Vegetable Farming : व्यावसायिक भाजीपाला लागवडीचे नियोजन

Vegetable Cultivation : आपल्या देशातील हवामान व त्यातील विविधता, जमीन, भरपूर सूर्यप्रकाश, पाणी आणि अन्य घटकांची उपलब्धता यामुळे वर्षभर भाजीपाला उत्पादन घेणे शक्य होते.
Vegetable Farming
Vegetable FarmingAgrowon

डॉ. अरविंद सोनकांबळे, डॉ. सोनाली वानखडे

Vegetable Farming Management : आपल्या देशातील हवामान व त्यातील विविधता, जमीन, भरपूर सूर्यप्रकाश, पाणी आणि अन्य घटकांची उपलब्धता यामुळे वर्षभर भाजीपाला उत्पादन घेणे शक्य होते. पूर्वीपासूनच शेतकरी कमी अधिक प्रमाणात भाजीपाला उत्पादन घेत आले आहेत. पण व्यावसायिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन घेण्यासाठी अपेक्षित ग्राहकांची मानसिकता, बाजारपेठेतील मागणी आणि वर्षभर वेगवेगळ्या काळामध्ये मिळणाऱ्या दरांचा अभ्यास करणे गरजेचे असते.

उदा. नुसतेच वांग्याला किंवा कारल्याला चांगली मागणी असते, यापेक्षाही या विशिष्ट बाजारपेठेमध्ये पांढऱ्या कारल्याऐवजी हिरवी कारली अधिक विकली जातात. किंवा लांब वांग्यांपेक्षा जास्त गोल जांभळ्या व काटेरी वांग्यांना जास्त मागणी असते. इतक्या बारकाईने विचार करणे गरजेचे असते. त्याच प्रमाणे वाणांची निवड करताना आपल्या भागात येणाऱ्या किडी रोगांच्या प्रादुर्भावाचा आणि त्यांच्यासाठी प्रतिकारक वाणांचा विचार करावा.

वाणांची निवड

योग्य वाणाची निवड ही अत्यंत महत्त्वाची ठरते. यासाठी हंगामनिहाय अधिक उत्पादन देणाऱ्या, रोग व किडीस कमी बळी पडणाऱ्या बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करणाऱ्या, गुणवत्तापूर्ण उत्पादन देणाऱ्या वाणाची निवड करावी. त्यासाठी शेतकऱ्यांनी नेहमीच चौकस बुद्धी विचार करावा. बियाणे, रोपे खात्रीशीर ठिकाणांहून रीतसर पक्क्या पावतीसह खरेदी करावीत. बियाणे वैधता, लॉट नंबर, उगवण क्षमता, लागवड हंगाम या बाबी तपासाव्यात. (तक्ता पाहा)

प्रो ट्रेमध्ये रोपे तयार करणे

काही भाजीपाला पिकांची लागवड प्रत्यक्ष शेतात बी पेरून केली जाते. मात्र काही भाजीपाला पिकांचे बी आकाराने अतिशय लहान असल्याने आधी रोपवाटिका तयार करावी लागते. प्रो ट्रेमध्ये निर्जंतुक कोकोपीट माध्यमामध्ये रोपे तयार करणे फायद्याचे असते. बियाण्यास थायरम किंवा कॅप्टन किंवा कार्बेन्डाझिम ३ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात घेऊन प्रक्रिया करावी. ट्रेमधील बी उगवून आल्यावर रोपांची काळजी घ्यावी. बियांची उगवण पाच ते सहा दिवसांत होऊन ३५ दिवसांत पुनर्लागवडीसाठी रोपे तयार होतात.

Vegetable Farming
Vegetable Farming : प्रत्येकी ३० गुंठे भाजीपाला उत्पादनातून मिळविले स्थैर्य

जमीन निवड

पिकांनुसार विविध अन्नद्रव्यांचा पुरवठा करणाऱ्या व पिकांनुसार आवश्यक ओल टिकवून ठेवणाऱ्या जमिनी असाव्यात. पिकाच्या मुळाच्या वाढीनुसार जमिनीची खोली असावी. पिकांना अन्नद्रव्ये उपलब्ध होणे, ही प्रक्रिया जमिनीच्या सामूवर (पीएच) अवलंबून असते. तो पिकानुसार योग्य व उदासीनच्या जवळपास असावा. मातीचा सामू, क्षारता व अन्नद्रव्यांच्या उपलब्ध प्रमाण जाणून घेण्यासाठी माती परीक्षण करून घ्यावे.

मशागत

जमिनीवरील तणांचे प्रमाण कमी करून जमीन मोकळी, भुसभुशीत, समांतर करून घ्यावी. जमिनीची उभी आडवी खोल नांगरणी करून रोटरच्या साह्याने ढेकळे फोडून घ्यावीत. शेवटच्या कुळवणीच्या वेळी हेक्‍टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळून घ्यावे.

लागवडीपूर्वीची काळजी

ज्या पिकांची लागवड बियांपासून केली जाते, त्या बियाण्यास लागवडीपूर्वी थायरम किंवा कॅप्टन किंवा कार्बेन्डाझीम ३ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात घेऊन प्रक्रिया करावी. टोमॅटो, मिरची, वांगी, इ. पिकांची लागवड रोपांच्या पुनर्लागवडीद्वारे केली जाते. त्यांची रोपे शिफारशीप्रमाणे कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून लावावीत. म्हणजे लागवडीनंतर जमिनीतील बुरशी किंवा किडीमुळे रोपावर प्रादुर्भाव होणार नाही. त्यासाठी, मॅन्कोझेब किंवा कार्बेन्डाझिम २.५ ग्रॅम अधिक इमिडाक्लोप्रीड १ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे तयार केलेल्या द्रावणात रोपांची मुळे बुडवून रोपांची पुनर्लागवड करावी. लागवडीनंतर हलकेसे पाणी द्यावे.

