Agriculture Management : सातारा जिल्ह्यातील कांबिरेवाडी (ता. कऱ्हाड) हे सुमारे १५०० लोकसंख्येचे गाव आहे. गावात पूर्वी पाणीटंचाई होती. कॅनॉलची सोय झाल्यानंतर गावातील बागायती पर्यायाने ऊसक्षेत्रात वाढ होत गेली. गावातील तात्यासाहेब जगन्नाथ कांबिरे यांची २२ एकर शेती आहे.
त्यांनी रसायनशास्त्र विषयात पदवी घेतली. त्यानंतर रासायनिक कंपन्यांमध्ये ते नोकरीचा अनुभव घेऊ लागले. त्या वेळी वडील व बंधू रवींद्र शेतीची जबाबदारी सांभाळायचे. नोकरीचा सुमारे १६ वर्षांचा अनुभव तयार झाला.
त्या वेळी वडील शरीराने थकत चालले होते. घरचे क्षेत्र जास्त होते. त्यामुळे शेतीकडेच पूर्ण लक्ष देऊन त्याचा विकास करावा असे ठरवून तात्यासाहेब २०१० च्या दरम्यान कायमसाठी गावी परतले.
शेतीचा विकास
तात्यासाहेबांनी शेतीत पाऊल टाकले त्या वेळी उसाचे एकरी ४० ते ५० टनांच्या दरम्यान उत्पादन होते. दरम्यान, अर्थार्जनासाठी ऑइल व्यवसायही सुरू केला. त्यात जम बसवत असताना शेती विकसित करण्यास सुरुवात केली.
शेतात अधेमधे असलेले रस्ते कडेला काढून व्यवस्थित ‘प्लॉट’ तयार केले. कृष्णा नदीवरून पाइपलाइन केली. दोन वडिलोपार्जित विहिरींवरून बागायती सिंचनाची सोय केली.
पूर्वी साडेतीन फुटी सरी पद्धतीने लागवड, पाटपाणी, कांड्यांची लागवड असे पारंपरिक नियोजन होते. त्यात टप्प्याटप्प्याने सुधारणा सुरू केल्या. त्यातून अपेक्षित परिणाम मिळू लागला.
उत्पादन व उत्पन्न
सर्व व्यवस्थापनातून एकरी ८० ते ९० टन उत्पादनापर्यंत मजल मारली आहे. मागील वर्षी ९७ टन तर यंदा ९२ टन उत्पादन मिळाले. एकरी उत्पादन खर्च ९० हजार रुपयांपर्यंत येतो.
जयवंत शुगर कारखान्याला ऊसपुरवठा होतो. प्रति टन तीन हजार ते ३१०० रुपये दर मिळतो. खोडव्याचे ६५ ते ७० टन उत्पादन मिळते.
टोमॅटो- काकडी पीकपद्धती
तात्यासाहेब सांगतात, की आमचे एक क्षेत्र पडीक व कोरडवाहू होते. शेणखत, प्रेसमड वापरून ते उपजाऊ करण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यात सोयाबीन, शाळू आदी पिके घेतली. सिंचनाची सोय केल्यानंतर ऊस घेण्यास सुरवात केली.
मात्र हलकी, माळरान जमीन असल्याने येथे ऊस घेण्यापेक्षा भाजीपाला पिकांसाठी ती विकसित करण्याचे ठरवले. त्यानुसार व्यावसायिक दृष्टिकोनातून पद्धतशीरपणे टोमॅटो- काकडी अशी पीकपध्दतीची रचना केली.
...असे आहे लागवडीचे नियोजन
सध्या सहा एकरांत मेच्या दरम्यान टोमॅटोची पहिली लागवड होते. काढणीनंतर ऑगस्टच्या कालावधीत त्याच क्षेत्रावर टोमॅटोची दुसरी लागवड केली जाते. या प्लॉटनंतर तोच मल्चिंग पेपर, तारा, काठ्या या ‘स्ट्रक्चर’च्या आधारे तेथे तिसरे पीक काकडी घेतली जाते. त्यामुळे खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते.
तात्यासाहेब सांगतात की टोमॅटोच्या दरात सतत चढउतार असतात. त्यामुळे दोन वेळा टोमॅटो घेतो. त्यामुळे एका हंगामात दरांनी साथ न दिल्यास दुसऱ्या हंगामात फायदा होतो. एकरी १० ते १२ टन उत्पादन मिळते. अन्य भाजीपाला पिकांपेक्षा हे पीक मजूरबळासाठी कमी त्रासाचे आहे.
यंदा बेळगावला प्रति किलो १३ रुपये दराने टोमॅटो जागेवर दिला. काकडीचे एकरी १० ते १२ टन उत्पादन मिळते. त्यास किलोला २० ते २२ रुपये दर शक्यतो मिळतो. त्यात सातत्य राहते. टोमॅटो व काकडी वाशी मार्केटला पाठवतो.
असा प्रकारे दोन वेळा टोमॅटो व काकडी ही पद्धती उसापेक्षा अर्थकारण मजबूत करण्यासाठी उपयोगी पडल्याचे तात्यासाहेब सांगतात. त्यांना वडील व बंधूंसह आई गोकूळा, पत्नी माधवी यांची मोठी मदत होते.
प्रगतिशील शेतकरी विनोद यादव यांचे मार्गदर्शन होते. शेतीला जोड म्हणून आंब्याची ५०, सीताफळ ३०, पेरूची २२ तसेच अन्य फळबाग लागवड केली आहे.
सध्याच्या शेतीतील ठळक नियोजन
सध्या दहा ते १२ एकर क्षेत्रावर ऊस (को ८६०३२ वाण). सहा एकर आडसाली लागवड, तर सहा एकर खोडवा. लागवडीचे अपेक्षित उत्पादन मिळाले तर खोडवा.
कामे वेळेत व्हावीत यासाठी मोठा ट्रॅक्टर. त्यासाठी लागणारी सर्व अवजारे.
लागवडीपूर्वी कारखान्याकडील प्रेसमड किंवा शेणखत यांचा एकआड एक वर्ष एकरी सहा ट्रेलर वापर.
घरची सहा जनावरे (म्हशी व एक देशी गाय). त्यातून दोन- तीन एकरांना पुरेल एवढे शेणखत उपलब्ध होते. उर्वरित क्षेत्रासाठी विकत घेतले जाते.
कोल्हापूर येथून रोपे आणून पाच बाय दीड फूट अंतरावर लागवड. बाळभरणीपर्यंत भांगलणी. त्यानंतर तणनाशकांचा वापर.
पूर्वी पाचट कुट्टीसाठी भाडेतत्त्वावर यंत्र आणले जायचे. अलीकडेच ‘मल्चर’ घेतले आहे. त्याच्या साह्याने कुट्टी होतेच. शिवाय खोडवा उसात जमिनीलगत बुडखे ठेवण्याचे काम हे यंत्र करते. यामुळे फुटव्यांची संख्या योग्य राहते. पेरे चांगले निघून उसाची वाढ चांगली होते. पाचट कुजवण्यासाठी जिवाणू कल्चरचा वापर होतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.