
माधुरी देशपांडे
Digital Learning: ग्रामीण भागातील तरुणांना गावशिवारात राहून अर्थपूर्ण उत्पन्न मिळवता यावे या ध्येयाने पुण्यामध्ये २०१९ मध्ये ‘स्किल विकास फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेची सुरुवात झाली. संस्थेने पहिल्या टप्यात ग्रामीण भागात कौशल्य विकास कार्यक्रम राबविले. परंतु ते हंगामी आणि अल्पकालीन होते. संस्थेने ग्रामीण भागात संपूर्ण बांबू केंद्राच्या सहकार्याने बांबूपासून हस्तकला वस्तू बनविण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमदेखील आयोजित केला होता. गेल्या चार वर्षांपासून संस्थेने जमीन सुपीकता आणि शालेय शिक्षणावर लक्ष केंद्रीत केले आहे.
आज जागतिक तापमानवाढ ही सर्वच देशांसमोरील मोठी समस्या आहे. अनियंत्रित पद्धतीने रासायनिक खते आणि कीटकनाशक वापराचा परिणाम जमीन, मानवी आरोग्य, हवा आणि पाण्याच्या गुणवत्तेवर होत आहे. हे लक्षात घेऊन संस्थेने जमीन सुपीकतेचे महत्त्व लक्षात घेऊन विविध उपक्रम आणि प्रशिक्षणांना सुरुवात केली. यासाठी देशभरातील विविध संस्था, शेतकऱ्यांच्या प्रयोगांचा अभ्यास करण्यात आला. काही ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन संबंधित तज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्राला भेटी देऊन जमीन सुपीकता वाढीचे तंत्रज्ञान समजाऊन घेण्यात आले. ग्रामीण भागातील मुलांना केवळ उपजीविकेसाठी शहरात यावे लागू नये, असा संस्थेचा प्रयत्न आहे. शेतीतील चांगले उत्पादन या मुलांना ग्रामीण भागात टिकवून ठेवू शकते. पर्माकल्चर आणि सेंद्रिय शेतीचा अभ्यास केल्यानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जमीन सुपीकता आणि आरोग्यदायी शेतीमाल उत्पादनावर लक्ष केंद्रित केले. शेतकरी तसेच शालेय विद्यार्थांना जमीन सुपीकता, आरोग्यदायी अन्नधान्य उत्पादनाबाबत माहिती होण्यासाठी संस्थेने ऑडिओ/व्हिज्युअल पद्धतीने सोप्या भाषेत प्रशिक्षण कार्यक्रम तयार केला आहे.
ई-लर्निंग तंत्रज्ञानावर भर
पासली (ता. वेल्हा, जि. पुणे) गावातील शाळेमध्ये शिक्षकांच्या सोबत संस्थेने शैक्षणिक उपक्रमांना सुरुवात केली. या ठिकाणी ‘स्पीक-इंग्लिश’ कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेने शाळेमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना शिकवणे सोईचे होण्यासाठी ई-लर्निंगसाठी संगणकाची सोय करून दिली. या तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे शाळेतील शिक्षक विद्यार्थांना प्रभावीपणे इंग्रजी बोलायला शिकवू लागले.
त्यानंतर संस्थेने पुढील टप्प्यात संगमनेरमधील आश्रम शाळा, सासवडजवळील आंबळे गावातील अनाथाश्रम याचबरोबरीने शिरूर, उदगीर, रत्नागिरी, भोर, कापूरहोळ (जि. पुणे) या ग्रामीण भागातील शाळेमध्ये ई-लर्निंग संगणक देण्यास सुरुवात केली. या उपक्रमाचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. विद्यार्थांमध्ये सोप्या भाषेत इंग्रजी शिकण्याची गोडी तयार झाली आहे.
गेल्या दोन वर्षांत संस्थेने तीसहून अधिक ग्रामीण शाळांना ‘ई-लर्निंग'' उपक्रमासाठी संगणक दिले आहेत. यामुळे शालेय विद्यार्थांना मूलभूत शिक्षण आणि इंग्रजी बोलण्यास शिकण्यास मदत होत आहे. या प्रशिक्षण उपक्रमामध्ये पहिली ते दहावीपर्यंतच्या बालभारती अभ्यासक्रमाचा समावेश आहे. त्यामुळे शिक्षकांना अधिक प्रभावीपणे शिकवण्यास मदत होते. सर्व मराठी शाळांमध्ये इंग्रजी हा विषय आहे, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थांना इंग्रजीत बोलणे कठीण जाते.
