Vegetable Farming : भाजीपाला, फळपीक पद्धती ठरली यशाचे गमक

Fruit Crop Farming : आजवर एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात त्यांनी सातत्य राखले आहे. भाजीपाला आणि फळपीक पद्धतीसह शेतीतील प्रयोगशीलता हेच त्यांच्या यशाचे गमक ठरले आहे.
Papaya Cultivation
Fruit Crop Farming Agrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : नांदेडपासून पंचवीस किलोमीटर अंतरावरील बारड येथील माधव लोमटे मागील २८ वर्षांपासून शेती करत आहेत. पूर्वी केळी, ऊस या पिकांची लागवड होती. मात्र या पिकांपासून उत्पन्न हाती येण्यास विलंब होण्यामुळे आर्थिक नियोजनाचा ताळमे_ळ बसत नव्हता. त्यासाठी पीक पद्धतीत बदलण्याचे माधव यांनी ठरविले. तीन हे सहा महिन्यांत उत्पादन मिळणाऱ्या हंगामी व बिगर हंगामी फळपिके, भाजीपाला लागवडीवर भर दिला.

या लागवडीमधून वेळेत खात्रीशीर उत्पन्न हाती येऊ लागले. हळूहळू बारड परिसरातील अनेक शेतकरी त्यांच्या शेतीस भेट देऊ लागले. आजवर सुमारे एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांना त्यांनी टरबूज, खरबूज, टोमॅटो, मिरची, पपई, केळी या पिकांच्या लागवडीसाठी मार्गदर्शन केले आहे.

पीक पद्धतीत बदल

माधव लोमटे आणि केशव लोमटे यांच्या एकत्रित कुटुंबाची एकूण १४ एकर शेती आहे. माधव यांनी १९९५-९६ च्या दरम्यान शेतीला सुरुवात केली. त्यावेळी केळी, ऊस या बारमाही पिकांची लागवड होती. मात्र ही पिके वर्षाहून अधिक कालावधीची असल्याने आर्थिक ताळमेळ बसत नव्हता. त्यामुळे पीक पद्धतीत बदलून हंगामी पिके घेण्याचे ठरविले. उन्हाळी व पावसाळी भाजीपाला, फळपिके अशी पीकपद्धती घेऊन शेती समृद्ध केल्याचे माधव लोमटे सांगतात.

दहा वर्षांपासून खरबूज, टरबूज, टोमॅटो, मिरची, पपईची लागवड करत आहेत. वर्षातून दोन वेळा उन्हाळी व हिवाळी हंगामात खरबूज, टोमॅटो, मिरची पिकाची लागवड होते. खरबूज व टोमॅटो लागवड ऑक्टोबर, नोव्हेंबर व यानंतर फेब्रुवारी-मार्च या कालवधीत केली जाते. ऑक्टोबर-नोव्हेंबर व मार्चमध्ये लागवड पपई केली जाते. बाजारात पपई आणि टोमॅटोला चांगले दर मिळत असून ही लागवड फायद्याची असून शाश्‍वत उत्पादन मिळते, असे माधव सांगतात.

दोन एकरांवर खरबूज लागवड

दरवर्षी ऑक्टोबर ते जानेवारी आणि जानेवारी ते फेब्रुवारी अशा दोन टप्प्यांत खरबूज लागवड केली जाते. सात फुटांचे बेड करून त्यावर झिगझॅग पद्धतीने दीड फूट अंतरावर मल्चिंगवर रोपांची लागवड केली जाते. खरबुजाची रोपे कोकोपीटचा वापर करून ट्रेमध्ये घरीच तयार केली जातात.

लागवडीपूर्वी बेडमध्ये शेणखत, डीएपी, पोटॅश, अमोनिअम सल्फेट व सूक्ष्म अन्नद्रव्ये तसेच जिप्सम या प्रमाणे बेसल डोस दिला जातो. लागवडीनंतर २ दिवसांनी ह्युमिक ॲसिड, रासायनिक कीटकनाशक मिसळून पहिली आळवणी, तर १२:६१:०१ आणि १३:००:४५ यांची दुसरी आळवणी केली जाते.

