Fruit Processing Industry : दोघा मित्रांनी मिळवले फळप्रक्रिया उद्योगात नाव

Fruit Business : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव येथील शैलेश वारंग आणि मुकेश केसरकर या दोन तरुणांनी आठ वर्षांच्या वाटचालीत यशस्वी फळप्रक्रिया उद्योजक म्हणून नाव मिळवले आहे. खडतर प्रयत्न, बाजारपेठांचा अभ्यास, ग्राहकांची मागणी, दर्जेदार गुणवत्ता व ग्राहक सेवा या बाबींवर लक्ष केंद्रित केले.
Fruit Processing Industry
Fruit Processing IndustryAgrowon

Success Story : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव (ता. कुडाळ) आहे. या गावात शैलेश वारंग व मुकेश केसरकर या दोघा सहकारी मित्रांचा फळप्रक्रिया उद्योग नावारूपाला आला आहे. शैलेश माणगावचेच आहेत. घरची आर्थिक स्थिती हालाखीची असल्याने सातवीपासून बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी गावातीलच डॉ. हेडगेवार संस्थेच्या वसतिगृहात राहून पूर्ण केले. बी.कॉम.ची पदवी घेतली.

संस्थेत फळप्रकिया उद्योग प्रकल्पात काम करण्याचा अनुभव मिळाला. साहजिकच या विषयाची आवड निर्माण होत गेली. झाली. मुकेश मूळ आजरा (जि, कोल्हापूर) येथील आहेत. ‘फूड टेक्नॉलॉजी’ विषयातून ‘एमएस्सी’ केल्यानंतर ते देखील याच संस्थेच्या प्रकल्पात रुजू झाले. दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली.

व्यवसायाचा श्रीगणेशा

एक दिवस शैलेश यांनी मुकेश यांच्याकडे व्यवसाय सुरू करण्याची इच्छा बोलून दाखवली.

मुकेश यांनीही आपल्या मनात हाच विचार सुरू असल्याचे सांगितले. चर्चेतून एकमत झाले.

फळप्रकियेतील अनुभव तर होता. पण व्यवसायासाठी आर्थिक गुंतवणुकीची गरज होती. घरची

आर्थिक स्थिती चांगली नसल्याने बँकेकडून कर्ज मिळणे कठीण होते. अखेर संस्थेत राहूनच

व्यवसाय करण्याचा निर्णय दोघांनी घेतला. कोकणात गणेशोत्सवात मोदकांना मोठी मागणी असते. अशावेळी दिवसा संस्थेत काम करायचे आणि संध्याकाळनंतर काजू मोदक निर्मिती, अशी कसरत

सुरू झाली. पहिल्याच वर्षी ५०० मोदक पाकिटांची निर्मिती व विक्री करण्यात यश आले.

Fruit Processing Industry
Fruit Processing Industry : शेतकऱ्यांनी फळप्रक्रिया उद्योग सुरू करावेत ः डॉ. गोखले

उद्योगाचा विस्तार

शैलेश यांचे मामा एकनाथ सावंत यांचे काजू प्रकिया युनिट होते. त्यांनी ते दोघांना वापरण्यासाठी दिले. त्याआधारे काजू बी प्रकिया सुरू केली. मेहनत व जीव ओतून काम करण्याची वृत्ती यातून उद्योगात चांगला जम बसविला. उलाढाल वाढू लागली. मग बाजारपेठांचा अभ्यास वाढवला. ग्राहकांची मागणी ओळखली. दर्जेदार गुणवत्ता व ग्राहक सेवा या दोन बाबींवर लक्ष केंद्रित केले. त्यातून सिंधुरत्न फूड प्रॉडक्ट कंपनीचा उदय झाला.

खंबीरपणे केली वाटचाल

शैलेश उत्पादन निर्मिती व अकाउंटिंग तर मुकेश उत्पादन निर्मितीसह त्यातील नावीन्यता, विपणन व बाजारपेठ या जबाबदाऱ्या सांभाळतात. जबाबदाऱ्या निश्‍चित केल्याने व्यवस्थापन सोपे झाले.

