
Pune News : शहरांमध्ये देशी गायी पाहायला मिळणे तसे दुर्मिळच. शहरी मुलांना तर गाय केवळ चित्रांमध्ये किंवा टीव्ही, मोबाईलच्या स्क्रिनवरच पाहायला मिळते. अशा शहरी नागरीकांना आता गो पर्यटनाच्या माध्यमातून देशी गायींचा प्रत्यक्ष सहवास अनुभवता येणार आहे. तसेच देशी गायींच्या विविध जातींची माहितीही मिळणार आहे. यासाठी पुणे कृषी महाविद्यालयाच्या देशी गोपालन केंद्राने पुढाकार घेत गो पर्यटनाचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
अमेरिकी पाहुण्यांनी घेतला गो पर्यटनाचा आनंद
या गो पर्यटन केंद्राला नुकतीच टेक्सटॅक्स यूएस कॉर्पोरेशन या अमेरिकन कंपनीच्या संस्थापक अध्यक्षांसह १५ कर्मचाऱ्यांच्या चमूने भेट दिली. या गो पर्यटनाचा लाभ घेणारी ही पहिलीच गो पर्यटकांची तुकडी ठरली. देवयानी एम्. यांच्या योग ऊर्जा या संस्थेच्या माध्यमातून कार्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना ही संधी देण्यात उपलब्ध करून देण्यात आली.
देशातील प्रमुख देशी दुधाळ गोवंश एकाच ठिकाणी
भारतातील दुधासाठी प्रसिद्ध असणाऱ्या साहिवाल, गीर, लाल सिंधी, थारपारकर व राठी या पाचही गोवंशांच्या जातीवंत गायी आणि वळूंचे देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रात एकत्रित करून संगोपन केले जात आहे.
विशेष म्हणजे दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारे हे पाचही देशी दुधाळ गोवंश एकत्र उपलब्ध असणारे हे देशातील एकमेव केंद्र आहे. याशिवाय या केंद्रावर महाराष्ट्रातील खिलार, कोकण कपिला, डांगी, देवणी, लाल कंधारी आणि गौळाऊ या गायींच्या जातींबरोबरच आंध्र प्रदेशातील जगातील सर्वात लहान उंचीची पुंगनूर आणि मिनीएचर पुंगनूर गायीचे देखील याठिकाणी संगोपन केले जाते.
गो पर्यटनादरम्यान पर्यटकांना देशी गोवंशांचे महत्त्व, उपयुक्तता, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची उद्दिष्टे, चालू असलेले संशोधन व इतर कार्य या विषयी अवगत केले जाते. या शिवाय पर्यटकांना येथील शाश्वत देशी गोपालनाचे मॉडेल, दुग्ध, गोमय व गोमूत्र प्रक्रिया करण्याचे एकात्मिक मॉडेल, गोबर गॅस व सौर ऊर्जा प्रणाली व गाईंच्या उपचाराकरता आवश्यक वनस्पतींचे संग्रहालय देखील इथे पहावयास मिळते.
११ देशी गोवंशाची गो परिक्रमा
गो परिक्रमेच्या माध्यमातून भारतातील ११ देशी गोवंश एकत्र एकाच ठिकाणी पाहता येणार आहे. देशी गायींची वासरे, कालवडी आणि गायींच्या वात्सल्यपूर्ण सहवासात वेळ घालवून ताण-तणावातून सुटका करून घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच पर्यटकांना गायी-वासरांना ओला हिरवा चारा, पशुखाद्य, गूळ-डाळ असे पशुखाद्य गायींना खाऊ घालण्याचा अनुभवही घेता येणार आहे.
काऊ कडलिंग थेरपी
गो पर्यटनादरम्यान पर्यटकांना काऊ कडलिंग थेरपीचा अनुभवही घेता येणार आहे. काऊ कडलिंग म्हणजे गाईला मिठी मारणे. यामध्ये गाईला मिठी मारणे, तिच्या सानिध्यात, सहवासात वेळ घालवता येतो. यामुळे आपल्याला गायीची उब आणि प्रेम अनुभवता येते.
गायीच्या शरीराची ऊब, तिच्या हृदयाचे ठोके यामुळे गायीला मिठी मारणाऱ्याला एक वेगळाच अनुभव मिळतो. आजच्या ताण-तणावाच्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीत काऊ कडलिंगमुळे ग्रामीण जीवन आणि निसर्गाकडे परत वळण्याची संधी मिळणार आहे.
देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील गो पर्यटन उपक्रम सशुल्क असून गो पर्यटक कोणत्याही शनिवारी किंवा रविवारी पूर्व कल्पना देऊन गो पर्यटनाचा अनुभव घेवू शकतात. सदरील गौ पर्यटनाचा लाभ मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषा समजणाऱ्या पर्यटकांना घेता येईल.
गो पर्यटन उपक्रमादरम्यान पर्यटकांना डॉ. सोमनाथ माने, प्रमुख शास्त्रज्ञ, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, डॉ. धीरज कंखरे, तांत्रिक प्रमुख, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, डॉ. मृणाल अजोतीकर, सहाय्यक प्राध्यापक, कृषी विस्तार, डॉ. सुजित भालेराव, सह-शास्त्रज्ञ, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र व श्री. सचिन इंगवले, पशुधन पर्यवेक्षक हे सर्व पर्यटकांना माहिती व मार्गदर्शन करण्याचे तसेच आवश्यक ती मदत, सहाय्य करण्याचे काम करतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.