
Nursery Business Story: वर्धा येथे रहिवासी असलेल्या वैभव चंद्रकांत उघडे यांची शेती उमरी (मेघे) शिवारात होती. अवघ्या चार कि.मी. अंतरावर असलेल्या या साडेपाच एकर शेतामध्ये वडिलांसोबत सतत येत असत. तेव्हा शेतीमध्ये कपाशी, सोयाबीन याच्या जोडीला अर्धा एकरावर भाजीपाला घेतला जाई. त्यातूनच त्यांच्या मनात शेतीचा आवड जोपासली गेली.
वैभव यांनी दहावी झाल्यानंतर २००५ मध्ये त्यांनी कृषी पदविका पूर्ण केली. त्यानंतर बी.एस्सी.ला (ॲग्री) प्रवेश घेत २००९ पर्यंत तीही पदवी प्राप्त केली. नोकरीऐवजी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सुरुवातीला शहामृग पालन, शेळी पालन, कुक्कुटपालन अशा व्यवसायासोबतच गुलाबशेती व्यावसायिकरीत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटी त्यांचा ताळेबंद जाणून घेतला. त्यातून रोपवाटिकेच्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला.
...अशी झाली सुरुवात
स्वतःच्या शेतामध्ये घेण्यायोग्य नगदी पिकांचाही शोध सुरूच होता. त्यातून २००७-०८ मध्ये कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणाऱ्या पपई पिकाकडे वळण्याचा निर्णय घेतला. पण त्यासाठी परिसरात पपई रोपांची उपलब्धताच नसल्याचे लक्षात आले. मग आपल्या कृषी पदवीचा काय उपयोग, असा विचार करत स्वतःच रोपे बनविण्याचा निर्णय घेतला. रोपनिर्मितीचा पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला. रस्त्यालगत असलेल्या शेतातील या भरगच्च पपई पिकाकडे लोकांचे लक्ष वेधले जाऊ लागले. त्यातून व्यवस्थापन विषयक माहितीसोबतच पपई रोपांची मागणी होऊ लागली. ही मागणीच आम्हाला खऱ्या अर्थाने रोपवाटिका व्यवसायाकडे घेऊन गेली, असे वैभव सांगतात. मातोश्री नर्सरीमध्ये हळूहळू अन्य रोपांचीही निर्मिती सुरू केली.
व्यवसायाचा विस्तार
ग्राहकांचा प्रतिसाद वाढत गेल्याच याच व्यवसायाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. विस्तारासाठी भांडवलाची गरज होती. थोडे धाडस करत बॅंकेकडून २५ लाख रुपये कर्जाऊ घेण्यात आले. सुरुवातीला कुटुंबाचा पाच एकरातच पपई, शेवग्यासह हंगामी वांगी, टोमॅटो, मिरची, कोबी इ. भाजीपाला पिकांची रोपे तयार केली जात. दर्जेदार व शुद्ध बियाण्यापासून रोपांची निर्मिती केली जात असल्याने मागणी वाढत होती. पण शहरी ग्राहकांकडून फुलझाडे व इतर शोभिवंत झाडांबद्दलही विचारणा होत होती.
ती रोपे तयार करायची तर जागा कमी पडत होती. रोपवाटिकेतून साठवलेल्या रकमेतून शेतालगतचे पाच एकर शेत खरेदी केले. त्यात विस्तार केला. पुन्हा थोडी थोडी करत आजवर त्यांनी बारा एकर शेती खरेदी केली आहे. परिणामी, रोपवाटिका व्यवसायातून जुळलेल्या पैशाचा वापर करीत कुटुंबाच्या पाच एकर जमिनीलगतची शेती खरेदी करण्यात आली. चार वर्षांपूर्वी टप्प्याटप्प्याने खरेदी केलेली जमीन आज बारा एकर झाली आहे. या संपूर्ण क्षेत्रात त्यांचा रोपवाटिका व्यवसाय विस्तारला आहे.