Papaya Cultivation
Agriculture Success Story : एकीच्या बळावर पाटील बंधूंची नेत्रदीपक भरारी ; ५ एकरांपासून ८० एकरांपर्यंतचा प्रवास

लागवडीनंतर चार ते पाच दिवसांनी १९:१९:१९, सूक्ष्म अन्नद्रव्ये, त्यानंतर कॅल्शिअम नायट्रेट, १२:६१:०० असा डोस एक दिवसाआड दिला जातो. त्यानंतर ००:६०:२०, मॅग्नेशिअम व सूक्ष्म अन्नद्रव्ये असा डोस ठिबकद्वारे दिला जातो. क्रॉप कव्हर काढल्यानंतर दर दोन दिवसांनी कीटकनाशक, बुरशीनाशक, सूक्ष्म अन्नद्रव्ये, ०:५२:३४ यांच्या दर दोन दिवसांनी फवारण्या, फळ फुगवणीसाठी १३:४०:१३, मॅग्नेशिअम, ०:५२:३४, ०:४२:४७ यांचा ड्रीपद्वारे वापर. फळातील गोडवा व वजन वाढीसाठी काढणीपर्यंत १३:०:४५, पोटॅशिअम शोनाईट, सल्फर यांचा वापर केला जातो.

Papaya Cultivation
Agriculture Success Story : बारमाही उत्पन्न देणाऱ्या शेतीत मिळविली हातोटी

फळधारणेसाठी मधमाश्या महत्त्वाच्या

टोमॅटो, मिरचीमध्ये स्वपरागीकरण होते. परंतु टरबूज व खरबुजाचे परागीकरण होण्यासाठी मधमाशी टिकून ठेवावी लागते. मधमाशीशिवाय या पिकांमध्ये फळधारणा होत नाही. यामुळे मधमाश्यांना घातक ठरेल अशा रासायनिक घटकांची फवारणी केली जात नाही, असे लोमटे सांगतात. खरबुजामध्ये फळधारणा होण्यासाठी शेंडे खुडणी केली जाते. पहिली खुडणी ५० दिवसांनी, तर दुसरी खुडणी ६५ दिवसांनी केली जाते. शेंडे खुडणीमुळे फांद्या फुटून चांगली फळधारणा होते.

सरासरी १५ ते वीस टन उत्पादन

हिवाळ्यामध्ये खरबुजापासून १२ ते १५ टन, तर उन्हाळ्यात १८ ते २० टनांपर्यंत उत्पादन मिळते. सध्या नांदेड बाजारात खरबुजाला सरासरी २० हजार रुपये प्रति टन दर मिळत आहे.

दोन हंगामांत टोमॅटो लागवड

दरवर्षी फेब्रुवारी-मार्च आणि ऑक्टोबर- नोव्हेंबर या दोन हंगामांत टोमॅटो लागवड होते. पावसाळ्यात मल्चिंगवर पाच फुटांचे बेड करून त्यावर दोन्ही बाजूंनी झिगझॅग पद्धतीने सव्वा फुटांवर रोपांची लागवड केली जाते. हिवाळ्यात पाच फुटांवर झिगझॅग पद्धतीने दोन फुटांवर लागवड करतात. लागवडीनंतर एका महिन्याने बांबू बांधणी करून दीड महिन्याने सुतळी बांधणी केली जाते.

टोमॅटो पिकावर बुरशीजन्य रोगांसह पांढरी माशी, लाल कोळी आणि फुलकिडींचा प्रादुर्भाव होतो. दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला जातो. फूल संख्या वाढविण्यासाठी १३:४०:१३, ०:५२:३४, कॅल्शिअम नायट्रेट, बोरॉन, झिंक यांची फवारणी केली जाते. फळ वाढीसाठी ०:४२:४७, पोटॅशिअम शोनाइट ड्रीपद्वारे दिले जाते. टोमॅटो काढणीवेळी नरम पडू नये म्हणून चिलेटेड कॅल्शिअम, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करतो, असे श्री. लोमटे सांगतात.

