Poultry Farming : हॅचरी, पक्षी-अंडी उत्पादन अन विक्रीपर्यंत यंत्रणा

Poultry Farmer : ‘यशराज पोल्ट्री फार्म’चे नावाप्रमाणेच यश
Poultry Farming
Poultry FarmingAgrowon

सुदर्शन सुतार

Poultry Farmer of Maharashtra : शेटफळ (जि. सोलापूर) येथील संतोष आणि राहुल या वागज बंधूंनी पैदाशीसाठी देशी सुधारित कोंबडीपालन व अंडी उत्पादनासाठी लेअर कोंबडीपालन केले. दहा वर्षांच्या अनुभवातून व कौशल्यातून त्यांनी हॅचरी, पक्षी व अंडी उत्पादन ते विक्री व्यवस्था अशी यंत्रणाच विकसित केली आहे. त्यांच्या ‘यशराज पोल्ट्री फार्म’ ने नावाप्रमाणेच व्यवसायात यश मिळवले आहे.

सोलापूर-पुणे महामार्गावर शेटफळ (ता. मोहोळ) येथे वागज कुटुंबाची १४ एकर शेती आहे.
सध्या कुटुंबातील संतोष आणि राहुल हे बंधू शेती आणि पोल्ट्री व्यवसाय सांभाळतात. त्यांची
१४ एकर शेती असून दोन एकरांत पोल्ट्री आहे. संतोष यांचे बी.ए.पर्यंत तर राहुल यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. राहुल पूर्वीपासूनच शेतीत होते. तर संतोष दूध संस्थेत लिपिक होते. त्यांचे वडील प्रल्हाद शेतीच करायचे. दोघा बंधूंनी पूर्णवेळ शेतीत लक्ष घातले त्या वेळी व्यावसायिक शेतीवर भर दिला.

केळी, डाळिंब, पेरू आदींची निवड केली. केवळ पिकांवर अवलंबून राहणं शक्य नसल्यानं पूरक म्हणून पोल्ट्री व्यवसायाची निवड केली. आज त्यांचे संपूर्ण कुटुंब या व्यवसायात गुंतले आहे. दहा वर्षांच्या सातत्यातून यशराज पोल्ट्री फार्म असे नाव व आदर्श पोल्ट्री व्यावसायिक म्हणून या कुटुंबाने आपली ओळख तयार केली आहे.

व्यवसायाची सुरुवात

संतोष यांनी फलटण येथे २०११ मध्ये पोल्ट्री व्यवसाय पाहिला. त्याची प्रेरणा घेत दोन्ही बंधूंनी
त्या पोल्ट्रीतून दोन हजार सुधारित देशी कोंबड्या आणल्या. त्यांच्यासहित शेड, पशुखाद्य व अन्य सामग्री मिळून दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली. पहिला अनुभवातील प्रयत्न आश्‍वासक ठरले.
उत्पन्न चांगले मिळाले. आत्मविश्‍वास वाढला. मग २०१३ मध्ये नोकरी सोडून देत संतोष
पूर्णवेळ पोल्ट्री व्यवसायात उतरले.

देशी सुधारित कोंबडीपालन

वागज बंधू आज दोन प्रकारे पोल्ट्री व्यवसाय करतात. यात पैदास (ब्रीडिंग) या हेतूने सुधारित देशी ब्रीडचे कोंबडीपालन केले जाते. तर खासगी कंपनीच्या मदतीने अंडी उत्पादनासाठी लेअर कोंबडीपालनही केले जाते. संतोष म्हणाले, की संकरीकरणातून तयार केलेली कोंबडीची सुधारित जात ८० टक्के देशी आहे. तिला चांगला उठाव मिळतो. अंडी उत्पादनापेक्षाही मांस उत्पादनासाठी ती अधिक पाळली जाते. दोन हजार कोंबड्यांपासून सुरू झालेला हा व्यवसाय आता पाच हजार कोंबड्यांपर्यंत पोहोचला आहे. अंडी ते पिलू निर्मिती व अंड्यातून ते बाहेर येणे ही सर्व प्रक्रिया सुमारे २१ दिवसांची असते. यासाठी हॅचिंग युनिटची सुविधा उभारली आहे. सोबत १९० बाय ३० फूट, १५० बाय ३० फूट व १३० बाय ३० फूट असे तीन शेड्‍स उभारले आहेत. पहिल्या शेडमध्ये पिलांचा एक दिवसापासून चार महिन्यांपर्यंत सांभाळ केला जातो. अंड्यावर येण्याच्या आधी दुसऱ्या व तिसऱ्या शेडमध्ये त्यांना स्थलांतरित केले जाते.