सिंचनाच्या सुविधा वाढविल्या
रोपवाटिका व्यवसायासाठी सिंचन अत्यंत महत्त्वाचे असते. सिंचनासाठी एक विहीर आणि दोन बोअरवेलवर ते अवलंबून होते. एक क्षेत्र धरणाच्या शेजारी आहे. रोपवाटिकेसाठी आजवर २० गुंठ्यांची ६ पॉलिहाऊस, २० गुंठ्याचे दोन आणि ४० गुंठ्यांचे एक शेडनेटही उभारले आहे. या पॉलिहाउसवर पडणारे पाणी पाइपद्वारे गोळा केले जाते. त्याचे पुनर्भरण विहीर व बोअरवेलमध्ये केले जाते. शक्य तिथे ठिबक व तुषार सिंचनाचा वापर केल्याने पाण्यामध्ये बचत होते. विद्राव्य खतेही देता येतात.
...अशी वाढविली बाजारपेठ
स्थानिक शेतकऱ्यांकडून रोपांना नियमित मागणी असतेच, पण एक ठोक मागणीसाठी २०१२ मध्ये सरकारी निविदा भरण्याचा निर्णय घेतला. सर्वांत कमी रकमेची निविदा भरल्यामुळे आत्मा योजनेसाठी रोप पुरवठ्याचे काम मिळाले. त्यावेळी ५५ पैसे प्रति नग प्रमाणे तब्बल ११ लाख रोपे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पोचवली. या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक भाजीपाला उत्पादकांपर्यंत आपल्या रोपवाटिकेचे नाव पोचल्याचे वैभव सांगतात. दर्जेदार, स्वस्त रोपांमुळे या बहुतांश शेतकऱ्यांकडूनच मागणी वाढत गेली.
भाजीपाल्यामध्ये वांगी, टोमॅटो, मिरची, फुलकोबी, पत्ताकोबी सोबतच झेंडू, केळी, पपई अशा रोपांना नियमित मागणी राहते. प्रकार आणि वाणांप्रमाणे त्यांची किंमत १ ते १५ रुपयांपर्यंत राहते. अशा प्रकारे हंगामात ५० लाखांपेक्षा अधिक रोपांची विक्री होते. संत्रा, मोसंबी, आंबा (केसर, दशेहरी, आम्रपाली, मल्लीका, लंगडा), सिताफळ, अंजीर, चिकू, पेरू अशा फळझाडांच्या दोन ते दहा फुटापर्यंतची तसेच तीन ते चार वर्षांच्या विकसित फळझाडांची उपलब्धता केली जाते. यातूनही मोठी उलाढाल होते.
शोभिवंत वनस्पतीच्या रोपांची निर्मिती
रोपवाटिकेत विविध प्रकारच्या शोभिवंत झाडांचे १७५ ते २०० पेक्षा अधिक प्रकार आहेत. त्यात ग्राफ्टेड ॲडेनिअम, जरबेरा, स्नेक, अरिका, रॉयल पाम, गुलाबांच्या विविध जातींचा समावेश आहे. एका भागात ऑर्किड रोपे तयार केली जातात. मातीमध्ये त्यांची मुळे सडतात, म्हणून त्या कोळसा आणि नारळांच्या शेंड्याचे खास बेड तयार केले आहे. या रोपांना बारमाही व आकर्षक फुले येत असल्याने मोठी मागणी असते.
घरगुती बगिच्याच्या किरकोळ बाजारामध्ये गुलाब, पाम व विविध शोभिवंत झाडांना १० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत दर मिळतात. नागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यातील किरकोळ रोपवाटिका व्यावसायिकांनाही ठोक दराने फुलझाडे पुरवली जातात. त्यामुळे फुल रोपांची वार्षिक मागणी लाखांवर राहते, असे वैभव सांगतात. रोपवाटिकेच्या व्यवसायाने सुमारे अडीच कोटी रुपयांच्या उलाढालीचा पल्ला गाठला आहे. त्यामध्ये फळ, फुल, शोभिवंत झाडे, भाजीपाला रोपे, कृषी केंद्र, मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. त्यांचा बियाणे, मजुरी, वीज यावरील एकूण वार्षिक खर्च आता २ कोटी १० लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
अनेकांना मिळाला रोजगार
आज एकूण १८ एकरांवर मातोश्री नर्सरीचा विस्तार पसरलेला आहे. सुमारे ५५ ते ६० मजुरांना काम उपलब्ध झाले आहे. त्यातही महिला मजुरांचे प्रमाण मोठे आहे. सर्वांना दर आठवड्याला वेतन दिले जाते. बारमाही कामामुळे मजूर या कामाला प्राधान्य देतात.
- वैभव उघडे, ९९६०७६६६१४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.