
Dairy Success Story : अहिल्यानगर जिल्ह्यातील निंबळक, इसळक, खारकर्जुने (ता. अहिल्यानगर) हा जिरायती, दुष्काळी परिसर आहे. शाश्वत पाणी नसल्याने गाव तलाव, पाझर तलाव आणि पावसाच्या पाण्यावरच शेती अवलंबून असते. खरिपात बाजरी, मूग, उडीद तर रब्बीत ज्वारी, हरभरा, कांदा अशी पिके शेतकरी घेतात.
काहींनी दुग्धव्यवसायाची जोड दिली आहे. त्यापैकीच निंबळक येथील शिवाजीराव गेरंगे यांचे कुटुंब. त्यांना तीन मुले. पैकी सतीश थोरले असून माजी सैनिक आहेत. ते नगरला असतात. मधले संदीप पोलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. शेती व दुग्ध व्यवसायाची मुख्य जबाबदारी ते पाहतात. सर्वात धाकटे बंधू शरद संदीप यांच्यासोबत शेतीत राबतात.
विस्तारलेला दुग्धव्यवसाय
भाकड म्हशी खरेदी करून त्या वेत्या होतेवेळी विक्री करण्याचा जोड व्यवसाय पूर्वी कुटुंबाने केला. मात्र २००४ मध्ये संदीप यांनी ज्यावेळी शेतीची सूत्रे सांभाळली त्यावेळी त्यांनी दोन संकरित गायी (एचएफ) खरेदी करून दुग्धव्यवसाय सुरु केला. कुटुंबातील सर्वांची मेहनत कामी येऊ लागली.
सन २००९ मध्ये तीन लाख रुपये खर्च करून गोठा बांधला. गाईंच्या खरेदीसाठी अधिक भांडवल गुंतवणूक न करता गोठ्यातच जनावरांची पैदास करण्यावर भर दिला. सुमारे वीस वर्षांच्या काळात आज २४ गाई आणि सहा कालवडीपर्यंत व्यवसायाचा विस्तार झाला आहे. सुमारे ८० टक्के गाई घरच्याच आहेत. दररोज २०० ते २२५ लिटर दुधाचे संकलन होते.
खर्चात केली बचत
दुग्ध व्यवसायात खर्च अधिक, त्या तुलनेत दुधाला दर व नफा कमी अशी परिस्थिती असते. मात्र अनेक बाबींवरील खर्चात बचत करण्याचा प्रयत्न संदीप यांनी केला आहे. यात घरच्या साडेपाच ते सहा एकरांत चारा लागवड केली आहे. पैकी दीड एकरांत ऊस, प्रत्येकी दोन एकरांत लसूण घास व गिन्नी गवत आहे.
गरजेनुसार काही चारा विकत घ्यावा लागतो. एका मिलमधून मोठ्या प्रमाणात खाद्य घेण्यात येते. संदीप यांची पत्नी अनिता, शरद यांची पत्नी सुनीता याही व्यवसायात राबतात. दूध काढणसाठी, गवत कापणसाठी तसेच कुट्टीसाठीही यंत्र घेतले आहे. त्यातून मजुरांवरील खर्चाबरोबर त्यांच्यावरील अवलंबित्वही कमी केले आहे.
दुधाचे तयार केले मार्केट
अहिल्यानगर शहर जवळ आहे. त्यामुळे संकलित दुधापैकी ५० टक्के दुधाचे थेट ग्राहकांना रतीब घालण्यात येतो. दुधाची गुणवत्ता एकसारखी ठेवल्यानेच पंधरा वर्षांपासून ग्राहक टिकवणे शक्य झाले आहे. उर्वरित दुधाचा शहरातील मोठ्या दुकानाला पुरवठा होतो. फॅट व एसएनएफ चांगले असल्याने दुधाला दरही चांगला मिळतो. मध्यस्थांविना थेट विक्री असल्याने नफ्याचे मार्जिन वाढते.
चाऱ्याची उपलब्धता घरची असल्याने एकूण उत्पन्नाच्या सुमारे ४० ते ५० टक्क्यांपर्यंत नफा होतो. मात्र चारा बाहेरून घ्यावा लागला तर नफ्याचे प्रमाण कमी होते. संदीप सांगतात की दुग्धव्यवसाय टिकवणे अलीकडील काळात आव्हानाचे झाले आहे.
औद्योगीक क्षेत्रात काम मिळाल्याने मजुरांचेही स्थलांतर झाले आहे. आमच्या भागात अनेकांना दुग्धव्यवसाय बंद करावा लागला. मात्र कुटुंबाच्या एकीतून, चारा शाश्वती, काही प्रमाणात यांत्रिकीकरण व दुधाचे स्वतः तयार केलेले मार्केट यातून आम्ही या व्यवसायात चांगल्या प्रकारे टिकून राहिलो आहे.
साधलेली प्रगती
दुग्धव्यवसायातूनच गेरंगे कुटुंबाने आर्थिक समृद्धी व शाश्वती मिळवली आहे. वडिलोपार्जित आठ एकरांत भर घालून आज ११ एकरांपर्यंत विस्तार केला. अन्य ठिकाणची माती आणून माळरानावरील शेती टप्प्याटप्प्याने विकसित केली. जवळपास पाणी उपलब्ध नसल्याने दोन किलोमीटरवरील गावच्या पाझर तलावाजवळ दोन गुंठे जागा घेऊन विहीर खोदली. शेतात टुमदार बंगला बांधला.
पूर्वी संदीप यांच्याकडे मोपेड होती. आज मालवाहू वाहन, जीप, चारचाकी आहे. अहिल्यानगर येथे टुमदार बंगला बांधला आहे. तेथे संदीप यांच्या मोठ्या भावासह कुटुंबातील नव्या पिढीला शिक्षणासाठी राहण्याची सोय झाली आहे. वडील शिवाजीराव पूर्वी एका कंपनीत नोकरी करायचे. मात्र ती बंद पडल्यानंतर शेती व दुग्धव्यवसायालाच त्यांनी वाहून घेतले.
आज ते वयोमानानुसार काहीसे थकले असले तरी कुटुंबातील अन्य सदस्यांनी हा व्यवसाय पुढे नेला. संदीप यांच्या आई शारदाबाई तसेच सतीश यांच्या पत्नी ज्योती यांचीही कुटुंबाला मोठी साथ आहे. दर आठवड्याला ट्रॉलीभर शेणखत उपलब्ध होते. त्याचा वापर शेतीत होते. त्यामुळे रासायनिक खतांवरील खर्च कमी झाला आहे. हे कुटुंब खरीप व रब्बीत कांदा घेते. रब्बीत एकरी १५ टनांपर्यंत उत्पादकता त्यांनी गाठली आहे. एकेकाळी केवळ खडकाळ माळरान असलेले क्षेत्र गेरंगे परिवाराने अत्यंत प्रतिकूल संघर्षातून समृद्ध, शाश्वत केले आहे.
संदीप गेरंगे ९६६५९८५७१०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.