संदीप नवले
Animal Husbandry : कांबरे- खेबा (ता. भोर, जि. पुणे) संदीप रामचंद्र गिरे यांनी शेतीला पूरक उद्योगाची जोड दिली आहे. केवळ दूध उत्पादनावर न थांबता प्रक्रिया उद्योगातही वेगळी ओळख तयार केली आहे. ‘शिवांजली दुग्धालय’ हा बॅण्ड चांगल्या प्रकारे विकसित केला आहे.
नसरापूरपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेलं कांबरे-खेबा (ता. भोर, जि. पुणे) हे साधारण एक हजार लोकसंख्येचे गाव. या ठिकाणी रामचंद्र गिरे यांची पाच एकर शेती आहे. या शेतीमध्ये भात हेच मुख्य पीक. परंतु या पिकातून आर्थिक मिळत कमी असल्याने गिरे कुटुंबाला स्वतःची शेती सांभाळून दुसरीकडे मजुरीसाठी जावे लागत होते. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी वीस वर्षांपूर्वी गिरे कुटुंबीयांनी पशुपालनास सुरुवात केली. याबाबत संदीप गिरे म्हणाले, की आम्ही सुरुवातीला दोन संकरित गाई खरेदी केल्या. त्यानंतर दुधाचे रतीब सुरू झाले.
व्यवस्थापनाचा जम बसल्यानंतर टप्प्याटप्प्याने गोठ्यात १० गाई आठ म्हशींचे संगोपन सुरू झाले. त्यामुळे दूध उत्पादनही वाढले. कात्रज डेअरी तसेच काही ग्राहकांना आम्ही दूध देण्यास सुरुवात केली. दुधाची गुणवत्ता जपल्यामुळे ग्राहकांकडून मागणी वाढू लागली. त्यामुळे २०१० पासून गोठा कमी करून गावातील तसेच आजूबाजूच्या गावांतील शेतकऱ्यांकडून दूध संकलन करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात ५०० लिटरचे संकलन करून दुसऱ्या ठिकाणच्या युनिटमधून प्रक्रिया करून त्याची पुण्यात विक्री सुरू केली. दुधाची प्रत चांगली असल्याने दुधाला चांगली मागणी वाढली.
मिनी डेअरीची उभारणी :
संदीप गिरे यांनी २०१९ मध्ये मिनी डेअरी प्रकिया युनिटची उभारणी केली. त्या वेळी भांडवलाची चांगलीच अडचण आली होती. तरीही त्यातून मार्ग काढत हे युनिट उभे केले. यासाठी त्यांनी साडे दहा लाख रुपयांचे कर्ज घेतले. उर्वरित रक्कम मिळणाऱ्या नफ्यातून उभी करून आज सुमारे चाळीस लाख रुपयांचा दूध प्रक्रिया प्रकल्प उभा केला आहे.
दूध प्रक्रिया उद्योगासाठी बॉयलर, पाश्चरायझेशन युनिट, होमोजिनायझर, शीत टाकी, कोल्ड स्टोअरेज, जनरेटर, दूध संकलनासाठी दोन गाड्या, पॅकिंग यंत्र, दूध साठवण टाकी, खवा निर्मिती यंत्र, क्रीम सेपरेटर, फॅट तपासणी यंत्राची खरेदी केली आहे.
पाच गावांतून दूध संकलन :
दुधाची दिवसेंदिवस मागणी वाढू लागली. त्यामुळे संदीप यांनी परिसरातील गावांमध्ये दूध संकलन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. सध्या पाच गावामधील दूध संकलन केंद्रात सुमारे २००० लिटर दुधाचे संकलन होते.
यामध्ये गाईचे ७०० लिटर, म्हशीचे १३०० लिटर दुधाचे संकलन होते. सर्व दूध प्रक्रिया केंद्रावर आणून प्रक्रिया करून पिशवी पॅकिंग केले जाते.
प्रक्रिया उत्पादनांना सुरवात ः
दुधाची व्यवस्थितरीत्या हाताळणी होण्यासाठी संदीप गिरे यांनी पॅकिंगवर भर दिला आहे. दुधावर प्रक्रिया केल्यानंतर २५० मिलि, २०० मिलि, अर्धा लिटर, १ लिटर पिशवी पॅकिंग करून कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवले जाते. दूध संकलन केंद्रावर म्हशीची प्रति लिटर ५५ ते ६० रुपये आणि गाईच्या दुधाची प्रति लिटर ३५ ते ४० रुपये दराने खरेदी होते. दूध विक्रीच्या बरोबरीने त्यांनी दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीवर भर दिला.
व्यवस्थित पॅकेजिंग आणि लेबलिंग करून उत्पादने अधिक आकर्षक बनवली. दूध पुरवठ्यातील सातत्य, उत्तम दर्जा, गुणवत्ता आणि नैसर्गिक चव या बळावर ‘शिवांजली दुग्धालय’ हा ब्रॅण्ड तयार केला. दुधापासून श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, पनीर, दूध, तूप, दही, लस्सी, ताक, खवा असे विविध पदार्थ ग्राहकांच्या चवीस पसंत पडत आहेत. सध्या डेअरीच्या माध्यमातून गिरे यांनी पंधरा जणांना रोजगार दिला आहे.
दूध, प्रक्रिया पदार्थांची विक्री ः
सध्या पुणे शहरातील कात्रज, भारती विद्यापीठ, दत्तनगर, आंबेगाव, नऱ्हेगाव, धायरी अशा विविध ठिकाणी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री केली जाते. म्हशीच्या दुधाची प्रति लिटर ६५ रुपये आणि गाईच्या दुधाची प्रति लिटर ५४ रुपये दराने विक्री होते. दर महिन्याला श्रीखंड २०० किलो, आम्रखंड २०० किलो, बासुंदी ५०० किलो, तूप २०० किलो, लस्सी ६०० लिटर, दही १८०० किलो, ताक ९०० लिटर, खवा १५० किलो या प्रमाणात विक्री होते.
या सर्व पदार्थांची प्रति किलो ५० रुपयांपासून ६०० रुपयांपर्यंत दराने विक्री केली जाते. दर महिन्याला खर्च वजा जाता दोन लाखांची उलाढाल होते. या प्रक्रिया उद्योगामध्ये संदीप यांना वडील रामचंद्र, आई सौ. भारती, पत्नी सौ. रेखा आणि चुलत बंधू दीपक यांची चांगली साथ मिळाली आहे.
---------------
संपर्क ः संदीप गिरे, ९९२१८००२२५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.