Turmeric Bajarbhav : हळदीच्या वायद्यांनी जवळपास मागील दीड वर्षातील उचांकी टप्पा गाठला. ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यातील वायद्यांनी १० हजारांची पातळी गाठली होती. बाजार समित्यांमधील हळदीची आवकही कमी दिसत आहे. कमी आवक आणि वायद्यांमधील तेजी यामुळे बाजार समित्यांमधील भावही सुधारले आहेत.
हळदीच्या दरात मागील दोन आठवड्यांपासून सुधारणा झालेली दिसते. वायद्यांमध्ये हळदीच्या दरातील तेजी कायम आहे. हळदीच्या वायद्यांनी शुक्रवारी १० हजार रुपयांचा टप्पा पार केला होता.
फेब्रुवारी २०२२ नंतर पहिल्यांदाच हळदीच्या वायद्यांनी १० हजारांची पातळी दाखवली. शुक्रवारी ऑक्टोबर डिलेव्हरीचे वायदे उचांकी १० हजार ४८० रुपयांवरून ९ हजार ९०४ रुपयांवर बंद झाले होते. तर ऑगस्टचे वायदेही एकदा १० हजारांवर पोचल्यानंतर ९ हजार ५१८ रुपयांवर बंद झाले. १३ जूनपासून हळदीच्या वायद्यांनी वाढीची दाखवलेली दिशा कायम होती.
बाजार समित्यांमध्ये हळदीला सध्या ७ हजार ते ८ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील बाजारात होणारी आवक कमीच आहे. तसेच सर्व राज्यांमध्ये सध्या हळदीचे भाव वाढलेले आहेत. महत्वाच्या बाजारांमध्ये दरात सुधारणा झाल्याने एकूणच बाजाराला चांगला आधार मिळाला.
यंदा जून महिन्यात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तमिळनाडूत कमी पाऊस झाला. लागवडीयोग्य पाऊस नसल्याने उशीर झाला. लागवड क्षेत्र कमी दिसत आहे. तसेच यंदा महाराष्ट्रातील हळद लागवड १० ते २० टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज आहे. तर तमिळनाडूत १० ते १५ टक्के आणि आंध्र प्रदेश तसेच तेलंगणातील हळद लागवड क्षेत्र १८ ते २२ टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे.
नुकत्याच झालेल्या पावसाने महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील हळद पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. सोबतच बिपरजाॅय चक्रीवादळाचाही फटका काही राज्यांतील पिकाला बसला आहे. महत्वाच्या हळद उत्पादक राज्यांमध्ये पाऊस नसल्याने हळद लागवड उशीरा होणार आहे, असे केडिया कमोडिटीजचे संचालक अजय केडिया यांनी सांगितले.
तेजी टिकेल का?
लागवडीला होणारा उशीर, एल निनो, लागडीत घटीचा अंदाज या कारणांमुळे यंदा हळद उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. तसेच एप्रिलपासून देशातून होणारी हळद निर्यात वाढली आहे. यामुळे दरवाढीला आधार मिळाला.
पुढील काळात माॅन्सूनवर एल निनोचाही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोमुळेही हळदीच्या तेजीला आधार मिळाला. पुढील काळातही हळदीच्या दरातील तेजी कायम राहू शकते, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.