचे शिक्षण एमईपर्यंत झाले आहे.
सेवानिवृत्त झाले तो काळ नेमका कोरोनातील लॉकडाउनचा होता. त्या वेळी डॉक्टर नागरिकांना अंडी किंवा प्रथिनयुक्त आहार घेण्याबाबत सल्ला देत होते. चिकनलाही मागणी वाढत होती. अशावेळी आपणच पोल्ट्री व्यवसाय सुरू केला तर, असा विचार शिंदे यांच्या मनात आला. त्यांनी श्रीरामपूर तालुक्यातील काही पोल्ट्री युनिट्स पाहिली.
अभ्यास व आर्थिक नियोजन झाल्यानंतर २०२१ मध्ये या व्यवसायात पदार्पण केले. स्वतः अभियंते असल्याने पोल्ट्रीची रचना, आधुनिक तंत्रज्ञान व ते प्रत्यक्षात साकारणे अवघड गेले नाही. आज प्रति १६ हजार पक्ष्यांचे दोन शेड्स अशी एकूण ३२ हजार पक्षांची क्षमता असलेली त्यांची पर्यावरण नियंत्रित, स्वयंचलित पोल्ट्री आकारास आली आहे. बेल्हेकरवाडीत रेणुकादेवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. त्यामुळे शिंदे यांनी आपल्या व्यवसायास ‘रेणुका फार्म’ नाव दिले आहे.
अत्याधुनिक पोल्ट्रीतील तंत्रज्ञान
तीनशे बाय ४५ फूट लांबी-रुंदीची दोन शेड्स. शेडची एकूण उंची चौदा फूट. शेततळ्यासाठी वापरले जाणारे मटेरिअल वापरून ठरावीक उंचीवर कप्पा. तेथून सुमारे सहा फूट उंचीवर पत्रे. यामधील अंतरात हवा खेळती राहते. पक्षांना उष्णतेचा त्रास होत नाही.
शेडमधील मुख्य प्रवेश गोदामातून. ‘हायजेनिक’ वातावरण ठेवण्यासाठी पक्षी संगोपनाच्या
स्वयंचलित मुख्य कक्षात प्रत्यक्ष काम करणाऱ्यांनाच प्रवेश. बाकीच्यांना आतील दृश्य काचेच्या खिडकीतून पाहण्याची सोय.
शेडमध्ये थंडावा राहावा यासाठी दोन्ही बाजूंना पन्नास फूट लांब, पाच फूट उंच आणि सहा इंच जाडीचे कुलिंग पॅडस.त्यावर पाइप व पाण्याची सुविधा. शेडच्या प्रवेशद्वारावर कंट्रोल पॅनेल. त्यात तापमान, आर्द्रता, आदींचे सेन्सर्स. शेडमधील तापमानात चढ- उतार होतील तसे कूलिंग पॅड्समधील पाणी स्वयंचलित पद्धतीने सुरू किंवा बंद होते. त्यामुळे शेडमध्ये थंड हवा कायम राहते.
‘कंट्रोल पॅनेलद्वारेच वीज, पाणी, खाद्य आदी यंत्रणा चालतात. दर तासाला दहा मिनिटे वीज बंद होते. काही वेळा पक्षी अधिक काळ झोपतात. त्यांची कामाची गती संथ होते. वीज बंद केल्याने त्यांची हालचाल सुरू होते. ते खाद्य, पाणी घेतात. त्यासाठी केलेली ही सुविधा.
पिले अंड्यातून बाहेर आल्यानंतर पुढील आठ दिवस त्यांना उष्णतेची गरज असते. हा ‘ब्रूडिंग’चा कालावधी असतो. या काळात उष्णतेसाठी स्पेसहीटर, गॅस ब्रूडर यांचा वापर. पिलांची वाढ होत जाते तसतशी त्यांची उष्णतेची गरज ओळखून कंट्रोल पॅनेलद्वारे ती नियंत्रित केली जाते.
शेडमध्ये तीन कप्पे. वाढीच्या अवस्थेनुसार पिलांची कप्प्यांत विभागणी.
खाद्यासाठी दोन्ही शेड्समध्ये स्वयंचलित चार हॉपर्स व प्रत्येक शेडमध्ये चार फीडरलाइन्स.
पाण्यासाठी स्वयंचलित निप्पल लाइन. त्यासाठी उंचावर पाण्याच्या टाक्या, फिल्टर्स व निप्पलजवळ प्रेशर गेज अशी सुविधा. या यंत्रणेमुळे आवश्यक तेवढेच पाणी दिले जाते. ते वाया जात नाही.
दोन्ही शेडमधील एक्झॉस्ट फॅन्स. त्यांच्या आसपास वीस फूट जागा मोकळी असून बाजूने त्यास पत्र्याचे आवरण. त्यामुळे गरम हवा सुमारे वीस फूट उंचावर जाऊन ९० अंश कोनातून बाहेर पडते. त्यामुळे शेडच्या बाहेर कसला वास येत नाही. माशांपासूनही नियंत्रण होते.
