
Smart Farming: डव्वा (ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया) ग्रामपंचायतीच्या सरपंच योगेश्वरी चत्रुगन चौधरी यांनी ग्रामविकासाच्या बरोबरीने शेती आणि महिला विकासाला चांगली गती दिली आहे. भातशेती, फळबाग, पशूपालन, वनीकरणाच्या बरोबरीने पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना दिली आहे. याची दखल घेत त्यांचा राष्ट्रीय पातळीवर जागतिक हवामान बदलास तोंड देणारी ग्रामपंचायत म्हणून गौरव करण्यात आला आहे.
डव्वा (ता. सडक अर्जुनी, जि.गोंदिया) गावच्या सरपंच योगेश्वरी चत्रुगन चौधरी यांचे शिक्षण बी.ए. बी.एड. आणि डी.एड. (क्राफ्ट) या विषयात झाले आहे. २००३ मध्ये त्यांचे लग्न झाले. सुखाने संसार सुरू असतानाचा २०१७ मध्ये आजारपणामुळे योगेश्वरीताईंच्या पतीचे निधन झाले. कुटुंबात ज्येष्ठ कोणीही नाही. मुलाला सांभाळतानाचा आपत्तीने खचून न जाता त्यांनी पुन्हा उभारी घेतली. त्यांनी गावातील शाळेत शिक्षिकेची नोकरी पत्करली. सर्जनशील स्वभाव आणि ध्यास घेऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे लोकाग्रहास्तव २०२३ मध्ये त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक थेट सरपंच म्हणून लढवली,
त्या चांगल्या मताधिक्याने निवडून आल्या. डिसेंबर,२०२३ मध्ये त्यांनी सरपंच म्हणून कार्यभार स्वीकारला. सरपंच झाल्यावर गावातील शेती आणि पर्यावरणाला शाश्वत उपक्रमातून दिशा देण्याचे स्वप्न उराशी बाळगले. सुरुवात कोठून करावी हा संभ्रम होता. उपक्रमशील सरपंच श्री. बाहेकर यांनी केलेल्या मार्गदर्शनाने ग्रामविकासाला दिशा मिळाली. वैयक्तिक स्तरावर कोणतेही पाठबळ नसताना केवळ ग्रामस्थांच्या पाठिंब्याने शेती आणि ग्रामविकासाच्या दिशेने प्रवास सुरू झाला.
लोकसहभागातून शेतीआणि ग्राम विकास
शेती आणि ग्रामविकासाची दिशा स्पष्ट करताना सरपंच योगेश्वरी चौधरी म्हणाल्या, गावाची लोकसंख्या ३,४१८ इतकी आहे. गावात ७९६ कुटुंब संख्या असून एकूण जमीन १५२७.४८ हेक्टर आहे. गावात अनेक समस्या आहेत, त्यामुळे कामाची गरजही खूप आहे हे लक्षात आले. ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांशी चर्चाकरून नेमक्या कोणत्या समस्यांवर काम करायचे, याचे मापदंड निश्चित केले. गावपातळीवरील पारंपरिक समस्या सोडवण्याबरोबरीने आम्ही पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलाचे परिणाम लक्षात घेऊन नियोजन केले.
महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा ४.० अभियानात भाग घेण्याची ग्रामपंचायतीला संधी मिळाली. त्यातील निर्देशांकानुसार आम्ही कामे करत गेले. लोकांचे पाठबळ मिळत गेले; काही वेळा विरोधही झाला, पण समन्वयाने तो दूर केला. लोकसहभागातून ग्रामविकासाला चालना दिल्याने गावाला पहिला स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळाला. यातून लोकांचाही सहभाग वाढत गेला. ग्रामपंचायतीने नावीन्यपूर्ण उपक्रमाने गावात पर्यावरणपूरक जीवनशैली रुजवली आहे. हवामान बदलास सामोरे जाण्यासाठी पंतप्रधानांनी पर्यावरण पूरक जीवनशैली हा कृतियोग्य कार्यक्रम देशातील जनतेस दिला आहे, त्यानुसार आम्ही ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे नियोजन केले आहे.
ग्राम हवामान समस्या आकलन समिती
ग्रामपंचायती अंतर्गत नऊ सदस्यांची हवामान समस्या आकलन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने हवामान बदलाच्या परिणामांवर समोर कसे जावे याबाबत समस्यांवर चिंतन करून आकलन करण्यात आले. त्यानुसार उपाययोजनांची आखणी केली. लोकांना या समस्यांबाबत जाणीव करून देण्यासाठी वर्षभरात प्रत्येक महिन्याला एक सभा घेण्यात आली. वर्षभरात एकूण १० सभा घेण्यात आल्या. वर्षभरात एकूण २,१२४ आयईसी सभा घेण्यात आल्या. या चर्चेतून समाजातील सर्व घटकांना विविध समस्या आणि त्याच्या उपायांबाबत व्यक्तिगत स्तरावर मार्गदर्शन करण्यात आले. उपाययोजनांसाठी सर्व गावकऱ्यांनी एकत्रित निर्णय घेण्यास सुरवात केली.
