Success Story of Farmer : सोलापूर-बार्शी महामार्गावर वैरागच्या पुढे असलेल्या काळेगावात दीपक घायतिडक यांची तीन एकर शेती आहे. त्यांचे वडीलही शेतकरीच. सन २००० मध्ये दहावी झाल्यानंतर दीपक यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शेतीतच लक्ष घातले. अवर्षणप्रवण भाग असल्याने शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नव्हते. अखेर उर्वरित शिक्षण पूर्ण करण्याचे ठरवले.
छोट्या व्यवसायांचे अनुभव घेत २००५ मध्ये बीएची पदवी मिळवली. पुढे विवाह झाला. पत्नी विद्या यांनीही मोलाची साथ दिली. आज ११ वीस असलेला मुलगा संस्कार व सहावीला असलेली मुलगी संस्कृती यांच्यासहित घायतिडक दांपत्याचे कुटुंब शेतीत समाधानाने नांदते आहे. दीपक यांना सोलापूर येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे व सहकाऱ्यांचे मार्गदर्शनही मिळाले आहे.
सुरुवातीचे प्रयत्न
दीपक पहिल्यापासूनच प्रयत्नवादी स्वभावाचे आहेत. मध्यंतरीच्या काळात उदरनिर्वाहासाठी संघर्ष सुरू असताना वैराग येथे प्रिंटिंग आणि रेडियम आर्ट विषयातील व्यवसायही केला. त्यानंतर ‘फॅब्रिकेशन’ व्यवसायाकडे वाट वळवली. यात वेल्डिंगच्या कामांसह दरवाजे, खिडक्या आणि ट्रॅक्टरचलित अवजारे, ट्रॉलीची निर्मिती केली. अनुभवाचे धडे, चार पैसे मिळत होते. अशावेळी शेतीकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली. सन २०१३ मध्ये भोगावती नदीवरून तीन किलोमीटरवरून पाइपलाइन केली. त्याच वर्षी ऊस घेतला. दुर्दैवाने ज्या खासगी कारखान्याला ऊस पुरवला तो बंद पडला आणि ऊसबिल अडकले.
संकटाने दिली संधी
संकटे, संघर्षातून सुटका होत नव्हती. पण दीपक हार मानायला तयार नव्हते. पण या प्रतिकूल अवस्थेनेच संधी दाखवली. सन २०१४ मध्ये जुना ट्रॅक्टर व मळणी यंत्र घेत भाडेतत्त्वावर हा व्यवसाय सुरू केला. त्यातून परिसरात चांगली ओळख निर्माण केली. मळणीचे काम म्हणजे दीपक असे समीकरण या भागात झाले. या व्यवसायाने चांगली स्थिरता दिली. हा व्यवसाय सुमारे सहा वर्षे म्हणजे २०२० पर्यंत केला.
नव्या व्यवसायाची ओळखली संधी
अलीकडे ऊस पाचट न जाळता त्याचा सेंद्रिय खत म्हणून शेतकऱ्यांकडून वापर वाढला आहे.व्यवसायानिमित्त फिरताना पाचटाला असलेली मोठी मागणी दीपक यांनी ओळखली. या पाचटाच्या गाठी (बंडल्स) बांधण्याच्या यंत्राची माहितीही मिळाली. पाचटाची बंडल्स तयार करून ती शेतकऱ्यांना पुरवण्याचा व्यवसाय करण्याची संकल्पना त्यांच्या डोक्यात आली. पण या यंत्राची किंमत सतरा लाखांपर्यंत होती. अखेरीस काही किमती वस्तू गहाण टाकून व पैशाची जुळवाजुळव करून नऊ लाखांना जुने यंत्र खरेदी केले आणि व्यवसायास सुरुवात केली. सुमारे चार वर्षांच्या मेहनतीतून तत्पर सेवा देत या व्यवसायात दीपक यांनी चांगलाच जम बसविला आहे.
...अशी होते पाचट बंडल निर्मिती
यात ट्रॅक्टरचलित दोन स्वतंत्र यंत्रे आहेत. पैकी पहिल्या यंत्राला जाड तारेसारखी फावडी बसविली आहेत. ट्रॅक्टरला मागे जोडल्यानंतर ते पाचट सरीच्या एका बाजूला गोळा करण्याचे काम करते. -गोळा केलेल्या पाचटाच्या स्वयंचलित पद्धतीने गाठी बांधण्याचे काम बेलर करते. त्यासाठी यंत्राला स्प्रिंगची यंत्रणा असून, गोळा केलेले पाचट यंत्रात ओढले जाते. आतच पाचटाचे तुकडे होऊन स्वयंचलित पद्धतीने गाठी बांधून त्या बाहेर येतात. -दोन्ही यंत्रांसाठी दोन स्वतंत्र ट्रॅक्टर्स. एक ट्रॅक्टर पाचट गोळा करीत चालतो. तर दुसरा ट्रॅक्टरगाठी तयार करण्याचे काम करतो. -प्रति टन ऊस पाचटापासून सरासरी १४ ते १५ गाठी तयार होतात. एकरी ६० टन ऊस उपलब्ध झाल्यास सुमारे ८०० ते ८४० गाठी तयार होऊ शकतात.
प्रति गाठ १० किलो वजनाची भरते.
प्रति दिवसात हे यंत्र १५०० पर्यंत गाठी तयार करू शकते.
असे आहे व्यवसायाचे स्वरूप
शेतकऱ्याचा ऊस असल्यास प्रति नग २० रुपये दराने जागेवर बंडल्स तयार करून देण्यात येतात. अन्य ठिकाणाहून पाचट आणून इच्छुक शेतकऱ्यांना पुरवण्यासाठी हाच दर ३० रुपये असतो. फळबागांसाठी या बंडल्सना अधिक मागणी असते. ऑक्टोबर ते मार्च अशा पाच महिन्यांच्या कालावधीत हा व्यवसाय चालतो.
बार्शी तालुक्यातील वैराग, मोहोळ, माढा, करमाळ्यासह धाराशिवमधील तुळजापूर, कळंब, बीड जिल्ह्याच्या काही भागांपर्यंत आपले ग्राहक दीपक यांनी तयार केले आहेत. अनेक शेतकरी हंगामाआधी त्यांच्याकडे आगाऊ मागणी नोंदवितात. त्यासाठी खास डायरी तयार केली आहे. त्यानुसार प्रत्येकाला तशी तारीख दिली जाते. कष्ट, व्यावयासिक आणि खात्रीशीर सेवा देण्याची वृत्ती असलेले दीपक या व्यवसायातून काही लाखांचे उत्पन्न मिळवतात. त्यातून आठ मजुरांनाही रोजगार मिळाला आहे.
दीपक घायतिडक ८८८८४४७४४८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.