नवनवीन उत्पादने तयार करण्यावर त्यांचा भर असतो. त्यासाठी आवश्‍यक यंत्रसामग्री २०१६ ते २०२० या कालावधीतील

नफ्यातूनच खरेदी केली. यंदा नागरी सहकारी संस्थेचे दोन लाखांचे कर्ज घेतले आहे.

उद्योगात चांगला जम बसला असताना २०२० मध्ये कोरोनाचे संकट उभे राहिले. या काळात

तीन- चार लाख रुपये किमतीच्या उत्पादनांचे नुकसान झाले. परंतु कोरोना काळ संपल्यानंतर निराश न होता पुन्हा मोठ्या उमेदीने पुढील वाटचाल खंबीरपणे सुरू ठेवली.

Fruit Processing Industry
Fruit Processing Industry : गावागावांत फळप्रक्रिया उद्योग उभे राहावेत

...असा आहे आजचा उद्योग

-प्रकिया उद्योग तयार झाला आठ वर्षांचा अनुभव.

-सुमारे २५ ते ३० प्रकारची तयार होतात उत्पादने. यात कोकम, आवळा, आंबा, जांभूळ, आवळा, पायनापल आदींचे सरबत, मँगो पल्प, कैरी पन्हे, कोकम आगळ, आमसूल. काजूचे मोदक, चॉकलेट, कतली, आंबा व फणस पोळी, कॅण्डी, काजूगर, आंबा, लिंबू व मिक्स लोणचे आदींचा समावेश.

-ओरिजिना हे ब्रॅंडनेम तयार केले.

-लागणारा सर्व कच्चा माल परिसरातील शेतकऱ्यांकडूनच घेतला जातो.

-दरवर्षी गणेशोत्सव कालावधीत ६० हजार ते ७० हजार काजू मोदक पाकिटे उत्पादित केली जातात.

- तीन पुरुष व सात महिलांना कायमस्वरूपी रोजगार. गरजेनुसार बाहेरूनही मजुरांची मदत घेण्यात येते.

उलाढाल

वर्ष रुपये

२०२१- १८ लाख

२०२२ २३ लाख

२०२३ ६५ लाख

बाजारपेठ मिळविण्याचे प्रयत्न

सुरुवातीला उत्पादनांना बाजारपेठ मिळविण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. दोन वर्षे ना नफा ना तोटा अशा तत्त्वावरही व्यवसाय केला. पहिल्या टप्प्यात कोल्हापूर शहरासह विविध बाजारपेठांमध्ये उत्पादने पोहोचविली. आता कोकणासह गोवा, रेल्वे स्थानके, नाशिक, मुंबई, पुणे, शहापूर, सातारा, गोवा, म्हैसूर, बंगळूर आदी ठिकाणी उत्पादने जातात. दूरच्या ठिकाणी वितरक नेमले आहेत.

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराला काजू मोदक पुरविले जातात. यंदा अयोध्येत उभारलेल्या श्रीराम मंदिरासाठीही आंबा पल्प पाठवण्यात आला. विविध महोत्सवांतही सहभाग असतो. शिवाय

माणगावात ‘फॅक्टरी आउटलेट’ ही सुरू केले आहे. तयार झालेला अनुभव, कौशल्य व ज्ञान यांच्या बळावर शैलेश आणि मुकेश आता प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षणही देतात. बँक ऑफ इंडिया, वनविभाग, डॉ. हेडगेवार या संस्था त्यांना तज्ज्ञ म्हणून आमंत्रित करतात.

कुटुंबाची भक्कम साथ

आजपर्यंतच्या वाटचालीत दोघांचेही कुटुंब भक्कमपणे पाठीशी राहिले. त्यांना समर्थ साथ देत राहिले. सन २०१६ मध्ये प्रकल्पासाठी अडीच हजार चौरस फूट जागेसाठी शैलेश यांच्या भावाने अर्थसाह्य केले. ज्या वेळी विविध बाजारपेठांमध्ये माल पाठवायचा असतो त्या वेळी मनुष्यबळ जास्त लागते.

अशावेळी संपूर्ण कुटुंब मधरात्री उशिरापर्यंत राबत असते.

शैलेश अनंत वारंग, ८४५९२०३५९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com