सतीश कुलकर्णी
Sugarcane Farming : पुणे जिल्ह्यातील वडगाव बांडे (ता. दौंड) येथील राजेंद्र माणिक मेमाणे यांचे शिक्षण जेमतेम बारावीपर्यंत झालेले आहे. काका तानाजी जयवंत मेमाणे यांच्यासह संयुक्त कुटुंबाची १७ एकर शेती आहे. पैकी राजेंद्र यांचे स्वतःचे सव्वाचार एकर मुरमाड, हलके आणि बऱ्यापैकी खडकाळ क्षेत्र आहे.
काही ठिकाणी तर खडकावर केवळ ६ ते १० इंच माती दिसून येते. संपूर्ण चढ-उताराच्या या क्षेत्राचे विभाजन करत त्याचे टप्पे केले आहेत. सन २०१६ पूर्वीपर्यंत मेमाणे पारंपरिक पद्धतीने ऊसशेती करायचे. त्या वेळी एकरी ६० ते ६५ टनांपर्यंत उत्पादन त्यांना मिळायचे. रासायनिक निविष्ठांवरील खर्च वाढत चालला होता. उत्पादन वाढण्याऐवजी स्थिर किंवा कमी होत चालले होते.
सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब
मेमाणे यांची शेती श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये येते. या कारखान्याच्या वतीनेऊस विकास प्रशिक्षण कार्यक्रम चालवला जातो. त्यात सहभाग घेतल्यास सुधारित पद्धतीने ऊसशेती करता येऊन उत्पादनवृद्धी करता येईल असे मेमाणे यांना वाटले. कारखान्याच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय पद्धतीचा अवलंब ते करू लागले.
हळूहळू त्याचे फायदे दिसू लागले. उत्पादनात वाढ होऊ लागली तसा हुरूप वाढला. एकरी १०० टनांपेक्षा अधिक उत्पादन घेण्याचे ध्येय पक्के होत गेले. आता मागील तीन वर्षांपासून स्वतःच्या तीन एकरांसह काकांच्या शेतात देखील एकरी सरासरी १०० टनांपेक्षा अधिक उत्पादकता मिळवणे मेमाणे यांना शक्य होऊ लागले आहे. खऱ्या अर्थाने ऊसशेतीत त्यांना यशाची गुढी उभारता आली आहे.
...असे केले सुधारित व्यवस्थापन (ठळक बाबी)
को ८६०३२ वाणाची निवड.
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नी यांच्या तंत्रज्ञानावर आधारित
सुपरकेन नर्सरी पद्धतीचा वापर. यात एक डोळा पद्धतीच्या बेण्याचा वापर. त्यास शिफारस केलेल्या कीडनाशकांची प्रक्रिया. तीन गुंठे क्षेत्रावर रुंद गादीवाफे निर्मिती. त्यावर रिकाम्या खताच्या पिशव्या कापून पसरण्यात आल्या. त्यावर दोन इंच जाडीचा मऊ मातीचा थर टाकून घेतला.
मातीच्या थरावर टोकास टोक या पद्धतीने बेणे ठेवण्यात आले. दोन ओळींतील अंतर ३ ते ४ इंच ठेवण्यात आले.
त्यावर पुन्हा दोन इंच जाडीचा मातीचा एक थर दिला. त्यावर नियमित हलके पाणी मारले. त्यामुळे एका महिन्यामध्येच चांगली रोपे घरगुती स्तरावर करता आली. रोपे विकत घेतली अस,ती तर याच रोपांना प्रति रोप २.५ रुपये खर्च आला असता.
पूर्वमशागतीनंतर एकरी ५ ते ६ ट्रॉली शेणखतासोबतच कंपोस्ट खताचा १० टनांप्रमाणे वापर.
मुख्य शेतात रोपांची साडेचार बाय दोन फूट अंतरावर लागवड. या कामासाठी सहा मजुरांची
गरज भासली, एकरी रोपांची संख्या सुमारे पाच हजार. (एक महिने वयाची)
तणनाशकाचा वापर करून तणनियंत्रण.
लागवडीच्या १५ दिवसांनंतर पहिल्या बांधणीला खत व दाणेदार कीटकनाशकाचा वापर.
यात एकरी मात्रेत डीएपी १०० किलो, पांढरे पोटॅश ५० किलो, सल्फेटयुक्त खत २५ किलो, नैसर्गिक स्टार्च आधारीत पाणी शोषक एकरी ५ किलो ( वजनाच्या ४०० पट अधिक पाणी धरून ठेवते.) व फिप्रोनील (०.३ टक्का दाणेदार) या कीटकनाशकाचा समावेश.
मोठ्या भरणीपर्यंत हुमणी व अन्य किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड (४० टक्के) अधिक फिप्रोनील (४० टक्के डब्ल्यूडब्ल्यूजी) या संयुक्त कीटकनाशकाची आळवणी.
