Milk Processing : गणित, ताळेबंद पक्का केल्यानेच ‘चिंतामणी’ ब्रॅण्डची वृद्धी

Milk Products : गोठ्यातील जनावरांची संख्या, गाभणकाळ, वर्षभराचे दूध संकलन, रोजचा जमा-खर्च, नफा-तोटा आदी सर्व आर्थिक गणित, ताळेबंद तपासून वळती (जि. पुणे) येथील कुंजीर कुटुंबाने दुग्धव्यवसायात वृद्धी आणि प्रगती केली आहे.
Milk Processing
Milk ProcessingAgrowon

Dairy Products : गोठ्यातील जनावरांची संख्या, गाभणकाळ, वर्षभराचे दूध संकलन, रोजचा जमा-खर्च, नफा-तोटा आदी सर्व आर्थिक गणित, ताळेबंद तपासून वळती (जि. पुणे) येथील कुंजीर कुटुंबाने दुग्धव्यवसायात वृद्धी आणि प्रगती केली आहे. सुमारे २०० जनावरे गोठ्यात असून कुल्फीसह विविध दुग्धोत्पादनांचा ‘चिंतामणी’ ब्रॅण्ड त्यांनी लोकप्रिय केला आहे.
सोलापूर रस्त्यापासून दक्षिणेकडे हवेली तालुक्याच्या हद्दीत वळती गाव आहे. येथील सोपान
कुंजीर यांचे नितीन, जितेंद्र, सचिन अशा तीन मुलांसहित त्यांचे एकत्रित कुटुंब आहे. सन २०१३ च्या सुमारास दहा कालवडींपासून कुटुंबाने दुग्धव्यवसाय सुरू केला. दुधाची विक्री पुण्यात व्हायची. सचोटी, परिश्रम, सातत्य, दुधाची शुद्धता व गुणवत्ता जपणे, प्रामाणिक सेवा यातून
ग्राहकांमध्ये विश्वास तयार झाला. दुधाला मागणी वाढू लागली. बारामती, बंगळूर आदी ठिकाणाहून टप्याटप्याने जनावरांच्या संख्येत वाढ केली. सध्या सुमारे १०० गायी, ५० म्हशी, ५० कालवडी अशी एकूण २०० पर्यंत जनावरे आहेत. मुक्तसंचार गोठ पध्दतीचा अवलंब केला आहे. त्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहून दूध देण्याची क्षमताही वाढली आहे.

व्यवसाय वृद्धी

सन २०१४ च्या दरम्यान ‘सकाळ-ॲग्रोवन’ व ‘एसआयआयएलसी’ येथे दुग्ध व्यवसाय व प्रक्रिया या विषयातील तीन ते चार प्रशिक्षणे जितेंद्र (सोपान यांचे मधले चिरंजीव) तसेच त्यांच्या बंधूंनी घेतली. त्या वेळी दुधापासून विविध उत्पादने तयार करण्याचे निश्‍चित झाले. प्रक्रियायुक्त प्रकल्प उभा करताना अनेक अडचणी आल्या. प्रमुख अडचण आर्थिक असल्याने संघर्ष करावा लागला. नजीकच्या बँकेकडून दहा लाखांचे कर्ज घेतले. उर्वरित रक्कम व्यवसायातील उत्पन्नातून उभी केली. टप्प्याटप्प्याने बॉयलर, शीतटाकी, जनरेटर, दूध संकलन वाहने, खवा यंत्र, क्रीम सेपरेटर, लॅक्टो स्कॅन, कुल्फी निर्मिती यंत्र आदी सुविधा वाढविल्या.

दूध संकलन व पदार्थ

जितेंद्र गोठा व्यवस्थापन, दूध व प्रक्रिया उत्पादनांची सर्व जबाबदारी सांभाळतात. उर्वरित बंधू
मार्केटिंग व अन्य कामकाज पाहतात. उरुळीकांचन येथे श्री चिंतामणी डेअरी असे आउटलेट सुरू केले आहे. तेथून दररोज पाचशे लिटर दुधाची विक्री होते. आवश्‍यक दूध शेतकऱ्यांकडून खरेदी करून
श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, पनीर, तूप, दही, लस्सी, खवा, कुल्फी असे पदार्थ तयार केले जातात. चिंतामणी या ब्रॅण्डने ते ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत. कुल्फी हा सर्वांत लोकप्रिय झालेला पदार्थ आहे. उन्हाळी हंगामात दररोज तब्बल ३० हजार, तर बिगरहंगामात १० हजारांपर्यंत त्याचे उत्पादन होते. त्याचे १०, २० व ३० रुपये, तसेच स्वादाच्या (फ्लेव्हर) स्वरूपात प्रकार केले आहेत. मुंबई, पुणे, वाघोली येथील होटेल्स, स्वीट होम व स्वतःचे आउटलेट यांच्या माध्यमातून होलसेल व रिटेलच्या माध्यमातून वर्षाला काही लाखांची उलाढाल एकट्या कुल्फीमधून करण्यात जितेंद्र यशस्वी झाले आहेत.