विजेचे नियोजन
शेतात पोल्ट्री असल्याने येथे विजेची सोय नव्हती. शिंदे यांनी खर्च करून विजेचे ‘पोल’, शंभर केव्ही क्षमतेची डीपी बसवली. एक्स्प्रेस फीडर असल्याने शक्यतो वीज जात नाही. तरीही वीज गेल्यास पक्षी संगोपनात अडथळे येऊ नयेत यासाठी ८५ केव्ही क्षमतेचे जनरेटर व १५० केव्ही क्षमतेचे स्टॅबिलायझर बसवले आहे. वीज गेल्यास २७ सेकंदांत जनरेटर सुरू होते. वीज आल्यावर ते पुन्हा २७ सेकंदांत बंद होते. वीज गेल्यानंतर परिसरात सायरन वाजतो. मोबाइलवर संदेश व कॉलही येतो. एकाहून अधिक व्यक्तींना हा कॉल जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व यंत्रणेमुळे कमी-जास्त दाबाने वीजपुरवठा न होता आवश्यक तेवढा पुरवठा होतो. ही सर्व यंत्रणा पोल्ट्री ॲलर्ट या ॲपद्वारे नियंत्रित होते.
मरतुक झाल्यास मृत पक्ष्यांची आरोग्य किंवा शास्त्रीयदृष्ट्या विल्हेवाट लावण्यासाठी इस्रो तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक चिमणी सदृश यंत्रणा बसवली आहे. शेतातही दूरवर खड्डा खोदून व्यवस्था केली आहे.
या भागातील आधुनिक स्वरूपाची ही पहिलीच पोल्ट्री असावी. प्रवेशद्वाराजवळ निर्जंतुकीकरण केल्यानंतरच शेडमध्ये प्रवेश करता येतो.
पत्नीची समर्थ साथ
पोल्ट्री व्यवसायात कारभारी यांना पत्नी मंदाकिनी यांची समर्थ साथ आहे. त्यांचे चिरंजीव संदीप एमईपासून ‘आयएफएस’ परीक्षा उत्तीर्ण होऊन ते झारखंड राज्यात वन विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. दुसरे चिरंजीव सुमीत हेही अभियंता आहेत. ज्येष्ठ नेते, माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे मार्गदर्शन शिंदे यांना मिळाले आहे. तर आमदार शंकरराव गडाख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी पोपटराव नवले यांच्यासह एक हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी येथे भेट दिली आहे.
अर्थकारण : दोन्ही शेड्स, अन्य सोयीसुविधांसाठी सुमारे सव्वादोन कोटींपर्यंत खर्च आला आहे. पक्ष्यांची काटेकोर देखभाल ठेवल्यास त्यातून बऱ्यापैकी नफा मिळतो. वर्षाला सुमारे आठ हजार गोण्या कोंबडीखत मिळते.या भागातील शेतकऱ्यांना प्रति १०० रुपये दराने गोणीची विक्री होते. आठ मजुरांना कायमचा रोजगार मिळाला आहे. गरजेनुसार बाहेरील मजुरांची मदत घेत त्यातूनही अप्रत्यक्ष रोजगार तयार होतो.
गुणवत्तापूर्ण देखभाल
शिंदे यांनी बारामती येथील कंपनीशी करार केला आहे. पिले, खाद्य, औषधोपचार, लसीकरण आदी बाबी व मार्गदर्शन कंपनीकडून होते. एरवी पक्ष्यांची वाढ ४२ ते ४५ दिवसांत पूर्ण होते. मात्र पर्यावरण नियंत्रित या पोल्ट्रीमध्ये ३४ ते ३६ दिवसांतच पक्ष्यांची पुरेशी वाढ होते. त्यामुळे आठ ते दहा दिवसांच्या खाद्याची वा अन्य घटकांची बचत होते. प्रति किलो नऊ रुपये असा खरेदी दर कंपनीकडून देण्यात येतो. मात्र खाद्यात बचत करून वजनी वाढ, मरतुकीचे पाच टक्क्यांहून कमी प्रमाण ठेवणे आदी गुणवत्तापूर्ण कामांसाठी दरांमध्ये इन्सेटिव्हही दिला जातो. त्यादृष्टीने प्रति किलो १८ रुपयांपर्यंत दरही शिंदे यांनी घेतला आहे.
अर्थकारण
दोन्ही शेड्स, अन्य सोयीसुविधांसाठी सुमारे सव्वादोन कोटींपर्यंत खर्च आला आहे. पक्ष्यांची काटेकोर देखभाल ठेवल्यास त्यातून बऱ्यापैकी नफा मिळतो. वर्षाला सुमारे आठ हजार गोण्या कोंबडीखत मिळते.या भागातील शेतकऱ्यांना प्रति १०० रुपये दराने गोणीची विक्री होते. आठ मजुरांना कायमचा रोजगार मिळाला आहे. गरजेनुसार बाहेरील मजुरांची मदत घेत त्यातूनही अप्रत्यक्ष रोजगार तयार होतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.