उत्पादनाची शाश्‍वती

टोमॅटो लागवडीतून पावसाळ्यात तीन हजार क्रेट, तर उन्हाळ्यात दोन हजार क्रेट उत्पादन मिळते. पावसाळ्यात सरासरी पाचशे रुपये, तर उन्हाळ्यात सरासरी पाचशे ते सातशे रुपये प्रति क्रेट इतका दर मिळतो. योग्य नियोजनातून उत्पादनाची शाश्‍वती टोमॅटो लागवडीतून मिळत असल्याचे माधव लोमटे सांगतात.

युवा शेतकऱ्यांना मार्गदर्शन

हंगामी भाजीपाला पिकांच्या लागवडीत चांगला जम बसविल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या प्लॉटला भेटी देण्यास सुरुवात केली. अनेक युवा शेतकऱ्यांनी श्री. लोमटे यांचा आदर्श घेऊन पीक पद्धतीत बदल केला. दिवसेंदिवस शेतकऱ्यांसोबत संपर्क वाढत गेला. आमच्या शेताला प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन करा, असा आग्रह शेतकऱ्यांकडून श्री. लोमटे यांना होऊ लागला. मागील १० वर्षांपासून दररोज सकाळी साडेचार पाच वाजता उठून शेती कामांचे नियोजन करून पुढे शेतकऱ्यांच्या शेतीस भेट देण्यासाठी ते जातात. सध्या नांदेड, परभणी, हिंगोलीसह विदर्भातील एक हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन करत असल्याचे, असे माधव लोमटे सांगतात.

शेतीची वैशिष्ट्ये

दहा वर्षांपासून खरबूज, टरबूज लागवडीत सातत्य.

टोमॅटो, मिरची व पपईची दरवर्षी लागवड.

केळी लागवडीतून खात्रीशीर उत्पादन.

वेलवर्गीय पिकांमध्ये सिंचनावर भर.

रासायनिक खते, जैविक, भूसुधारकांचा वापर.

भाजीपाला, फळपिकांच्या लागवडीचा हंगामनिहाय अभ्यास.

भाजीपाला, फळपिकांमध्ये प्रतिबंधात्मक पीक संरक्षणावर भर.

जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न.

संपूर्ण शेतीमध्ये सूक्ष्मसिंचनाची सोय.

क्रॉप कव्हरचा वापर

खरबूज वेलींना लागवडीच्या चार ते पाच दिवसांनंतर क्रॉप कव्हरने झाकले जाते. या काळात फवारण्या थांबविल्या तर चांगली फळधारणा होते. साधारणपणे वीस दिवसांनी वेलीवरील क्रॉप कव्हर काढले जाते. हे क्रॉप कव्हर तीन वर्षे काम करते, असे ते सांगतात.

शेती उत्पन्नातून मुलांचे शिक्षण

माधव लोमटे यांना एक मुलगा व एक मुलगी, तर केशव लोमटे यांना दोन मुले आहेत. या चारही मुलांचे शिक्षण शेतीमधून आलेल्या उत्पन्नातून केले आहे. माधव यांचा मुलगा स्वराज याने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेऊन ट्युरिजम व हॉस्पिटॅलिटी ही पदव्युत्तर पदवी घेतली आहे. स्वराज सध्या इंग्लंडमध्ये नोकरी करत आहे. तर मुलगी सृष्टी फिजिओथेरपीचे शिक्षण घेत आहे. केशव लोमटे यांचा मुलगा सचिन बीबीएचे शिक्षण घेत आहे. तर दुसरा मुलगा युवराज हा शेतीकामांमध्ये मदत करतो.

- माधव लोमटे ९९२३१६१२४८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com