Poultry Farming
Poultry Farming : ‘परसबागेतील कुक्कुटपालन’व्यवसायाद्वारे करा अंडी उत्पादन

व्यवस्थापनातील ठळक बाबी

-पुरेशी मोकळी हवा खेळेल या पद्धतीने शेड्‍सची उभारणी.
-खाद्य, पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र भांडी. सोयीनुसार हव्या त्या वेळेला खाद्य, पाणी घेता येईल अशी व्यवस्था.
-पाच हजार कोंबड्यांसाठी दररोज किमान एक टन पशुखाद्य लागते. ते बाहेरून खरेदी करणे खर्चिक असते. त्यामुळे खाद्यात स्वयंपूर्णता मिळवण्यासाठी स्वतःची फीड मिल. मका, सोया, डीओसी (सोयाबीनवर आधारित), डीओआरबी आणि जीवनसत्त्वे आदी घटकांचे मिश्रण करून पशुखाद्य निर्मिती. पशुवैद्यकांच्या सल्ल्याने खाद्याचे प्रमाण निश्‍चित केले जाते. प्रति पक्षी ११० ते १२० ग्रॅम खाद्य दिले जाते.
-अंडी घालण्यासाठी स्वतंत्र प्लॅस्टिक क्रेट्‍स. दररोज सकाळी १०, दुपारी १२ व दुपारी ३ अशा तीन वेळेला अंडी गोळा केली जातात. पुढे हॅचरीसाठी रवाना होतात.

Poultry Farming
Poultry Farming : अंडी विक्रीसाठी तयार केला ब्रॅण्ड

देशी सुधारित कोंबडी विक्री व्यवस्था

सध्या पाच हजार पक्ष्यांची बॅच गृहीत धरली तर आठवड्याला सुमारे १० हजार, तर महिन्याला
४० हजारांपर्यंत पक्षी उपलब्ध होतात. प्रति पिलू किंमत २५ रुपये असते. वागज यांनी मोहोळ, पंढरपूर, बार्शी, उत्तर सोलापूर, माढा, इंदापूर आदी तालुक्यांतील छोटे-मोठे सुमारे ११० पोल्ट्री व्यावसायिक तयार केले आहेत. तेच या पक्ष्यांची खरेदी करतात आणि पुढे त्यांचा व्यवसाय करतात. वागज यांच्याकडून संपूर्ण व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले जाते. कोणत्या पोल्ट्रीकडून किती मागणी आहे याच्या दररोजच्या नोंदी ठेवण्यात येतात. त्यामुळे अन्यत्र मार्केट शोधत जाण्याची गरज पडत नाही. या व्यवसायातून २० ते २५ टक्के नफा मिळतो.

अंडी विक्री

लेअर कोंबड्यापासून दररोज साडेचार हजार ते पाच हजारांपर्यंत अंडी मिळतात. अंड्यांचा दर दररोज बदलतो. मात्र प्रति अंडी सरासरी दर साडेचार ते पाच रुपयांच्या आसपास मिळतो. अनेक वेळा तो
उत्पादन खर्चापेक्षाही कमी मिळतो. प्रति अंडी ६० ते ७० पैसे नफा मिळतो. व्यापारी जागेवर येऊन अंडी खरेदी करतात. पूर्वीची नोकरी आणि आत्ताचा व्यवसाय यांची तुलनाच होऊ शकत नाही एवढे आर्थिक उत्पन्न व समाधान शेती व पूरक व्यवसायातून मिळत असल्याचे संतोष सांगतात.

संपर्क ः संतोष वागज, ९६६५२६४३३६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com