त्याचबरोबर १२-६१-० हे खत २ किलो व सोबत क्लोरपायरिफॉस अधिक सायपरमेथ्रिन या संयुक्त कीटकनाशकाचा वापर.
रोपांची चांगली वाढ झाल्यानंतर ३० दिवसांनी एकरी युरिया ५० किलो आणि २४-२४-० हे ५० किलो ही खते जमिनीत चर पाडून गाडून देण्यात आली.
फुटव्यांच्या अवस्थेमध्ये जोमदार वाढीसाठी ह्युमिक ॲसिड, सागरी तण अर्क (सी वीड एक्स्ट्रॅक्ट) यांचा वापर.
वाढीच्या पुढील काळात युरिया, अमोनिअम सल्फेट, सिलिकॉन, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम व व्हीएसआयच्या उत्पादनांचा वापर.
वाफसा स्थितीनुसार १२ ते १५ दिवसांनी पाटपाणी पद्धतीने सिंचन. पूर्वी एकत्रित एका विहिरीवर आणि चार इंची पाइपलाइनवर सिंचनाचे गणित बसवणे अवघड होत असे. त्यामुळे २०१४ मध्ये भीमा नदीवरून सुमारे नऊ हजार फूट अंतरावरून स्वतंत्र पाइपलाइन केली. हे पाणी शेतातील विहिरीत सोडून सिंचनाचे नियोजन केले जाते. या वर्षी पावसाचे प्रमाणच कमी असल्याने उसाला पाण्याचा ताण बसला. अन्यथा, उत्पादनात अजून वाढ शक्य झाली असती. तसेच लवकरच ठिबक सिंचनाचा वापर करणार असल्याचे राजेंद्र म्हणाले.
उत्पादन व अर्थकारण
लागवडीनंतर १६ महिन्यांनी नोव्हेंबर २०२३ या काळात तीन एकर प्लॉटची तोड झाली. त्या वेळी हा आडसाली ऊस सरासरी ४२ कांड्यांचा होता. लागवडीच्या प्रति बेटास ६ ते ८ फुटवे दिसून आले. एकरी पाच हजार रोपांपासून ३२ हजार फुटवे मिळाले.
तीन एकर चार गुंठे क्षेत्रातून चालू गळीत हंगामामध्ये (२०२३-२४) ३४६.८९२ टन ऊस गाळपास पाठविण्यात आला. एकरी १११ टनांप्रमाणे उत्पादन मिळाले. कारखान्याने २९०० रुपये प्रति टन दर देऊ केला आहे. एकूण उत्पादन खर्च सुमारे ९७ हजार रुपये आला.
उत्पादनात सातत्य
खडकाळ व माळरान जमीन असूनही काटेकोर शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून एकरी १०० टन वा त्यापुढे उत्पादनात सातत्य ठेवण्यात मेमाणे यांना यश मिळाले आहे. सन २०२०-२१ मध्ये एकरी १०३. ५७९ टन तर २०२१-२२ मध्येही १०२.०८२ टन उत्पादन घेतले होते.
कारखान्याचे मार्गदर्शन ठरले मोलाचे
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुका व त्यातही राहू परिसर ऊस पट्टा म्हणून ओळखला जातो. येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने एकरी ऊस उत्पादनवाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामध्ये कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक डॉ. पांडुरंग राऊत, ॲड. विकास रासकर (कार्याध्यक्ष), योगेश ससाणे (उपाध्यक्ष) आणि माधव राऊत (संचालक) यांचे मार्गदर्शन लाभते.
सदाशिव टिळेकर (ऊस व्यवस्थापक, अशोक शेंडगे (शेती अधिकारी), दीपक रोडे (ऊस विकास अधिकारी) कार्यक्रम राबविण्यामध्ये तत्पर असतात. ऊसतज्ज्ञ डॉ. सुरेश पवार, डॉ. बाळकृष्ण जमदग्नी, मच्छिंद्र बोखारे (डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन) यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभते. कै. डॉ. सुभाष शिंदे यांचेही सहकार्य लाभले आहे.
या कार्यक्रमामुळे पूर्वी एकरी ४० ते ६० टनांच्या आसपास उत्पादन असणारे शेतकरी ७० ते ८० टन उत्पादनापर्यंत पोहोचले आहेत. सन २०२३-२४ या हंगामात एकरी १०० टनांहून अधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १७ पर्यंत होती.
सदाशिव टिळेकर (ऊस व्यवस्थापक) ९९२३००२९१५
अशोक शेंडगे (शेती अधिकारी) ९९२३००२९२५
दीपक रोडे (ऊस विकास अधिकारी) ९९२३००२९१२
राजेंद्र माणिक मेमाणे
९७६४८१५१८३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.