Sugarcane Farming : एकरी १०० टन उत्पादनाचा ओलांडला आकडा

Sugarcane Production : हिंगणगाव बुद्रुक (जि. सांगली) येथील विठ्ठल खराडे यांनी मार्गदर्शन, अभ्यास आणि प्रगतीची आस यातून ऊस शेतीत प्रगती करून एकरी १०० टन उत्पादनाचा आकडा ओलांडला आहे. एकरी १२७ टनांपर्यंत झेप घेतली आहे.
Sugarcane Farming
Sugarcane FarmingAgrowon
Published on
Updated on

Sugarcane Farming Success Story : सांगली जिल्ह्यातील कडेगावची दुष्काळी तालुका अशी ओळख होती. खरीप आणि रब्बी हंगामावर येथील शेतकऱ्यांची भिस्त होती. अशा प्रतिकूल परिस्थितीतही तालुक्यात द्राक्षे पिकवली जायची. त्यातून जशी आर्थिक स्थैर्यता येऊ लागली तसे तालुक्यात द्राक्षाचे क्षेत्र वाढले. त्यामुळे तालुक्याची द्राक्ष उत्पादन घेणारा तालुका अशी ओळख निर्माण झाली.

अर्थात, दुष्काळाचे संकट जसजसे गडद होऊ लागले तसतसे द्राक्ष क्षेत्र कमी झाले. दरम्यान तालुक्याच्या शिवारात टेंभू योजनेच्या माध्यमातून कृष्णा नदी अवतरली. द्राक्षाच्या ठिकाणी ऊस आला आणि शेतीची परिस्थिती बदलण्यास प्रारंभ झाला.

खराडे यांची ऊसशेती

सांगली- पुसेसावळी मार्गावर कडेपूरपासून दहा किलोमीटवर हिंगणगाव बुद्रुक गाव वसले आहे. येथील विठ्ठल सर्जेराव खराडे यांची वडिलोपार्जित साडेतीन एकर शेती आहे. पाणीटंचाईमुळे १४ वर्षे ती कोरडवाहूच होती. शेतीला शेळीपालनाची जोड दिल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची सर्व भिस्त त्यावरच होती. आजही दावणीला दहा शेळ्या आहेत.

सन २०१० मध्ये टेंभू योजनेमुळेत्यांची शेती बागायती झाली. आज स्वतःच्या शेतीसह सन २०११ पासून नऊ एकर शेती ते कराराने करतात. आडसाली ऊस आणि आले ही त्यांची मुख्य पिके आहेत. पैकी तीन एकर लागवडीचा ऊस,तेवढाच खोडवा व दीड एकरांत निडवा ऊस असतो. को ८६०३२ हे वाण असते.

Sugarcane Farming
Sugarcane Farming : आडसाली उसासाठी ठिबकद्वारे अन्नद्रव्यांचा वापर

खराडे यांना गावातील संजय दिनकर कदम यांच्याकडून सुधारित उसशेतीची प्रेरणा मिळाली. त्यांची शेती म्हणजे शेताचा कडा कोपरा स्वच्छ, बांध-बंदिस्ती उत्तम आणि पिकाचे व्यवस्थापन एकदम नेटके. आपणही अशीच शेती करायची असा निश्‍चय खराडे यांनी केला. तसा अभ्यासही सुरू केला. दरम्यानच्या काळात वांगी येथील सोनहिरा साखर कारखान्याचे प्रभारी ऊस विकास अधिकारी हेमंत सूर्यवंशी, प्रक्षेत्र सहायक शशिकांत चव्हाण यांच्याकडून मार्गदर्शन घेतले.

सन २०१६ मध्ये याच कारखान्यातर्फे मांजरी (पुणे) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) येथे प्रशिक्षणाची संधी मिळाली. या सर्व ज्ञानाचा वापर सुरू केला. एकेक गोष्ट शिकत १४ वर्षांच्या अनुभवातून खराडे यांनी ऊस उत्पादनात कौशल्य प्राप्त केले आहे. अलीकडील वर्षांपासून एकरी शंभर टन ते त्याहून अधिक उत्पादन मिळत असून त्यात सातत्य ठेवण्यात त्यांना यश मिळाले आहे.

ऊस व्यवस्थापनातील ठळक बाबी

दर्जेदार आणि खात्रीशीर, निकोप बेण्याची निवड केली जाते. त्यासाठी दहा महिने वयाच्या उसाचा वापर केला जातो. एक किंवा दोन डोळा पध्दतीचा लागवडीसाठी वापर होतो.

साडेचार फुटी सरीचा वापर होतो. दोन डोळ्यांमध्ये एक फुटाचे अंतर ठेवले जाते.

लागवडीपूर्वी ताग लावून दीड महिन्यांनी तो जमिनीत गाडला जातो.

लागवड, खोडवा व निडवा घेऊन झाल्यानंतर पुढील वर्ष ऊस न घेता त्या जमिनीला विश्रांती देण्यात येते.

फेरपालट म्हणून आले, हरभरा, शाळू ही पिके घेतली जातात. त्यांचा बेवड उसाला उपयुक्त ठरतो.

Sugarcane Farming
Sugarcane Farming : खोडवा ऊस पिकालाही देतो लागवडी इतकेच महत्त्व

नांगरट करण्यापूर्वी एकाड एक वर्ष एकरी आठ ट्रॉली शेणखताचा वापर होतो.

त्याचबरोबर मोठ्या भरणीच्या वेळी कोंबडीखताचा एकरी ४० ते ६० गोणी असा वापर होतो.

जानेवारीत पाला सरीत काढून ठेवला जातो. त्यामुळे बाष्पीभवन न होता ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

साखर कारखान्याच्या पीक स्पर्धेत खराडे सहभागी होतो. त्यामुळे प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी होतात. त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. ज्ञानात भर पडते. ही स्पर्धा शेतकऱ्यांसोबत नसून स्वतःबरोबर असल्याची भावना ठेवल्याने मोठी ऊर्जा मिळते.

गाळपाला जाणाऱ्या उसाची संख्या ४३ हजार ते ४५ हजारांपर्यंत ठेवली जाते.

उत्पादन

अलीकडील वर्षांत खराडे यांनी लागवडीच्या उसाचे एकरी शंभर टन उत्पादन सातत्य ठेवले आहेच. पण खोडवा उसाचे ६० ते ७० टनांच्या दरम्यान उत्पादन घेतात. एकरी ८० हजार रुपयांपर्यंत उत्पादन खर्च येतो. कारखान्याकडून प्रति टन ३१०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

एकरी उत्पादन दृष्टिक्षेपात

गाळप हंगाम उत्पादन (सुमारे) प्रति टन

२०२२-२३ १०२

२०२३-२४ १०९

उसातूनच प्रगती झाली शक्य

सन २०२० मध्ये एकरी १२७ टन उत्पादन घेतल्याबद्दल कारखान्याकडून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. वडील सर्जेराव, आई शारदा, पत्नी जयश्री व दिग्विजय, विश्‍वजा ही मुले असा त्यांचा परिवार आहे, शेतीतील उत्पन्नातूनच घर बांधले. दोन बहिणींची लग्ने करता आली. सांगली भागात शेतजमिनीचे दर गगनाला भिडले आहेत. तरीही शेतीत आर्थिक ताकद तयार केल्याने पंधरा गुंठे जमीन घेता आली. या सर्व गोष्टींचे खराडे यांना समाधान आहे.

विठ्ठल खराडे ९८६०५४५८५८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com