

Agriculture Success Story : भाडगाव (ता. जि. लातूर) येथील श्रीकर ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी मागील सहा वर्षांपासून खरीप व रब्बी पिकांच्या बीजोत्पादनात कार्यरत आहे. सातत्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण उत्पादनातून कंपनीने शेतकऱ्यांमध्ये विश्वासपात्र ओळख तयार केली आहे. या कंपनीचे मुख्य शिलेदार आहेत या गावचे प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब भागुराम दाताळ.
ते कंपनीचे संस्थापक संचालक आहेत. बीजोत्पादन कार्यात त्यांची पंचवीस वर्षांहून अधिक काळ तपस्या घडली आहे. आई- वडील, पत्नी, मुलगा अक्षय व दोन भाऊ असा त्यांचा मोठा परिवार आहे. वडील व एक भाऊ राजकुमार डॉक्टर असून भाऊ अनंत व्यावसायिक आहेत.
बीजोत्पादनाची लागली गोडी
दाताळ यांनी १९९१ मध्ये पुणे कृषी महाविद्यालयातून पदवी घेतली. स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याचे त्यांचे नियोजन होते. मात्र वडिलांनी त्यांच्याकडे घरच्या ४५ एकर शेतीची जबाबदारी दिली. लातूर येथे कृषी सेवा केंद्रही उभारले. पुढे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेतले.
एक कंटेनरची निर्यातही केली. परंतु त्या वेळी झालेल्या इराण- इराक युद्धात निर्यातीत अडथळे आले. दरम्यान, कृषी सेवा केंद्र बंद करून दाताळ पूर्णवेळ शेतीत व त्यातही बीजोत्पादनात रमले. चार पत्रे व कुडाचे घर बांधून शेतातच मुक्काम ठोकला. खरिपात दहा एकरांत ज्वारी तर पंचवीस एकरांत रब्बीत सूर्यफूल बीजोत्पादन कार्यक्रम यशस्वी केला.
सोयाबीनचे बीजोत्पादन
सिंचनाच्या सुविधा असल्याने दाताळ यांचे दहा एकरांत गुऱ्हाळासाठी ऊस उत्पादन सुरू होते. तर सरकारी बियाणे कंपनीसाठी सोयाबीनचे बीजोत्पादनही सुरू होते. दरम्यान, शेतकऱ्यांचे संघटन करीत दाताळ यांनी आधुनिक शेतकरी गटाची स्थापना केली. त्या माध्यमातून बीजोत्पादन व लातूरच्या एका कारखान्याकडून बीज प्रक्रिया करून बियाणे विक्री असा उपक्रम सुरू होता.
पुढे बीज प्रक्रियेसाठी संबंधित कारखान्याने नकार दिला. अशावेळी स्वतःचे प्रक्रिया केंद्र उभारणीशिवाय पर्याय नव्हता.जिल्ह्यात त्या वेळी तीन शेतकरी गट आघाडीवर होते. त्यांच्या प्रमुखांना एकत्र करून बीज प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचाही दाताळ यांनी प्रयत्न केला. तो मो कष्टाने यशस्वी झाला. त्या वेळी एका शेतकरी कंपनीची स्थापना झाली. त्यात दाताळ यांचा समावेश राहिला.
श्रीकर शेतकरी कंपनीची स्थापना
अशा प्रकारे अनेक वर्षांच्या तपश्चर्येतून जून २०२८ मध्य्पे दाताळ यांनी श्रीकर ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केली. पोकरा प्रकल्पाची त्यास मदत झाली. कंपनीचे पाच संचालक तर ३५७ सभासद आहेत. तेव्हापासून सोयाबीन, हरभरा, करडई, गहू आदींचे बीजोत्पादन घेतले जात आहे. सभासदांपैकी सुमारे १५० पर्यंत शेतकरी या कार्यक्रमात सहभागी होत असतात.
सोयाबीनचे एकरी ८ ते १२ क्विंटल, तर हरभऱ्याचे ७ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन कंपनीचे सभासद घेतात सन २०२२ मध्ये कंपनीने पंधराशे एकरांत, सन २०२३ मध्ये पाचशे एकरांत सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम राबवला. यंदा ३०० एकरांवर त्याचे नियोजन आहे.
तर रब्बी पिकांचा एकूण मिळून २५, ५० ते त्याहून अधिक एकरांत हा कार्यक्रम राबवला जात आहे. बाजारापेक्षा शंभर रुपये प्रति क्विंटल जादा भाव देऊन बीजोत्पादनातील सोयाबीन शेतकऱ्यांकडून घेण्यात येते. ‘पोकरा’मुळे शेतकरी कंपन्यांचे जाळे वाढले. कंपन्यांकडून बीज प्रक्रिया केंद्राची संख्या वाढली. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला.
यशस्वी उलाढाल
आज महमदापूर येथे ‘श्रीकर’ कंपनीचे पाचशे टन क्षमतेचे बीज प्रक्रिया व गोदाम असून, २१५० टन क्षमतेच्या गोदामाची उभारणी सुरू आहे. कृषी विद्यापीठांकडून पैदासकार बियाणे घेण्यात येते. ते सभासद शेतकऱ्यांना देऊन प्रमाणित बियाणे तयार केले जाते. सर्व तांत्रिक प्रक्रिया पार पडून सत्यप्रत बियाण्याची विक्री केली जाते.
बियाण्याचा उत्तम दर्जा व शेतकऱ्यांसोबत व्यवहारातील पारदर्शकपणा यामुळे कंपनीची वृद्धी चांगल्या प्रकारे होत आहे. प्रक्रिया केलेल्या व ‘पास’ झालेल्या बियाण्याला बाजारपेठेपेक्षा अधिक दर जास्त मिळतो. मागील तीन वर्षांत कंपनीने दर वर्षाला तीन कोटी रुपये उलाढालीचा टप्पा गाठला आहे.
सभासदांच्या हिताचे रक्षण
प्रख्यात दिवंगत उद्योजक रतन टाटा यांनी गुंतवणूकदारांचे शंभर टक्के संरक्षण करण्याचा सल्ला दिला होता. त्या शिकवणीनुसार दाताळ यांनी आपल्या सभासद शेतकऱ्यांचा विश्वास व हिताचे संरक्षण केले आहे. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या विचारांचा प्रभावही दाताळ यांच्यावर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःच्या शेतीमालाचा भाव स्वतः ठरवला पाहिजे हे त्यांचे विचार आपल्या कंपनीत अंमलात आणण्याचा दाताळ यांचा प्रयत्न असतो.
शासनाचा एक टक्क्क्याचा नियम असला तरी आम्ही दोन टक्के जास्त बियाणे बॅगेत भरतो असे ते सांगतात. मुलगा अक्षयचे कंपनीच्या प्रत्येक बाबीत तांत्रिक सहकार्य लाभते आहे. आपल्या बीजोत्पादन करियरच्या एका टप्प्यात शेतीकामांत व्यस्त असताना आवड म्हणून दाताळ यांनी उदगीर येथे ‘एलएलएम’चे शिक्षण घेऊन लातूर येथे काही काळ ‘प्रॅक्टिस’ केली. अपघात दावे मोठ्या संख्येने मिळाले. त्यातून निकालही दाताळ यांच्या बाजूने लागले. त्यातून बियाणे प्रक्रिया केंद्र व गोदाम उभारणीसाठी अनुदानाशिवाय लागणारा पैसा उपलब्ध झाला. पहिल्या वर्षी चार हजार दोनशे क्विंटल सोयाबीनवर प्रक्रिया देखील केली.
बाळासाहेब दाताळ ९४२३३४६७०५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.