शाळेतील मुलांना अभ्यासक्रमातील इंग्रजी पुस्तके वाचणे खूप कठीण आहे, परंतु ‘ई-लर्निंग’ व्हिडिओ ऐकल्यानंतर, त्यांना इंग्रजी भाषा समजणे सोपे जाते. जसे आपण सतत ऐकून आपली मातृभाषा शिकतो, त्या पद्धतीने ई-लर्निंग व्हिडिओ उपक्रमातून विद्यार्थांना इंग्रजीत कसे बोलावे हे शिकवले जाते. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी विद्यार्थांना मदत होत आहे.
शेतीमधील उपक्रमाला सुरुवात
ग्रामीण भागातील विद्यार्थांचा शिक्षण संपल्यानंतर पुढील काळात नोकरीसाठी शहरांमध्ये जाण्याचा कल असतो. हे लक्षात घेऊन या विद्यार्थांना शालेय जीवनापासून शेतीची आवड तयार होण्यासाठी संस्थेने शेतीविषयक माहिती शाळेच्या माध्यमातून देण्यास सुरुवात केली. याचबरोबरीने गावातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या सहकार्याने संस्थेने जमीन सुपीकता आणि सेंद्रिय शेती पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. संस्थेने सुरुवातीला पासली (जि. पुणे) येथील शालेय विद्यार्थांना जमीन सुपीकतेबाबत मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली.
पहिल्या टप्यात रोहा (जि. रायगड) या परिसरातील गावांमध्ये शेतकऱ्यांचे प्रबोधन सुरू केले. शेतीविषयक माहिती देण्यासाठी संस्थेने कृषी विभागाच्या साथीने बारा गावांमध्ये ग्रामसभेचे आयोजन केले. यामध्ये काही ग्रामसभांना तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर संस्थेने रायगड जिल्ह्यातील ‘रामेती’ संस्थेच्या माध्यमातून खोपोली येथे शेती प्रशिक्षण कार्यक्रमांच्या आयोजनास सुरुवात केली. याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान कार्यक्रमामध्ये संस्थेचे पदाधिकारी शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी जातात. संस्थेने रायगड जिल्ह्यातील बाराहून अधिक गावांमधील शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले होते. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील मुळशी परिसरामध्ये शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमांना सुरुवात केली. गेल्या चार वर्षांत या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
जमीन सुपीकतेबाबत मार्गदर्शन
संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या शेतकरी प्रशिक्षणामध्ये जमीन सुपीकता तसेच आरोग्यदायी पीक उत्पादनासाठी जिवामृत, बीजामृत निर्मिती आणि वापर, आच्छादन आणि वाफसा याबाबत मार्गदर्शन केले जाते. गरजेनुसार प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये शिवारफेरीचे आयोजन केले जाते. याचबरोबरीने पीक लागवड तंत्राबाबत माहिती देताना आंतरपीक, सापळा पीक, मित्र कीटक, मित्र पक्षी यांच्या फायद्याबाबत सखोल माहिती दिली जाते.
पाणी, हवा, मातीची गुणवत्ता तसेच निसर्ग चक्र, उपयुक्त जिवाणू, गांडुळांचे शेती विकासामध्ये कसे महत्त्व आहे, याबाबत शेतकरी, विद्यार्थी, महिला बचत गटांना प्रात्यक्षिकांसह समजावून सांगितले जाते. या प्रशिक्षणाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, अहिल्यानगर या जिल्ह्यांतील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सोबत संस्था कार्यरत आहे. या ठिकाणी कृषी विभागाच्या सहकार्याने विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नैसर्गिक घटकांचा वापर करून सेंद्रिय खते, कीटकनाशकांच्या निर्मितीबाबत माहिती दिली जाते.
विद्यार्थांना प्रशिक्षण
येत्या काळात ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी संस्थेने ‘विद्यार्थी सहायक समिती’शी सहयोग केला आहे, जेणेकरून ते महाविद्यालयीन तरुणांना प्रशिक्षण देऊ शकतील. संस्थेने दहा विद्यार्थ्यांची पहिली तुकडी तयार केली आहे. या विद्यार्थांना संकल्पना आणि व्यावहारिक प्रशिक्षण दिले जात आहे. हा तीन महिन्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम आहे.
निवड झालेले विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील आहेत. विद्यार्थांना नैसर्गिक शेती तंत्राचे प्रशिक्षण मिळाले, की ते त्यांच्या स्वतःच्या शेतात हे अंमलात आणतील आणि त्यांच्या गावातील शेतकऱ्यांना याबद्दल प्रशिक्षण देतील. या माध्यमातून ग्रामीण भागात शेतीविषयक प्रशिक्षक तयार करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. प्रशिक्षणातील मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांच्या भांडवली खर्चामध्ये बचत होते. शेती उत्पादनाचा दर्जा देखील सुधारला आहे. तसेच ग्राहकांना दर्जेदार शेतीमाल उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
skillvikasfoundation@gmail.com
(लेखिका ‘स्किल विकास फाउंडेशन’ या संस्थेच्या संस्थापिका आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.