लागवडीनंतरची काळजी

भाजीपाला पिकांमध्ये सुरुवातीला रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. उदा. मावा, पांढरी माशी, फुलकिडे, तुडतुडे, कोळी इ. मिरची, टोमॅटो, वांगी, कोबी, फ्लॉवर या पिकांवर सुरुवातीलाच रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाला व वेळीच नियंत्रण झाले नाही तर पुढे त्यांच्यामुळे विषाणूजन्य, जिवाणूजन्य रोगांचा प्रसार होऊ शकतो. म्हणूनच रस शोषक किडींचे रोपवाटिकेपासून व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. पुढे बहुतेक भाजीपाला पिकांमध्ये पाने पोखरणारी अळी (नागअळी), शेंडा व फळ पोखरणारी अळी, रोपे / देठ कुरतडणारी अळी, फळमाशी इ. किडींचा प्रादुर्भाव होताना दिसतो. त्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा आराखडा आखून नियंत्रणाचे धोरण तयार करावे. एकात्मिक पद्धतीमध्ये केवळ एकाच पद्धतीवर भर देण्यापेक्षाही मशागतीय, यांत्रिक, भौतिक, जैविक आणि सर्वांत शेवटी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास गरजेनुसार रासायनिक कीडनाशकांचा वापर करण्याचे नियोजन असावे.

Vegetable Farming
Vegetable Farming : भाजीपाला लागवडीतून मिळविले आर्थिक स्थैर्य

खत व्यवस्थापन

व्यावसायिक भाजीपाला उत्पादनासाठी एकात्मिक सेंद्रिय, रासायनिक खतांचा वापर करणे योग्य ठरते. सेंद्रिय खतांमध्ये चांगल्या कुजलेल्या शेणखताचा जास्तीत जास्त वापर करणे हे जमिनीच्या सुपीकतेच्या दृष्टीनेही हिताचे असते. पिकांच्या शिफारशीनुसार नत्र, स्फुरद, पालाश युक्त खतांचे नियोजन करावे. शिफारशीपैकी निम्मे नत्र व संपूर्ण स्फुरद, पालाश लागवडीच्या अगोदर जमिनीत मिसळावे. उरलेले निम्मे नत्र लागवडीनंतर ४५ ते ५० दिवसांनी पिकास द्यावे. विविध विद्यापीठांनी शिफारशीत केलेली खताची मात्रा विद्राव्य खताद्वारे पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार व आवश्यकतेनुसार विविध हप्त्यांत विभागून द्यावी.

पाणी व्यवस्थापन

पाण्याचे व्यवस्थापन करताना साधारणतः जमिनीचा मगदूर, पिकांची वाढीची अवस्था यांचा विचार आवश्यक असतो. कमीत कमी पाण्यामध्ये पिकामध्ये वाफसा स्थिती ठेवण्यासाठी ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धती उपयोगी ठरते. त्याचा उन्हाळी हंगामातही पाणी बचतीसाठी फायदा होतो. या पद्धतीने विद्राव्य खतांचे व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करता येते. त्यामुळे व्यावसायिक भाजीपाला लागवडीमध्ये त्यांचा वापर करावा. विशेषतः फुलधारणा ते फळे काढणीच्या काळात एकसारखा पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. तसेच प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर केल्यास तण नियंत्रणासोबतच पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.

तक्ता : भाजीपाला पिकाचे विविध वाण

पिकाचे नाव वाणाचे नाव

कांदा कांदा नं-५३, अॅग्रीफाउंड डार्क रेड, अर्का निकेतन, अर्का पितांबर, अर्का बिंदू, अकोला सफेद, फुले समर्थ, भीमा सुपर, भीमा रेड, भीमा शक्ती इ.

भेंडी परभणी क्रांती, अर्का अनामिका, अर्का अभय, वर्षा उपहार, पुसा सावनी, फुले विमुक्ता, फुले उत्कर्ष, पीडीकेव्ही प्रगती इ.

बटाटा कुफरी चंद्रमुखी, कुफरी लवकर, कुफरी बादशाह, कुफरी सिंदुरी, कुफरी ज्योती,

कुफरी पुखराज इ.

टोमॅटो फुले राजा, धनश्री, भाग्यश्री, फुले केसरी, अर्का रक्षक, अर्का अभेद, अर्का विकास, अर्का सौरभ.

मिरची पीडीकेव्ही हिरकणी, फुले ज्योती, अर्का लोहित, अर्का मेघना, अर्का हरित, अर्का गगन, इ.

वांगी मांजरी गोटा, फुले हरित, कृष्णा (संकरित), फुले अर्जुन (संकरित)

लसूण लसूण जी-४१, अॅग्रीफाउंड पार्वती, यमुना सफेद, भीमा ओमकार, भीमा पर्पल, फुले नीलिमा, पीडीकेव्ही पूर्णा इ.

ढोबळी मिरची अर्का मोहिनी, अर्का गौरव, अर्का बसंत, अर्का अथुल्य इ.

ब्रोकोली गणेश ब्रोकोली, पालम समृद्धी इ.

डॉ. अरविंद सोनकांबळे, (विभाग प्रमुख), ९६५७७ २५८५७ (भाजीपाला शास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com