Mango Success Story : पुरळ गावाचा हापूस आंब्यात लौकिक

Mango Farming : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरळ (ता. देवगड) गावाचा मधूर चवीच्या अस्सल देवगड हापूस आंबा उत्पादनात लौकिक तयार झाला आहे. येथील बागायतदारांनी संघटित होत पुणे येथे स्टॉल यंत्रणा उभारून थेट ग्राहक विक्री व्यवस्था निर्माण केली आहे. त्यातून मध्यस्थांची साखळी मोडीत काढून गावाच्या अर्थकारणास बळकटी दिली आहे.
Mango
MangoAgrowon

एकनाथ पवार

Strengthening the Economy of the Village due to Mangoes : साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून अक्षय तृतीयेच्या दिनाला महत्त्व आहे. कोकणातील ज्या बागायतदारांचा आंबा या मुहूर्ताच्या नजीक परिपक्व होतो ते या आंब्याचे पूजन करून विक्रीस सुरुवात करतात. अलीकडे आंबा हंगाम लवकर सुरू होत असल्यामुळे ती संधी बागायतदारांना कमी प्रमाणात उपलब्ध होते.

परंतु राज्यातील विविध भागांत अक्षय तृतीयेला पोळी व आंब्याच्या रसाचा नैवेद्य दाखविण्याची पद्धत आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेला आंब्याची मागणी वाढते. साहजिकच दरही चांगला मिळत असल्याने बागायतदार हा मुहूर्तावर विक्रीचे नियोजन करीत असतात.

आंबा उत्पादनातील पुरळ

कोकणातील देवगड हापूसचा लौकिक जगभर आहे. त्यामुळे देवगड तालुक्याचे जवळपास सर्व
अर्थकारण या पिकावर अवलंबून आहे. तालुक्यात तळेरे-विजयदुर्ग मार्गापासून दोन- तीन किलोमीटरवर पुरळ गाव आहे. पुरळ, हुर्शी आणि कळंबई अशा तीन महसूल गावांचा यामध्ये समावेश होतो. पश्‍चिमेला तीन किलोमीटर अथांग समुद्रकिनारा आहे. हुर्शीत ऐतिहासिक रिद्धी-सिद्धी यांच्यासह गणपती मंदिर आहे.

भात, नाचणी ही खरिपाची मुख्य पिके आहेत. गावात शेकडो वर्षांपासून हापूस आंबा लागवड होते. आता बहुतांश बागायतदार कलमांपासून लागवड करतात. समुद्राचे खारे वारे, खडकाळ जमीन हे पोषक वातावरण लाभल्याने येथील आंब्याची चवही वैशिष्ट्यपूर्ण असते. त्यामुळेच तीस- चाळीस वर्षात गावात आंब्याची लागवड कित्येक पटीने वाढली.

Mango
Agriculture Success Story : पारंपरिक काजू, सुपारीला दिली काकडीची जोड

थेट विक्रीची सुरू झाली पद्धत

पूर्वी व्यापारी गावात येऊन बागेची किंमत ठरवून संबंधित बागायतदारास सौद्याची रक्कम द्यायचे. किंवा आंबा काढणीनंतर वाशी मार्केटमध्ये मध्यस्थांकरवी विक्री करायचे. या व्यवहारात
बागायतदारांचा उत्पादन खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नसे. कोरोना काळात प्रचलित
विक्री पद्धती बंद पडल्या.

सुरुवातीचे काही दिवस कवडीमोल दराने देखील आंबा विकावा लागला. परंतु बागायतदारांनी मग थेट विक्रीवर भर देण्यास सुरुवात केली. त्यातून चांगला नफा होऊ लागला. त्यामुळे पारंपरिक विक्री व्यवस्था जवळपास थांबलीच.

बागायतदार झाले संघटित

ग्राहकांना अस्सल देवगड हापूस चाखता यावा या हेतूने पुरळ येथील ५० ते ६० बागायतदार एकवटले. सामूहिक थेट विक्री व्यवस्था कशी उभी करता येईल यावर विचाररमंथन सुरू झाले. राज्य पणन मंडळाचा पुणे येथील महोत्सव हे त्यासाठी चांगले व्यासपीठ असल्याचे त्यातून पुढे आले. मग या आंबा उत्पादकांनी श्री सिद्धिविनायक आंबा उत्पादक सेवा सहकारी संस्थेची स्थापना केली. आता याच संस्थेच्या माध्यमातून पुणे येथे एकाच छताखाली आंबा विक्रीचे सुमारे ३० स्टॉल उभे करण्यात येतात.

सर्व स्टॉल पुरळ येथील बागायतदारांचे आहेत. याशिवाय पुणे शहरातच अन्य ठिकाणी २२ स्टॉल उभारून तेथेही थेट विक्रीच केली जाते. अशा रीतीने ५२ स्टॉल्स उभारून या बागायतदारांनी मध्यस्थांची साखळी मोडीत काढली आहे. उत्पादन ते विक्रीपर्यंतची उत्कृष्ट व्यवस्थापन साखळी त्यांनी तयार केली आहे. आंबा काढणी, त्याचे चांगल्या पद्धतीने पॅकिंग व पुण्यापर्यंत त्याची वाहतूक अशी यंत्रणा त्यांनी उभारली आहे. प्रत्येक स्टॉलवर प्रत्येक बागायतदाराचा सदस्य उपस्थित असतो.

Mango
Kesar Mango Farming : केसर आंबा उत्पादनातून अर्थकारण केले भक्‍कम

...अशी आहे पुरळ गावातील आंबा शेती


-येथील आंबा चवीला अत्यंत मधुर असल्याने नावलौकिक मिळाल आहे.
-सुमारे २५० हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली.
-तीनशेहून अधिक शेतकरी करतात लागवड.
- ५६ बागायतदारांनी घेतले आहे देवगड हापूस आंबा जीआय मानांकन प्रमाणपत्र.
- आंबा हंगाम फेब्रुवारीअखेर, मार्च ते पाच जूनपर्यंत चालतो.
- दोन, पाच डझन पेटी पॅकिंग आणि आता एक डझन बॉक्सही उपलब्ध.
-सरासरी पाच डझन पेटीला अडीच हजार रुपयांपर्यंत मिळतो दर.
-गावपरिसराची या पिकातून होते २५ ते ३० कोटींपेक्षा अधिक उलाढाल.
-पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, निपाणी, बंगळूर, गुजरात तसेच देशभरातील विविध बाजारपेठांमध्ये येथील आंब्याला मोठी मागणी.
-शिमगोत्सवात होणाऱ्या कापडखेळ्यामुळे गाव चर्चेत असते.
-तंटामुक्ती अभियान, पर्यावरण संतुलित समृद्ध पुरस्कार, निर्मल ग्राम आदी पुरस्कारांनी गाव सन्मानित.

माझी पुरळ- कळबंई येथे ३०० कलमे आहेत. त्यातून दीड हजार पेटी उत्पादन मिळतेपुणे येथे थेट विक्रीतून अडीच महिन्यात चांगली उलाढाल होते.
तेजस मुळम, ८३९००५३८९२
सिद्धिविनायक संस्थेच्या माध्यमातून आम्ही पुणे शहरात उत्पादक ते ग्राहक थेट विक्रीची संकल्पना राबवीत आहोत. त्यास ग्राहकांचा उदंड प्रतिसाद आहे. त्यातून आमचा नफा होतोच शिवाय ग्राहकाला अस्सल देवगड हापूस चाखायला मिळतो.
नीलेश पुजारे, बागायतदार व संस्थाचालक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com