Godan Fruit Update : भोकरवर्गीय गोदन होतेय दुर्मीळ

Godan Fruit Benefits : फळामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात. ती विविध पाककृतींमध्ये वापरली जातात. कच्ची फळे भाजी व लोणच्यासाठी वापरली जातात.
Godan Fruit
Godan FruitAgrowon
Published on
Updated on

डॉ. प्रदीप दळवे

Cordia Gharaf : गोदन ही भोकर कुळातील दुर्मीळ वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव कोर्डिया घराफ (Cordia gharaf) असून, बोराजिनासिई (Boraginaceae) कुळातील आहे. गोदन वनस्पतीचा अधिवास दक्षिण आफ्रिकेपासून पूर्व आफ्रिका, पश्‍चिम आफ्रिका आणि मध्य पूर्व ते भारतीय उपखंड आणि पूर्व इंडोचायनापर्यंत पसरलेला आहे.

इजिप्त, इथिओपिया, भारत, इस्राईल, जॉर्डन, केनिया, मादागास्कर, मोझांबिक, नामीबिया, नायजेरिया, पाकिस्तान, सेनेगल, सोमालिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, सुदान, टांझानिया, येमेन आणि झिम्बाब्वे या देशांत ही झाडे आढळतात.

भारतात प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांमधील अवर्षणप्रवण भागात गोदन झाडे पाहावयास मिळतात. महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, सातारा, नगर, बीड, जळगाव, नंदूरबार, नाशिक जिल्ह्यांत प्रामुख्याने नैसर्गिक अधिवासात ही वनस्पती दिसून येते.

उपयोग :

फळामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात. ती विविध पाककृतींमध्ये वापरली जातात. कच्ची फळे भाजी व लोणच्यासाठी वापरली जातात. झाडाचा डिंकदेखील खाण्यायोग्य असतो. झाडाचे लाकूड सरपण, फर्निचर आणि विविध साधने बनविण्यासाठी वापरले जाते. पाने जनावरांच्या चाऱ्याकरिता उपयोगात येतात.

मुळे आणि झाडाची साल मलेरिया, आतड्यांसंबंधी विकार आणि डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह याकरिता उपयोगी आहे. त्याचा वापर पशुधनातील विविध विकारांवरील उपचारातही होतो.

Godan Fruit
Sitaphal Fruit Crop Insurance : पेरु, सीताफळ फळपिकांसाठी विमा योजना

तुर्कस्तानमध्ये गोदन फळे ताज्या स्वरूपात खाल्ली जातात. तसेच वाळवून साठवली जातात. फळाचा उपयोग रस किंवा मद्य बनविण्यासाठीही केला जातो. नायजेरियामध्ये फळांचा रसदार लगदा स्थानिक कांगो नावाच्या जाड सिरपमध्ये शिजविला जातो. लापशीसाठी गोड पदार्थ म्हणून वापरला जातो. हा रस दीर्घकाळ टिकवून ठेवला जातो.

सध्या तरी गोदनाची व्यावसायिक शेती केली जात नाही. मात्र रानमेव्याप्रमाणे त्याची विक्री केली जाते. राजस्थानमधील बिकानेर शहरातील बाजारात या फळाची विक्री १८० ते २०० रुपये प्रति किलो दराने होत असल्याची माहिती आहे.

संवर्धनाची आवश्यकता

पूर्वी शहरी भागातही काही प्रमाणात आढळणारी गोदनाची झाडे शहर विस्तारीकरणादरम्यान केलेल्या वृक्ष तोडीमध्ये नष्ट झाली आहेत. ग्रामीण व शहरी भागांमध्ये विशेषतः दगड मातीची जुने वाडे, मोठी घरे निर्मनुष्य झालेली असल्यास तिथे पक्ष्यांची वर्दळ वाढल्यामुळे त्यांच्यामुळे ही झुडपे वाढलेली दिसतात.

मात्र जुन्या घरांच्या पुनर्बांधणीमुळे तीही नष्ट होत चालली आहेत. जैवविविधता आणि अन्न साखळीतील महत्त्वाच्या अशा झाडाचा अधिवास धोक्यात आल्यामुळे ही झाडे दुर्मीळ झाली आहेत. या दुर्मीळ व महत्त्वपूर्ण अशा गोदन वनस्पतीच्या संवर्धनाकरिता अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके संशोधन प्रकल्प, जाधववाडी, ता. पुरंदर, जि. पुणे येथे प्रयत्न करण्यात येत आहेत.

पुरंदर परिसरातील विविध भागांतून या वनस्पतीचे विविध प्राकलवाण संकलित करण्यात आले आहेत. त्यांची भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली येथील वनस्पती आनुवंशिक संसाधन संस्थेमध्ये नोंद करण्यात आली आहे.

Godan Fruit
Fruit Orchard : एका‍त्मिक अभियानात फळे, फुले, मसाला पिके लागवड होणार

गोदन वनस्पतीची वैशिष्ट्ये

- भोकराचे झाड पाच ते सात मीटर उंच व एक खोड पद्धतीने वाढते. मात्र त्याच कुळातील गोदन वनस्पतीचे झाड तुलनेने लहान (तीन ते चार मीटर उंच), बहूखोड पद्धतीचे व झुडूप वर्गात मोडते.

- भोकराची फळे आकाराने स्थानिक बोराएवढी, बेचव, चिकट व फिकट गुलाबी रंगाची असतात, तर गोदनाची फळे मोत्याएवढी, चवीला मधुर, तुलनेने कमी चिकट व आकर्षक गर्द नारंगी रंगाची असतात.

-पानांचा आकार दंडगोलाकार तर रंग मध्यम हिरवा असतो. पाने वरच्या बाजूने किंचित खडबडीत तर खालील बाजू मऊ असते.

- झाडाच्या खोडाची साल तपकिरी रंगाची असते.

- जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात फुलधारणा होते. फुलांचा रंग दुधी पांढरा असतो. परागीभवन प्रामुख्याने मधमाश्‍या आणि फुलपाखरे यांच्यामार्फत होऊन फळधारणा होते.

- गोदनाची फळे साधारणपणे मे-जून महिन्यांत पक्व होतात. फळे गोलाकार व किंचित शंकूच्या आकाराची, नारंगी-लाल असतात, त्यात मांसल-चिकट लगदा असतो. एकच बी असते. बियांचे आवरण कठीण असल्याने उगवण क्षमता फार कमी असते. विविध प्रकारचे पक्षी, खारी, वटवाघळे, माकडे, वानरे, निशाचर प्राणी फळाकडे आकर्षित होतात. बियांचा प्रसार करतात, यातूनच या वनस्पतीचे नैसर्गिक पुनरुत्पादन होते.

संपर्क - डॉ. प्रदीप दळवे, ८९८३३१०१८५, (उद्यानविद्यावेत्ता, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळ पिके संशोधन प्रकल्प, जाधववाडी, ता. पुरंदर, जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com