Milk Processing
Milk Processing : दूध प्रक्रिया उत्पादनांचा तयार झाला ब्रॅण्ड

दुग्ध व्यवसायाचे आर्थिक गणित

जितेंद्र सांगतात, की दुग्ध व्यवसायाचे वार्षिक गणित वा ताळेबंद आम्ही लक्षात घेतो.
शंभर जनावरांचा गोठा असे मॉडेल गृहीत धरले, तर त्यातील किती जनावरे किंवा गायी महिन्याला गाभण राहतील, म्हणजेच एकाच वेळी सगळी जनावरे दुधावर येता कामा नयेत, जेणे करून दुधाची वर्षभराची सरासरी कायम राहील याचे अचूक गणित आम्ही मांडतो. प्रति गाईची दूध देण्याची क्षमता काय,

ती वर्षभराच्या वेतात एकूण किती लिटर दूध देईल, वर्षभरात तिच्यावरील खर्च व त्यातून प्रति गाय किमान निव्वळ नफा किती मिळाला पाहिजे यावर आम्ही काम करतो. रोजचा खर्च, रोजचा नफा असा ताळेबंद रोज काढतो. जनावरे आणताना देखील टप्पे तयार करतो. पहिल्या बॅचनंतर दुसरी बॅच केव्हा आणायची याचेही शास्त्र असते. त्यावर काम करतो. म्हणूनच दररोज ८०० ते एक हजार ते बाराशे लिटर दुधाची सरासरी वर्षभर आम्ही ‘मेंटेंन’ केल्याचे जितेंद्र सांगतात.

Milk Processing
Milk Processing : प्रक्रियेपूर्वी दुधाची गुणवत्ता का तपासावी?

स्वबळावर उद्योग वृद्धिंगत

कुटुंबाची पूर्वीची कोणतीही संपत्ती, धन, जमीनजुमला आदी गोष्टी सोबतीला नव्हत्या. केवळ स्वबळावर व स्वमेहनतीतून आम्ही कुटुंबातील सर्वांनी मेहनतीने उद्योगाची उभारणी केली.
आज महिन्याला काही लाख रुपयांची उलाढाल आहे. बँक हाच आमचा मित्र आहे. वेळोवेळी कर्ज घेऊन काही लाख, एक कोटी अशी परतफेड करीत बॅंकेत पत निर्माण केली आहे, असे जितेंद्र अभिमानाने सांगतात. तीन एकरांची आज १० एकर शेती झाली आहे. कोरोना काळात स्वतःकडील दुधाबरोबर गावातील शेतकऱ्यांकडील दुधाची विक्रीही पुण्यातील डेअऱ्यांना केली. उद्योगात सुमारे ४० जणांना रोजगार मिळाला आहे. पैकी काही परप्रांतीयांची निवास व्यवस्था केली आहे. कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे त्यांची काळजी घेतली जाते. येत्या काळात दिवसाला दोन हजार लिटर दूध निर्मिती स्वतःच्या गोठ्यात व्हावी असे प्रयत्न सुरू असल्याचे जितेंद्र यांनी सांगितले.

सहकार्य

-उत्पादने निर्मितीसाठी नातेवाईक मारुती जगताप, ज्ञानेश्‍वर जगताप यांचे मार्गदर्शन.
-आई मंदा, वडील सोपान तसेच नितीन यांची पत्नी लक्ष्मी, जितेंद्र यांची पत्नी अक्षदा व सचिन यांची पत्नी सृष्टी आदींचे व्यवसायात मोठे योगदान.
-पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत उद्योग वाढीसाठी अनुदान.
-जिल्हा परिषदेकडून आदर्श गोपालक पुरस्कार.
-तालुका कृषी अधिकारी मारुती साळे, मंडळ कृषी अधिकारी गुलाबराव कडलग व अन्य कृषी अधिकाऱ्यांची मोलाची मदत.
...............................................................
जितेंद्र कुंजीर, ९५४५५६५६५६, ९५९५ ९२३ ९२३

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com