कामाच्या गरजेनुसार चौधरी यांनी जैवविविधता समिती, आपत्ती व्यवस्थापन समिती,पाणी पुरवठा आणि स्वच्छता समिती स्थापन केली. ग्रामपंचायतीने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमांतर्गत असलेल्या ग्रामसूचीतील ७८ तसेच ७३ व्या घटना दुरुस्तीतील २९ या सर्व विषयांवर काम केले आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून आले. त्यामुळे हे काम लक्षणीय आणि संस्मरणीय ठरले. योगेश्वरी चौधरी यांचे ध्येय, गावासाठी असलेली तळमळ, समस्यांचा अभ्यास आणि त्यावर उपाययोजनांची निश्चिती करण्यात आली. लोकसहभागाच्या बरोबरीने शासकीय योजना आणि संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधत त्यांनी ग्रामविकासाला नवी दिशा दिली आहे.
राष्ट्रीय पातळीवर ग्रामपंचायतीचा गौरव
भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयातर्फे उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायतराज पारितोषिकाने गौरविण्यात येते.२०२५ पासून ‘विशेष पंचायत राज पुरस्कार’ देण्यास सुरुवात झाली आहे. हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार हा विशेष श्रेणीतील पुरस्कार या वर्षीपासून देण्यास सुरवात झाली. यंदाच्या वर्षी देशातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून डव्वा (ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया) ग्रामपंचायतीस हा पुरस्कार मिळाला आहे. एक कोटी रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाण पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मागील अडीच वर्षाच्या कालावधीत डव्वा ग्रामपंचायतीस अनेक मानाचे पुरस्कार मिळाले.या सर्व पुरस्कारांनी प्राप्त झालेला एकूण निधी एक कोटी एकसष्ट लाख रुपये इतका आहे.
पुरस्कार : तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कार संत गाडगेबाबा पुरस्कार जिल्हा सांडपाणी व्यवस्थापन विशेष पुरस्कार माझी वसुंधरा अभियान ४.० चा राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार राष्ट्रीय स्तरावरचा पहिला हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार २०२५
शेती, पूरक उद्योगाला चालना
शेती आणि पशुपालनाबाबत माहिती देताना चौधरी म्हणाल्या की, माझी आठ एकर शेती असून त्यामध्ये पाच एकरावर सागवान लागवड आहे. तीन एकरात भात लागवड असते. भात उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाची साथ घेतली आहे. शेती विकासाच्या दृष्टीने गावात पाच शेतकरी गट आणि ३८ महिला बचत गट कार्यरत आहेत. या माध्यमातून शेती, फळबाग, पशुपालनाला चालना दिली आहे. कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून शेतीशाळा, प्रशिक्षणांचे आयोजन केले जाते. त्यांचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. जल,मृदा संधारणावर भर दिला आहे. विशेषतः येत्या काळात फळबागेचे क्षेत्र वाढविण्याचे आम्ही नियोजन केले आहे. वीजबचतीसाठी सौर पंपाच्या वापरावर भर दिला आहे.
गावपातळीवरील उपक्रम
वृक्षारोपण
ग्रामपंचायत क्षेत्रात १,१६,६४३ वृक्षरोपण.
दोन रोपवाटिका, ६,५२० सीड बॉल वाटप.
कचरा व्यवस्थापन
सार्वजनिक शोष खड्डे : ३३
वैयक्तिक शोषखड्डे : ७९६
घराघरातून कचरा गोळा करण्यासाठी वीजेवर चालणारी वाहने :२
कचरा विलगीकरण शेड: ०१
नाडेप खड्डे (सार्वजनिक) :८
नाडेप खड्डे (वैयक्तिक) :१५०
कचरा पेट्या सार्वजनिक (ओला आणि सुका) : ११
कचरा पेट्या वैयक्तिक (ओला आणि सुका) : ७९६
प्रदूषण नियंत्रण
वायू प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना.
ध्वनी प्रदूषण नियंत्रण.फटाके वाढविण्यावर बंदी. प्लॅस्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन.
सौरऊर्जेचा अवलंब
मिनी ग्रिड: ८० घरगुती ग्रिड: ३२८
सार्वजनिक इमारती:१९ पिण्याच्या पाण्याचे पंप:८ सिंचनासाठी पंप :५४६ पथदिवे: ६७ लघु पवनचक्की :१ किलोवॉटची १ पवनचक्की. इ वाहन चार्जिंग स्टेशन: १ घरगुती गॅस : ७८६ एलइडी स्ट्रीट लाइट ९२ एलइडी बल्ब: ७९६ इ वाहने :२ सार्वजनिक आणि ३६ वैयक्तिक इतर सोलर उपकरणे (टॉर्च,बल्ब,कंदील इ) : १७३
- योगेश्वरी चौधरी ८८०६६०२८०१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.