Natural Farming : पंधरा वर्षांपासून जोपासलाय नैसर्गिक शेतीचा आदर्श

Indian Agriculture : सोलापूर जिल्ह्यात चळे येथील वासुदेव भास्कर गायकवाड पंधरा वर्षांपासून नैसर्गिक पद्धतीने व विना नांगरणी पद्धतीने शेती करीत आहेत. त्यातून आपली जमीन त्यांनी भुसभुशीत, सुपीक, निरोगी व कमी खर्चिक बनविली आहे. दहा एकरांत केशर आंब्याचे दर्जेदार उत्पादन ते घेत आहेत.
Bhaskar Gaikwad and his Natural Farming
Bhaskar Gaikwad and his Natural FarmingAgrowon
Published on
Updated on

Success Story of Natural Mango Farming : सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरपासून १० किलोमीटरवरील चळे गावात वासुदेव भास्कर गायकवाड यांची ३० एकर शेती आहे. भीमा नदीच्या काठावर गाव असल्याने पाण्याची टंचाई म्हणून त्यांना कधीच भेडसावली नाही. गायकवाड बी.ई. सिव्हिल आहेत. राज्य द्राक्ष संघाचे सोलापूर विभागाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पेलली आहे. पूर्वी २० एकरांत द्राक्षे व १० एकरांत डाळिंब ही पिके त्यांच्याकडे होती.

पाच वर्षे त्यांनी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनही घेतले. सुमारे १० वर्षे बेदाणा निर्मितीही केली. शेती नदीकाठी असल्याने पाणी व क्षारांमुळे जमिनीची प्रत खराब झाली होती. शिवाय द्राक्षासारखे पीक असल्याने रसायनांच्या वापराशिवाय पर्यायच नव्हता. शेतीतील खर्च वाढला होता. जमिनीचे व शेती- पर्यावरणाचे आरोग्य धोक्यात आले होते.

Bhaskar Gaikwad and his Natural Farming
Success Story : शेतकऱ्यांच्या लेकरांचे हक्काचे घर- ‘स्नेहवन’

नैसर्गिक शेतीची धरली वाट

खर्चिक व समस्या जास्त असलेल्या रासायनिक शेतीला गायकवाड यांनी पर्याय शोधण्यास सुरवात केली. तीस एकरांत नैसर्गिक शेती व विना नांगरणीचे प्रयोग सुरू केले. त्यात अनेकदा अपयश आले. अनेकांनी प्रयोगांवरून त्यांना वेडे म्हणून हिणवले. पण ते डगमगले नाहीत. वाटचाल सुरुच ठेवली. आज पंधरा वर्षे झाली.

या कालावधीत रासायनिक खते, कीडनाशके एवढेच काय पण बाहेरून देखील एकही सेंद्रिय जैविक निविष्ठा न वापरता गायकवाड शंभर टक्के नैसर्गिक शेती करीत आहेत. यात पंधरा एकरांत बाळानगर सीताफळ आहे. तर दहा एकरांत केसर आंबा आहे.

गायकवाड यांच्या शेतीची वैशिष्ट्ये

दहा एकर आंब्यापैकी आठ एकरांत १६ बाय पाच फूट अंतरावर सघन पद्धतीने लागवड.

यात एकरी सुमारे पाचशे झाडे. दोन एकरांत चार वर्षापूर्वी अति सघन पद्धतीने आंबा लागवड.

एकरी एकहजार झाडे आहेत. येत्या काळात काजूचा प्रयोग करणार आहेत.

जागतिक नैसर्गिक शेतीचे प्रणेते मासानोबु फुकुओका यांच्या तत्त्वज्ञानानुसार Do Nothing पद्धतीची शेती. (निना नांगरणी, विना खुरपणी, विना फवारणी आणि विना रसायन)

शेतात बाहेरून कोणत्याही प्रकारच्या जैविक वा सेंद्रिय निविष्ठांचा वापर नाही.

शेतात उगवणारी प्रत्येक वनस्पती ही परमेश्वराने पाठवलेली भेट आहे असे समजून त्या वनस्पतीला मुक्तपणे वाढू दिले जाते. पिकांचे अवशेष, पालापाचोळा यांचा सेंद्रिय खत वा आच्छादन म्हणून वापर.

आंब्याला फेब्रुवारी ते जून (पहिला पाऊस पडेपर्यंत) असे पाच महिने ‘ड्रीप’द्वारे दररोज दोन तास पाणी. त्यानंतर ते कमी केले जाते. सीताफळ जवळपास पावसाच्या पाण्यावरच. स्वयंपूर्ण, स्वयंविकासी शेती पद्धतीला त्यातून चालना देण्याचा प्रयत्न.

