
Rural Education Model : शाळा म्हटलं की चार भिंती, खडू, फळा, वर्ग असं पारंपरिक चित्रा उभं राहतं. त्याला छेद देत यवतमाळ येथील उबुंटु या माध्यमिक शाळेने वेगळेपण सिद्ध केले आहे. येथील सेवांगण रिसर्च ॲण्ड इनोव्हेशन फाउंडेशन अंतर्गत ही शाळा २०२२ मध्ये सुरू झाली. पहिली ते सहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्यात शेतीची आवड व त्यातील कौशल्य विकसित व्हावे या हेतूने शाळेने महत्त्वाचे पाऊल उचलले.
शाळेचा एकूण परिसर सहा एकरांपर्यंत पसरला आहे. त्यातील दोन एकर शेतीसाठी देण्यात आले आहे. तर सहा एकरांतील अन्य जागेचाही लागवडीसाठी वापर केला आहे. नागपूर येथील ज्ञान फाउंडेशनचे सहकार्य त्यासाठी लाभले आहे. ‘सेवांगण’ चे अध्यक्ष पांडुरंग खांडवे असून संचालक व भागीदार व्यक्तींमध्ये डॉ. अजिंक्य कोत्तावार, संभाजी राणे, अनुप यादव तसेच अन्य व्यक्तींचा समावेश आहे. शुभांगी बोरखडे शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत.
...अशी आहे वैशिष्ट्यपूर्ण शाळा
डॉ. अजिंक्य कोत्तावार यांचा हळद पिकातील मोठा अनुभव असून या पिकाशी संबंधित १५ पेटंट्स त्यांनी मिळवली आहेत. ते म्हणाले की बालवयातच मुलांवर शेतीचे संस्कार व्हावेत, त्यांना विविध पिके, आयुर्वेदिक वनस्पती, त्यांच्यापासून कोणकोणती उत्पादने तयार करता येतात याची माहिती व्हावीहा उद्देश होताच.
पण भविष्यात उद्योजक म्हणून घडण्यासाठी प्रक्रिया व विक्रीचेही संस्कार व्हावेत असा हेतू ठेवला आहे. शाळेच्या शेतीत हापूस, पायरी, केसर, तोतापुरी, बारमाही (एटीएम- ऑल टाइम मॅंगो), कलेक्टर अशा १७ वाणांची लागवड केली आहे. मुलांना कलम करण्याचे प्रशिक्षणही देण्यावर भर आहे.
संरक्षित वातावरणातील पीकपद्धतीची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी काही गुंठ्यात शेडनेटची उभारणी केली आहे. या वर्षी त्यात स्ट्रॉबेरीचा प्रयोग केला आहे. त्यासाठी पुणे व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून रोपे आणली आहेत. शाळेतील शेताच्या बांधावर लाल, पांढरे चंदन, फणस, नारळ, रुद्राक्ष, सुपारी, किवी, ॲव्होकॅडो आदींची झाडेही लावली आहेत. सिंचनासाठी विहीर व ठिबक सिंचनाचा वापर केला आहे.
तीन प्रकारच्या हळदींचा प्रयोग
काळी, पिवळी आणि पांढरी (आंबेहळद) अशा तीन प्रकारांमधील हळदीची लागवड शाळेच्या प्रक्षेत्रावर करण्यात आली आहे. हळदीचे पीक सर्वसाधारणपणे नऊ महिने कालावधीचे असते. मात्र खोडवा उत्पादन घेण्यासह २० महिन्यांपर्यंत हे पीक घेत राहण्यासंबंधीची पद्धती शाळेचे संचालक डॉ. कोत्तावार यांनी विकसित केली आहे. त्यासाठी त्यांना पेटंटही मिळाले आहे.
मानवी आकारातील वनस्पती
ब्राह्मणी, शंखपुष्पी, अश्वगंधा, अर्जुना आदी विविध औषधी वनस्पतींची लागवड आहे. त्यासाठी जमिनीवर मानवी आकार साकारण्यात आला आहे. शरीराच्या विविध घटकांना उपयोगी पडणाऱ्या ५० ते ६० आयुर्वेदिक वनस्पतीची त्या- त्या भागात लागवड केली आहे. उदाहरण शंखपुष्पी वनस्पतीचा उपयोग मेंदूच्या वाढीसाठी होतो. तर मेंदूच्या जागी या वनस्पतीची लागवड आहे.
यवतमाळ येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध औषधी उत्पादनांची निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी प्रक्रिया कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
यात शेवगा व शंखपुष्पीपासून कॅप्सूल, ब्राह्मणीच्या पानांपासून स्वरस तर लेमनग्रासचे पाऊच तयार करून त्याचा उपयोग आयुर्वेदिक चहासाठी केला आहे. खंडू चक्का वनस्पतीपासून तेल व अश्वगंधाच्या मुळांपासून पावडर तयार केली आहे. अन्न सुरक्षितता विषयातील ‘एफएसएसएआय’ अंतर्गत या उत्पादनांच्या विक्रीसाठी परवाना घेण्याची प्रक्रिया शाळेच्या व्यवस्थापनाने सुरु केली आहे.
पूरक व्यवसायांचीही ओळख
विद्यार्थ्यांना देशी जनावरांची ओळख व्हावी यासाठी गोशाळा असून प्रत्येकी एक देशी व गवळाऊ गायीचे संगोपन केले जात आहे. शेण, परिसरातील पीक अवशेषांपासून गांडूळखत व व्हर्मिवॉश तयार केले जाते. त्याचा वापर शेतात होतोच. शिवाय या दोन्ही उत्पादनांची विक्री देखील होते. परसबागेतील कुक्कुटपालन आणि शेळीपालन देखील येथे थोड्या प्रमाणात केले जाते.
तंत्रज्ञानाची जोड
शेतीपुरतेच मर्यादित न राहता शाळेत डू इट युवरसेल्फ नावाची प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे.त्याचे वैशिष्टय म्हणजे इलेक्ट्रॉनिक खेळण्यांची दुरुस्ती, विजेची विविध उपकरणे आदींचे तांत्रिक ज्ञान येथे दिले जाते. रोबोटिक्स विषयावरही शाळेने भर दिला आहे. विशिष्ट प्रकारच्या प्लॅस्टिकपासून येथे काही घटक तयार केले जातात.
थ्री डी प्रिंटिंग यंत्रही खरेदी करण्यात आले आहे. संकेतस्थळ ॲन्ड्रॉइड मोबाइलमधील ॲप विकसित करण्याविषयीचे प्रशिक्षणही शाळेच्या संगणक कक्षात दिले जाते. विविध विषयांवर ब्लॉग लिहिण्याविषयीचे कौशल्यही विद्यार्थी येथे आत्मसात करतात.
इस्रोचे नोडल सेंटर
सॅटेलाइट आणि ‘रिमोट सेन्सिंग’ या विषयांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी शाळेच्या परिसरात इस्रो संस्थेचे नोडल केंद्र उभारले आहे. महाविद्यालयांना अशा प्रकारचे केंद्र देण्यावर इस्रोचा भर आहे. मात्र नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या माध्यमिक शाळांचाही त्यासाठी विचार होतो.
डॉ. अजिंक्य कोत्तावार ७७०९०२५५३३
(संचालक, उबुंटु शाळा)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.