Chili Value Chain : ‘कृषक स्वराज्य’ने उभारली मिरचीची मूल्यसाखळी

Farmers Producer Company : दुर्गम चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील कृषक स्वराज या शेतकरी उत्पादक कंपनीने मिरची लागवड ते उत्पादन, प्रक्रिया, बाजारपेठ, सुविधा केंद्र अशी मूल्यसाखळी विकसित केली आहे.
Chili Value Chail
Chili Value ChailAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : पूर्व विदर्भातील चंद्रपूर हा दुर्गम जिल्हा आहे. जिल्ह्याच्या राजुरा परिसरात कापूस, सोयाबीन यांच्या जोडीला लाल, हिरवी मिरची घेणारे शेतकरीही आहेत. राजुरा भागातील अभियाता असलेले सतीश गिरसावळे यांनी शिक्षण झाल्यानंतर प्रसिद्ध समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या शोधग्राममध्ये एका प्रकल्पात काम सुरू केले. त्यातून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेता आल्या.

प्रत्यक्ष सामाजिक कामाचा अनुभव मिळाला. शिक्षण सुरू असताना कृषी क्षेत्रातच काम करायचे असे त्यांनी ठरवले होते. त्यामुळे प्रकल्पाच्या चार वर्षांनंतर सतीश यांनी स्वतःचे काहीतरी करण्याचे प्रयत्न सुरू केले. शेतकऱ्यांचे संघटित करून त्यांना हक्काची बाजारपेठ देण्याच्या दृष्टीने समविचारी मित्रांच्या मदतीने २०२२ मध्ये कृषक स्वराज्य शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना त्यांनी केली.

कंपनीचे ध्येय व त्यानुसार कार्य

शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवावे, शेतकऱ्यांचे स्वराज्य निर्माण व्हावे, शेतकरी समृद्ध व्हावा, सोबतच समतोल पर्यावरण आणि निरोगी ग्राहक हे कंपनीचे ध्येय ठेवले. कंपनीचे पाच संचालक असून, दहा जणांचे व्यवस्थापकीय संचालक मंडळ आहे.

यात सतीश यांच्यासह प्रमोद वडस्कर, भास्कर धोटे, अमोल भोंगळे, अंकित वडस्कर, अमेय धोटे, वैशाली काटवले, भाविक पिंपळशेंडे, देवानंद गिरसावळे, हर्षल भोंगळे, संयोग डी, शारदा मिलमिले, निखील डाहुले, ज्ञानेश्‍वर चोथले, अमित सातपुते, सागर बोढे आदींचा समावेश आहे.

राजुरी भागातील पाच- सहा गावांत मिळून पाच हजार हेक्‍टरवर लाल मिरची होते. त्यांच्याकडून थेट मिरची खरेदीचा निर्णय कंपनीने घेतला. त्यानुसार आजमितीला ९० गावांपर्यंत कंपनीचे जाळे विस्तारले आहे. त्यातील ४० गावांमध्ये सखोलपणे काम होते.

कंपनीचे ५१२ शेतकरी सभासद असले तरी चार हजारांपर्यंत शेतकरी कंपनीसोबत जुळले आहेत. ‘रेसिड्यू फ्री’ पद्धतीने मिरची पिकलून तिची निर्यात करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी अहमदाबाद येथील निर्यातदार कंपनीसोबत करार केला आहे. पुढील वर्षापासून निर्यातीचे प्रयत्न सुरू होतील.

Chili Value Chail
Agriculture Success Story : भाजीपाला, दुग्धोत्पादनात ओळख सावरगावतळची!

मिनी नर्सरी मॉडेल

कंपनीची स्वमालकीची नर्सरी आहे. याद्वारे वर्षाला १२ ते १६ लाख मिरचीची रोपे तयार होतात. आगाऊ नोंदणी केल्यास किंवा रोपांची मागणी अधिक असल्यास शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रोपे पुरविली जातात. शेतकऱ्यांनी स्वतः रोपे तयार करावीत यासाठी कंपनीने मिनी नर्सरी मॉडेल त्यांना देऊन या तंत्राचा प्रसार केला आहे.

शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी कृषी पदवीधर तीन ॲग्रॉनॉमिस्टची नेमणूक केली आहे.. ट्रे, कोकोपीट, ग्रीन नेट, गांडूळ खत, बियाणे यांचाही कंपनीकडून पुरवठा होतो. बाजारात १ रुपया ८० पैसे प्रति नग असा रोपाचा दर आहे. मात्र स्वतःच्या रोपवाटिकेत शेतकरी एक रुपया २० पैशांत रोपे तयार करू शकतात.

खरेदी व्यवस्था

सातरी (ता. राजुरा) येथे ‘कृषक स्वराज्य’चे संकलन केंद्र आहे. त्या ठिकाणी हिरव्या मिरचीची खरेदी होते. खरेदीपूर्वी शेतकऱ्यांच्या मोबाइलवर सकाळी दर पाठविले जातात. त्यांचा निर्णय झाल्यानंतर ते आमच्या गावातून मिरची घेऊन जावी असे कळवतात.सांगतात. त्यानुसार त्यांच्या बांधावरून मिरची घेतली जाते. या प्रक्रियेत वाहतूक, हमाली, अडत असा कोणता खर्च करावा लागत नाही. तोडणी करून गावात आणणे इतक्‍याच खर्चाचा भार शेतकऱ्यांवर राहतो.