Bhaskar Gaikwad and his Natural Farming
Mango Success Story : पुरळ गावाचा हापूस आंब्यात लौकिक

क्षारयुक्त पाणी पिकाला देणे म्हणजे हळूहळू जमिनीचे वाळवंटीकरण करणे होय असे फुकुओका म्हणतात. पावसाचे पडणारे पाणी शुध्द वा ‘डिस्टील वॉटर’प्रमाणे असल्याने तेच शेतीला देणे महत्त्वाचे आहे या फुकुओका यांच्या तत्त्वाचा अंगीकार केला आहे.

गायकवाड सांगतात की आंबा बागेत आम्हाला खोडकीड जास्त त्रास देते. या किडीचे नियंत्रण करणारे निसर्गात अनेक मित्रकीटक आहेत. पण एके दिवशी या किड्याची मांजराने शिकार केलेली पाहिल्याचे गायकवाड सांगतात. निसर्गातील जीवच कीड नियंत्रणात उपयोगी येतात असे त्यांचे म्हणणे आहे.

-शेतीतील उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. आंब्यात एकरी पाच हजार ते दहाहजारांपर्यंतच खर्च होतो. यंदा वातावरणामुळे आंब्याचे उत्पादन कमी आले तरी एकरी पन्नासहजार रुपयांचा नफा मिळाला. माझ्यासाठी ती नक्कीच समाधानाची बाब असल्याचे गायकवाड सांगतात.

माती भुसभुशीत झाली असून जमिनीची जलधारणशक्ती वाढली आहे. अलीकडेच २४ तासात मोठा पाऊस होऊनही पाणी जमिनीत साचून न राहाता मातीत खोल जिरले.

गायकवाड यांचे प्रयोग पाहण्यासाठी शेतकरी सातत्याने भेटी देतात. त्यांचे महायान भास्कर कृषी संस्कृती या नावाने यू ट्यूब चॅनेल व फेसबुक पेज देखील आहे. व्हॉट्सअप ॲप ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी शेकडो शेतकरी जोडले आहेत.

आंब्याचे उत्पादन

आंब्याचा स्वाद, रंग, आकार सर्वोत्कृष्ट असल्याने ग्राहकांकडून मोठी व आगाऊ मागणी असते. साधारण सात किलोची पेटी एकहजार रुपये दराने हातोहात खपते. मागील तीन वर्षांत संपूर्ण क्षेत्रातून २०२१ मध्ये १३ टन, २०२२ मध्ये १७ टन तर २०२३ मध्ये सहा टन उत्पादन मिळाले. यंदा किमान पाच टन उत्पादनाची शक्यता आहे.

पल्पद्वारे मूल्यवर्धन

दरवर्षी गायकवाड पृथ्वी नॅचरल्स या ब्रॅंडने आंब्याची थेट विक्री करतातच. पण प्रियदर्शिनी नॅचरल्स या ब्रॅंडने त्यांनी आंबा पल्पची (फ्रोजनसह) निर्मितीही केली आहे. स्थानिक पंढरपूरसह मुंबई, पुणे, बंगळूर, दिल्ली आदी ठिकाणी त्याची विक्री मागील तीन वर्षांपासून वर्षाला तीन टन या प्रमाणात होत आहे.

फुकुओकांमुळे मिळाली दिशा

वास्तविक एकेकाळचे प्रगतशील द्राक्ष बागायतदार ते आज नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते हा प्रवास गायकवाड यांच्यासाठी साधा-सोपा नव्हता. पण त्यासाठी त्यांनी कष्ट घेतले. जिद्द ठेवली.फुकुओका यांच्या सर्व पुस्तकांचा अभ्यास केला. यात एका काडातून क्रांती, रोड बॅक टू नेचर, नॅचरल वे ऑफ फार्मिंग, सोईंग सीडी इन डेझर्ट आदींचा समावेश आहे. फुकुओका यांच्या विचारांनी गायकवाड यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणला. पत्नी सुलभा व बीई पदवीधर असलेली पृथ्वीजीत आणि प्रियदर्शिनी ही मुले यांची त्यांना मोठी साथ लाभली आहे.

जपानकडून दखल व सन्मान

फुकुओका यांच्या शेती पद्धतीचा जागतिक शेतीत काय फरक पडले हे पाहण्यासाठी जपानने वार्तापट (डॉक्युमेंटरी) बनवण्याचे ठरवले. ते काम तेथील एका ‘टेलिव्हिजन चॅनल’ कडे सोपवण्यात आले. त्या अनुषंगाने त्याच्या संचालकांनी गायकवाड यांच्यासोबत दुभाषीचा वापर करून तासभर ऑनलाइन चर्चा केली. केंद्र शासन तसेच ‘आत्मा’ तर्फेही त्यांचा पुरस्काराने सन्मान झाला आहे. राज्य सरकारतर्फे यंदा त्यांना कृषिभूषण पुरस्कारही घोषित झाला आहे.

वासुदेव गायकवाड ९०११०७७५७५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com