Turmeric Production : राज्यातील प्रमुख हळद उत्पादक जिल्हा म्हणून हिंगोलीची ओळख झाली आहे. जिल्ह्यात डोंगराळ, जिरायती क्षेत्र अधिक आहे. संत नामदेव सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार ॲड. शिवाजी माने यांच्या पुढाकारातून तोंडापूर (ता. कळमनुरी) येथे कृषी विज्ञान केंद्राची (केव्हीके) स्थापना १९ डिसेंबर २००१ मध्ये झाली.
डोंगराळ जमिनीवर ५० एकरांवर कृषी विज्ञान केंद्राचे प्रक्षेत्र आहे. डॉ. प्रमोद शेळके हे केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. ‘टीम’मध्ये राजेश भालेराव (कृषिविद्या), अनिल ओळंबे (उद्यानविद्या), अजयकुमार सुगावे (पीक संरक्षण), साईनाथ खरात (मृदाशास्त्र), डॉ. अतुल मुराई (विस्तार शिक्षण), डॉ. कैलास गिते (पशुविज्ञान), रोहिणी शिंदे (गृहविज्ञान), प्रक्षेत्र व्यवस्थापक शिवलिंग लिंगे आदीचा समावेश आहे.
केव्हीकेचे उपक्रम आद्यरेषीय पीक प्रात्यक्षिके
-कृषी विद्यापीठांकडून विकसित विविध पीक वाणांची दरवर्षी १५० ते २०० आद्यरेषीय प्रात्यक्षिके शेतकऱ्यांच्या शेतावर. यात सोयाबीन एएमएस १००१, पीडीकेव्ही यलो गोल्ड, केडीएस ७२६ (फुले संगम), केडीएस ७५३ (फुले किमया), तूर बीडीएन ७१६, ज्वारी परभणी शक्ती, हरभरा फुले विक्रम आदी वाणांचा समावेश.
-यंदा सोयाबीनचे पायभूत व प्रमाणित बियाणे मिळून सहा टन उत्पादन.
हळदीच्या वाणांचा संग्रह
-केंद्रात हळदीच्या सुमारे २० वाणांचा संग्रह. यात केरळ राज्यातील भारतीय मसाला पीक संशोधन केंद्र, कृषी विद्यापीठे व संस्थांकडील वाणांचा समावेश.
उदा. आयएसआर प्रगती, सेलम, राजापुरी, रश्मी, राजेंद्र सोनाली, पंत पिताभी, डुग्गी राला रेड, राजेंद्र सोनिया, बीएसआर २, फुले स्वरूपा, एसीसी ७९, आंबे हळद, काडी हळद आदी. वाणांची आद्यरेषीय प्रात्यक्षिकेही घेण्यात येतात.
जैविक निविष्ठांची निर्मिती
-माती परीक्षण व फिरती माती परीक्षण प्रयोगशाळा. सन २०१२ पासून ते आतापर्यंत तीन लाख १८ हजारांवर माती नमुन्यांची तपासणी.
-किटद्वारे अवघ्या काही मिनिटांत सेंद्रिय कर्बाची चाचणी घेण्याची सुविधा.
-वर्षाला सरासरी एक टन ट्रायकोडर्मा, मेटारायझियम या जैविक घटकांची निर्मिती. प्रति किलो २०० रुपये दराने विक्री.
-जिवामृत निर्मितीसाठी चार हजार लिटर क्षमतेचे यंत्र. प्रति लिटर २० रुपये दराने विक्री.
-शेण व ट्रायकोडर्मायुक्त सेंद्रिय पॅलेटस निर्मिती. शहरांतील परसबाग, कुंड्यांमध्ये वापरण्यासाठी त्याचा फायदा.
दुग्ध व्यवसाय
-केव्हीकेच्या प्रक्षेत्रावर २५ उस्मानाबादी शेळ्यांचा फार्म. गिरिराज, वनराज कोंबड्यांचे पालन.
-केव्हीकेच्या प्रोत्साहनातून कयाधू शेतकरी कंपनीची स्थापना. दोन्हींच्या संयुक्त प्रयत्नांतून
सुमारे ८० गीर गायींचे मुक्त संचार पद्धतीने संगोपन. जुनागढ विद्यापीठातून दोन वळू आणले आहेत. त्यातून शुद्ध पैदाशीचा प्रयत्न. प्रति दिन १०० लिटर दूध संकलन. डेअरी व स्थानिक परिसरात विक्री.
-गोळीपेंड निर्मिती. सुधारित चारा वाणांची लागवड. अझोला निर्मिती
अन्य पूरक स्रोत
-प्रक्षेत्रावर दोन हेक्टर तलावक्षेत्र. तेथे रोहू, कटला, मृगळ, सायप्रिनस, कार्प आदी माशांचे
उत्पादन. वर्षाला एकूण २- ३ टन उत्पादन. व्यापारी जागेवर खरेदी करतात.
-शेतकऱ्यांनाही त्याचे प्रशिक्षण. मत्स्यबीज व मासेखाद्याची विक्री.
-रेशीम शेती अंतर्गत कोष काढणी यंत्र, ह्युमिडीफायर, हिटर यंत्राची प्रात्यक्षिके.
-केव्हीके व जिल्हा रेशीम कार्यालयाच्या सहकार्याने परिसरातील गावांतील ५० शेतकरी रेशीम शेतीकडे वळले आहेत.
-वीस शेतकऱ्यांनी शेळीपालन व्यवसाय सुरू केले आहेत.
यांत्रिकीकरण
-कांदा प्रतवारी यंत्राची सुविधा उपलब्ध.
-माथा ते पायथा उपायोजनांतर्गत सलग खोल समतल चर, ढाळीचे बांध, सिमेंट नाला बंधारे, शेततळे आदींची कामे, चारपैकी एक शेततळ्याची पाच कोटी लिटर पाणीसाठवण क्षमता.
-सोयाबीनमध्ये रुंद वरंबा सरी, गादी वाफा, हळदीत गादीवाफा तंत्रज्ञानाचा प्रसार.
-शेतकरी कंपनीकडील अवजारांचा भाडेतत्त्वावर पुरवठा. त्यात दगड वेचणी अवजाराचाही समावेश.
रोपवाटिका, फळबाग
-पॉलिहाउसमध्ये विविध भाजीपाला, आंबा, पेरू, अंजीर, फणस,नारळ आदींच्या रोपांची निर्मिती. -
-दरवर्षी १० ते १५ लाख रोपांची विक्री. १० हेक्टर आंबा बाग. त्याच्या २२ वाणांची लागवड. दोन एकरांत नारळ व अंजीर. बांबू, साग, अश्वगंधा, गुळवेल, तुळस आदींची लागवड.
प्रशिक्षण, तंत्रज्ञान प्रसार
-महिला बचत गटांना डाळनिर्मिती, हळद पावडर, सौरऊर्जा यंत्राद्वारे भाजीपाला निर्जलीकरण,‘किचन गार्डन’ आदी विषयांवर उद्योजकता विकास प्रशिक्षण. ३५० महिलांना त्याचा लाभ.
-जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील ३० गावांमध्ये केव्हीकेतर्फे कृषी विज्ञान मंडळे. त्याद्वारे तीन हजार शेतकरी केव्हीकेशी विविध माध्यमातून जोडले आहेत.
-छत्रपती शिवाजी महाराज वनश्री (२०१२) हा शासनाचा तर हिंगोली कृषी रत्न हा जिल्हा परिषदेचा पुरस्कार केव्हीकेला मिळाला आहे.
संपर्क - डॉ. प्रमोद शेळके, ९७६५३९०९७६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.