लाल मिरचीची खरेदी

लाल मिरची खरेदीसाठी कंपनीतर्फे सहा जणांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येकाकडे चार ते पाच गावांची जबाबदारी दिली आहे. हे प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन लाल मिरचीचा दर्जा तपासून त्याआधारे दर सांगतात. व्यवहार नक्की झाल्यानंतर माल पोहोच करण्याचे ठिकाण त्यांना सांगितले जाते. शेतकरी बैलगाडीने गावाच्या वेशीपर्यंत माल आणतात. त्या ठिकाणावरून कंपनीकडून त्याची उचल होते.

Chili Value Chail
Agriculture Success Story : शेतीसारखे समाधान कुठेच अनुभवले नाही...

सहा कंपन्यांना पुरवठा

देशातील सहा कंपन्यांना ‘कृषक स्वराज्य’कडून मिरचीचा पुरवठा होतो. काही कंपन्यांकडून दंडी कट (देठ काढलेली मिरची) मिरचीची मागणी राहते. त्यानुसार सातरी येथे मजुरांच्या माध्यमातून दंडी कटचे काम होते. डिलक्‍स, बेस्ट, मीडियम बेस्ट, मीडियम आणि सर्वांत शेवटी फटकी (अर्धवट लाल, अर्धवट पांढरी मिरची) अशी मिरचीची प्रतवारी होऊन त्यावर दर निश्‍चित होतात.

हमी भावाने खरेदी

नागपूरच्या कळमना बाजारात फटकी मिरचीचे लिलाव होत नाहीत. माल ठेवून जा, संध्याकाळी दर कळवू, या शब्दांत शेतकऱ्यांची बोळवण केली जाते. संध्याकाळी मग तोकडा दर दिला जातो. ‘कृषक स्वराज’ने मात्र बाजार दरांच्या जोडीला शेतकऱ्यांना प्रति किलो दहा रुपये अतिरिक्‍त दर देण्यात सातत्य राखले आहे.

कळमना बाजारात मिरची उत्पादक शेतकऱ्यांकडून अनधिकृतपणे पाच टक्‍के कमिशनची आकारणी होते. हा बोजाही शेतकऱ्यांना येथे सहन करावा लागत नाही. शेतकऱ्यांना हिरव्या मिरचीसाठी किलोला २५ ते ३५ रुपये, तर लाल मिरचीसाठी १५० रुपये हमी भाव देण्यात येतो. बाजारभावापेक्षा कमी दरांत माल खरेदी केला जात नाही.

जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून गुंटूरची (आंध्र प्रदेश) ओळख आहे. येथील दरांच्या आधारे कृषक स्वराज्यकडून देखील दर जाहीर केले जातात. हिरवी मिरचीचे चुकारे मोजमाप झाल्यानंतर तत्काळ दिले जातात. परंतु लाल मिरचीचे मोजमाप झाल्यानंतर संबंधित गावातील प्रतिनिधीकडून ‘ऑनलाइन’ अहवाल प्राप्त होताच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग केले जातात.

आश्‍वासक उलाढाल

वर्षभरात हिरव्या मिरचीची दहा हजार क्‍विंटलपर्यंत, तर लाल मिरचीची साडेतीन हजार क्‍विंटलपर्यंत खरेदी होते. मागील दोन वर्षांत कंपनीने सव्वापाच ते सात कोटींपर्यंत उलाढालीची मजल गाठली आहे. यंदा १० कोटींपेक्षा अधिक उलाढालीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

सुविधा केंद्र

कंपनीने राजुरा येथे शेतकरी सुविधा केंद्र उभारले आहे. त्या अंतर्गत कृषी सेवा केंद्र, नर्सरी, २० मे. टन क्षमतेचे शीतगृह, सूक्ष्मजीवांवर आधारित जैविक कीडनाशक प्रयोगशाळा, ड्रोन फवारणी सुविधा, डिजिटल सेवा, प्रक्रिया, कृषी प्रशिक्षण आदी सेवा कंपनीने उपलब्ध करून दिल्या आहेत. नाबार्ड व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांचे क्षमता बांधणी, प्रशिक्षण व बाजार जोडणी यासाठी कंपनीला सहकार्य लाभले आहे.

महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या विचारसरणीचा आमच्यावर प्रभाव आहे. त्यातून ग्रामविकास, आरोग्य सुधारणा यांच्यावर भर देत शेतकऱ्यांचे स्वराज्य आणण्याची आमची संकल्पना आहे. त्यादृष्टीने कंपनीची वाटचाल सुरू आहे.
सतीश गिरसावळे ८६०५४४९०३३ संस्थापक, अध्यक्ष, ‘कृषक स्वराज्य’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com